किरीट सोमय्या: 'उद्धव ठाकरेंनी, हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा'

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

"मंत्रालयात आपण RTI संबंधित फाईल्स तपासत होतो. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल करावा," असं आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

आज (27 जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या बोलत होते.

किरीट सोमय्या मंत्रालयात कागदपत्रांच्या फाईल्स तपासत असल्याचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. त्या फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने किरीट सोमय्या यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांनाही नोटीस पाठवली आहे.

या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आजची पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले, "उध्दव ठाकरेंना त्या साध्या लिपिक कर्मचार्‍यांना नोटीस द्यायला लाज वाटली पाहिजे. मी आरटीआयसंबंधी फाईल्स तपासत होतो. तो फोटो कोणी काढला याच सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवलं आहे. पण ते फुटेज गायब करण्याचे आदेश दिले आहेत.

"किरीट सोमय्यांना नोटीस देता आणि प्रताप सरनाईकांना पाठीशी घालता का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून सध्या तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

या फोटोत किरीट सोमय्या कुठल्यातरी कार्यालयात बसून, फाईल्स पाहत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना दावा केला जातोय की, हा फोटो मंत्रालयातील आहे. मात्र, त्याबद्दलची सत्यता अद्याप समोर आली नाहीय.

मात्र, या फोटोवरून किरीट सोमय्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं नाही. किंबहुना, तो फोटो कुठला आहे, हे सरकारनंच जाहीर करावा असं आव्हानचं किरीट सोमय्यांनी दिलंय.

या फोटोबाबत किरीट सोमय्यांना विचारलं असता, त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "तो फोटो कधीचा आहे, मला माहिती नाही. मी 50 ठिकाणी माहिती अधिकाराअंतर्गत (RTI) फाईल्स तपासणीसाठी जात असतो. तिथं फाईल्स तपासायला देतात."

"ज्याने तो फोटो काढला, त्यांनी जाहीर करावं की, तो नगरविकास खात्यातला आहे. नगरविकास मंत्र्यांनी किंवा सचिवांनी सांगावं त्या फोटोबद्दल सांगावं," असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

यापेक्षा अधिक आपल्याला या विषयावर काही बोलायचे नाही असे सोमय्या यांनी पुढे म्हटले.

त्याचवेळी किरीट सोमय्यांनी ट्वीट करून, प्रताप सरनाईकांशी संबंधित प्रकरणाची माहिती दिलीय. त्यात त्यांनी म्हटलंय की, आज मी मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरील नगरविकास विभागाच्या कार्यालयात माहिती अधिकाराअंतर्गत फाईल्स पाहिल्या.

दुसरीकडे, या फोटोच्या अनुषंगानं भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे संभ्रम आणखी वाढला आहे.

सोमय्यांचा फोटो मंत्रालयातला?

दरेकरांनी त्यांच्या प्रतिक्रियेत हा फोटो मंत्रालयातला असल्याचा उल्लेख केलाय. शिवाय, या फोटोत दिसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असून, ती अयोग्य असल्याचंही म्हटलंय.

प्रवीण दरेकर म्हणाले, "किरीट सोमय्या मंत्रालयात एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसले म्हणून त्या अधिकाऱ्यावर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली, ती निषेधार्ह आहे. एखादा आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागायला गेला आणि त्याला बसायला सांगितलं, आणि तोही या देशाचा खासदार राहिलेला नेता, तर त्यावेळी कारवाई करणं म्हणजे मोगलाई पद्धतीनं कारभार चालल्याचं दाखवणारं आहे."

दरेकर पुढे म्हणाले, "सरकार काय तुमच्या मालकीचं झालंय का? लहर आली की अधिकाऱ्यांना निलंबित करताय. यापूर्वी कुठला नेता मंत्रालयात कुठल्या खुर्चीवर बसलाच नाही का? मला वाटतंय, कारभार चालवताना सरकारचा अतिरेक होतोय, त्याचा धिक्कार मी या ठिकाणी करतोय."

निलंबित किंवा ट्रान्सफर केलेल्या अधिकाऱ्याला न्याय द्यावा, अशीही मागणी प्रवीण दरेकरांनी केली.

सोमय्यांचा हा फोटो मंत्रालयातलाच असल्याला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही एकप्रकारे दुजोरा दिलाय.

किरीट सोमय्या आणि भाजपवर टीका करताना सचिन सावंत म्हणाले की, "भाजप नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झालीय. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अगदी बेफाम झालंय. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची भूमिका आहे. आज ज्याप्रकारे किरीट सोमय्या मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते. या प्रकाराची चौकशीची गरज आहे. कारण हे त्याच मानसिकतेचं निदर्शक आहे."

"जर किरीट सोमय्यांनी माहिती अधिकाराअंतर्गत परवागनी घेतली नसेल, तर हा गुन्हा घडलेला आहे. चौकशीतही तसं दिसत असेल, तर ऑफिशियल सिक्रेट कायद्याचं उल्लंघन, सरकार कार्यालयात ट्रेस पासिंग करण्याचा प्रयत्न या कायद्यांद्वारे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे," असंही सचिन सावंत म्हणाले.

तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

या फोटोच्या अनुषंगाने बीबीसी मराठीनं नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधला असता, त्यांच्या माहितीनुसार, "या फोटोच्या अनुषंगानेच नगरविकास खात्यातील तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती मिळाली."

यात दोन नियोजनकार आणि एक कक्ष अधिकाऱ्याचा समावेश आहे, ज्यांना कारणे दाखवा नोटीस राज्य सरकारनं बजावलीय.

दरम्यान, या प्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे किंवा महाविकास आघाडी सरकारमधील कुणी मंत्री भूमिका मांडतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका

मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी माहिती अधिकाऱ्यांचे पत्र ट्वीट केले आहे. त्यात 'कार्यालयात यावे' असा उल्लेख आहे.

ते म्हणाले, "माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस, या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा. मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत."

"हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते.

"सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा देण्यात आल्या आहेत. हाच का तुमचा पारदर्शी कारभार शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?" असं फडणवीस म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)