You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हसन मुश्रीफ : 'किरीट सोमय्यांच्या आरोपांमागे चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड'
"किरीट सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपचं षडयंत्र आहे. विशेषत: चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत," असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर मुश्रीफांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, "अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी माझा किंवा जावयाचा सूतराम संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी 44 लाख शेअर कॅपिटल आहे. मग 100 कोटींचा घोटाळा होईल कसा? तसंच, कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचं या कारखान्याला कर्ज नव्हतं. राज्य सरकारनं हे ब्रिक्सला 10 वर्षे चालवायला देत होतं. 2020 साली ब्रिक्सनं ही कंपनी सोडली. कारखाना सोडल्याची ऑर्डर माझ्याकडे आहे."
सोमय्यांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, "सोमय्यांचा आरोप इतका खोटा की, त्यांची सीएची पदवी खोटी आहे की काय शंका येते. त्यांनी अभ्यास करावा."
"एजंट म्हणून नेमल्यानंतर, सुपारी दिल्यानंतर तक्रारी करा ना. पण तुम्ही काय न्यायाधीश लागून गेलात काय?" असंही मुश्रीफ सोमय्यांबाबत म्हणाले.
तसंच, चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रामुख्यानं हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला.
मुश्रीफ म्हणाले, "चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची मागणी केली. पण मी 'पवार एके पवार' असल्यानं गेलो नाही. महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ झालीय. त्यामुळए 10 वर्षांत भाजपला इथं यश दिसत नाही."
"भाजपकडे जिल्हा बँक, मनपा ताब्यात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलेलं. पण अमित शाहांसोबतच्या मैत्रीमुळे ते बचावले. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थानं लढावं. माझ्या कुटुंबाची बदनामी करून काहीही मिळणार नाही. आरोप बिनबुडाचे आहेत," असं मुश्रीफ म्हणाले.
महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचं मुश्रीफ म्हणाले. मात्र, त्याचवेळी ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीची जोड फेव्हिकॉलसारखी आहे.
रात्रभराच्या ट्रेन नाट्यानंतर हसन मुश्रीफांवर 100 कोटींचा आरोप
काल रात्रभर झालेल्या ट्रेन नाट्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर नवे आरोप लावले आहेत.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. साताऱ्यातील कराडमध्ये सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
किरीट सोमय्या म्हणाले, "हसन मुश्रीफ यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केलाय. या साखर कारखान्याचे कागदपत्र उद्या (21 सप्टेंबर) ईडी आणि इन्कम टॅक्सकडे देणार आहे."
"2020 मध्ये कोणतंही पारदर्शक लिलाव न होता, ब्रिक्स इंडिया या खासगी कंपनीला देण्यात आला. या कंपनीला कुठलाही अनुभव नाही. त्यांना का देण्यात आला, शरद पवारांना चांगलं माहित आहे. कारण हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे बेनामी मालक आहेत," असंही किरीट सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
"चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय, बाकी विषय आम्ही घेऊ. तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा," अशी माहितीही सोमय्यांनी दिली.
यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या कारवाईबाबतही भाष्य केलं.
कुठलाही कायदेशीर आदेश नसताना आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केल्याचा सोमय्यांनी आरोप केला.
"मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी," असं सोमय्या म्हणाले.
'127 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार'
याआधी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचार आणि घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत तब्बल 2700 पानांचे पुरावे सादर केले. विशेष म्हणजे प्राप्तीकर विभागाकडे आधीच हे पुरावे सादर केल्याचंही सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांचे हे आरोप फेटाळले होते. किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सोमय्या यांना बदनामीबद्दल कायदेशीर नोटीस बजावली असून 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. पण त्याला मी किंमत देत नसून सहा नेत्यांनी अशा नोटिसा दिल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते.
माझ्या मुलाला तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न झाला, पत्नी मेधा सोमय्यांच्या मागे चौकशी लावण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला. पण मी त्याला घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.
सोमय्यांनी चंद्र किंवा मंगळावर जाऊन आमच्या जमिनी पाहाव्या - राऊत
किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, "आरोप करणाऱ्यांवर झालेली कारवाई गृहमंत्र्यांनी केलीय. त्यात आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कुणी करू नये. गृहमंत्र्यांनी माहिती घेऊन कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील यातून कारवाई केली. यावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत."
"आरोप करण्यापूर्वी पुरावे असतील, महाराष्ट्रात पोलीस यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर गृहमंत्रालयानं कारवाई केली," असे राऊत म्हणाले.
सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावरही आरोप केले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "किरीट सोमय्या चंद्र किंवा मंगळावर जाऊन आमच्या जमिनी पाहाव्या. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावू शकत नाही. केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचेच ठरवलंय, तर करावं. आरोप मोदींपासून भाजपशासित नेत्यांवरही होतायेत. आरोप करणं हल्ली फॅशन झालीय."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)