शिवसैनिकांच्या 'दादागिरी'वरून आदित्य ठाकरे आणि किरीट सोमय्यांमध्ये वाद पेटला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल हिरामणी तिवारी व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण केली आणि त्याचं मुंडन केलं. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय. किरीट सोमय्या आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांच्या पक्षावर जोरदार हल्ला केलाय.

वडाळा येथील शांतीनगर भागात राहणाऱ्या हिरामणी तिवारी यांची फेसबुकवर राहुल तिवारी या नावाने ओळख आहे. दिल्लीतल्या जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हलल्याची तुलना उद्धव ठाकरेंनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यावर आक्षेप घेणारी पोस्ट तिवारी यांनी लिहिली होती.

त्यानंतर त्यांच्या परिसरातील शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे केस कापले. या सगळ्याचा व्हीडिओ काढून तो सोशल मीडियावर पसरवण्यात आला.

"जामिया मध्ये झालेल्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्याप्रकरणी मी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ही तुलना चुकीची आहे अशा आशयाची पोस्ट मी टाकली होती. त्यानंतर 25-30 माणसांनी मला मारहाण केली आणि मुंडन केलं." असं तिवारी यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

"मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मला मारहाण झाल्याचा तक्रार अहवाल त्यांनी तयार केला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी एक पत्र टाईप केलं आणि त्यात मी तडजोड करण्यास सांगण्यात आलं. या प्रकरणी कडक कारवाई व्हावी अशी माझी अपेक्षा आहे," ते पुढे म्हणाले.

'केस कापणारे चंद्रावरून आले होते का?'

या प्रकरणास आता राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणी शिवसैनिकांवर कारवाई व्हावी म्हणून भाजपने आक्रमक भूमिका घेतली.

शिवसेनेच्या विरोधात सदैव भूमिके घेणारे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, "महाराष्ट्रात दहशत पसरली आहे. दादागिरी सुरू आहे. केस कापणारे लोक व्हीडिओत दिसत आहेत. ते काही चंद्र किंवा मंगळावरचे नाहीत. पोलीस शांत का बसलेत? जर हा व्हीडिओ खरा आहे, तर धमक्या देणाऱ्यांवर कारवाई का नाही? कारवाई नाही केली तर आम्ही राज्यपाल आणि न्यायालयात जाऊ. दहशत आणि दराऱ्यातलं अंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्यांना समजावून सांगावं. त्यांची पक्षावरची पकड गेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेवरचीही."

गृह खातं शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यातच शिवसेना पक्ष प्रमुखांवर टीका करणाऱ्याला शिवसैनिकांनीच चोप दिल्यामुळे आता पोलीस कारवाई करतात का, याकडे लक्ष आहे. भाजपने नेमका हाच मुद्दा पकडल्यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली. पक्षाची आणि सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी मग आदित्य ठाकरेंनी स्वतःवर घेतली.

आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक निवेदन ट्विटरवर इंग्रजीत प्रसिद्ध केलं आहे.

ते म्हणतात, "नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असताना एका ट्रोलने (सोशल मीडियावर शिवीगाळ अथवा बदनामी करणारे) मुख्यमंत्र्यांबदद्ल अश्लाघ्य भाषा वापरत या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला.

"मात्र कायदा सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असून कुणीही कायदा हातात घेऊ नये. हे ट्रोल सगळ्यांबदद्ल शिवराळ भाषा वापरतात. अगदी बायका आणि लहान मुलांनाही सोडत नाही. अशा लोकांना उत्तरं देणं हे आपलं काम नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या तर्कहीन तक्रारी कुणी ऐकून घेत नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त आहेत.

"अशा लोकांना भारतीय जनतेने नाकारले असून त्यांची अवस्था आज संपूर्ण देश पाहत आहे. हे लोकांना धमकावतात, ते सोशल मीडियावर मॉब लिंचिंग करतात. त्यांना समाजात अशांतता निर्माण करायची असते. आपल्या नेत्याविरुद्ध, समाजाविरुद्ध, कुणी काही बोललं तर राग येणं मी समजू शकतो. या ट्रोलना देशातले काही मोठे नेतेसुद्धा सोशल मीडियावर फॉलो करतात. पण मी म्हणतो की त्यापेक्षा आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना फॉलो करूया. ते शांत, स्थिरचित्त आहेत. ते फक्त आश्वासनं पूर्ण करण्याबाबत आणि लोकांची सेवा करण्याबाबत आक्रमक असतात."

आदित्य ठाकरेंनी नाव न घेता भाजपवर टीका केली.

शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शरद पवारांना ट्विटरवर विचारलं आहे की त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? जोपर्यंत सदर शिवसैनिकांवर कारवाई होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही, असं भाजपच्या प्रवक्त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)