You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरीट सोमय्यांचे हसन मुश्रिफांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (13 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचार आणि घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत तब्बल 2700 पानांचे पुरावे सादर केले. विशेष म्हणजे प्राप्तीकर विभागाकडे आधीच हे पुरावे सादर केल्याचंही सोमय्या म्हणाले.
ठाकरे सरकारमधल्या नेत्यांवर सोमय्या एकापाठोपाठ आरोप करत आहेत. सोमवारी (13 सप्टेंबर) आणखी एका मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांचे हे आरोप फेटाळले आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
127 कोटींचा घोटाळा, 2700 पानांचे पुरावे
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारमधील आतापर्यंत घोटाळ्याचे आरोप केलेल्या 11 जणांच्या नावांची यादी वाचून दाखवली.
या यादीत एका नव्या नावाचा समावेश करत असल्याचं सांगत सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी शेकडो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या घोटाळ्यांपैकी तब्बल 127 कोटींच्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावादेखील सोमय्या यांनी केला.
2700 पानांच्या पुराव्यामध्ये हसन मुश्रीफ, त्यांच्या पत्नी साहेरा आणि त्यांचा मुलगा नावीद मुश्रीफ या तिघांनी वेगवेगळ्या माध्यमांमधून घोटाळे केल्याचा आरोप त्यांनी केली.
सोमय्या यांनी 2700 पानांचे हे पुरावे प्राप्तीकर विभागाकडं यापूर्वीच सादर केलेले असल्याची माहितीही यावेळी दिली.
घोटाळ्यासाठी शेल कंपन्यांचा वापर-सोमय्या
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस कंपन्या, शेल कंपन्या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग, बेनामी संपत्ती विकत घेणं अशा माध्यमातून भ्रष्टाचार आणि घोटाळे केल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळणारी रोख रक्कम शेल कंपन्यांच्या माध्यमातून फिरवून पुन्हा आपल्या खात्यात आणल्याच्या प्रकाराचे पुरावे असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी उदाहरणादाखल CRM सिस्ट्मस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपीनबाबत माहिती दिली. ही कंपनी प्राप्तीकर विभागानं शेल कंपनी म्हणून जाहीर केली आहे. या कंपनीच्या ऑपरेटरचीही चौकशी झाली आहे. तरीही या कंपनीशी व्यवहार झाल्याचं मुश्रीफ यांच्या मुलानं दाखवलं आहे.
विशेष म्हणजे हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नावीद यांनी निवडणूक उमेदवारीच्या अर्जाबरोबर सादर केलेली संपत्तीबाबतची प्रतिज्ञापत्रंच पुरावे म्हणून सादर केले.
मुश्रिफांच्या पत्नीवरही आरोप
2017 मध्येच कारवाई झाल्यानंतर C या कंपनीवर बंदी आली, तरीही नावीद मुश्रीफ यांनी सीआरएम कंपनीतून कर्जाच्या माध्यमातून रक्कम मिळाल्याचं दाखवलं आहे. त्यांच्या निवडणूक अर्जाच्या प्रतिज्ञापत्रातच ही माहिती असल्याचं सोमय्या म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्या पत्नी साहेरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 3 लाख 78 हजारांचे शेअर्स दाखवले आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं.
संताजी घोरपडे या साखर कारखान्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने 100 कोटींपेक्षा अधिकची भ्रष्टाचारातून मिळालेली रक्कम गुंतवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोमय्यांवर 100 कोटींचा दावा करणार
हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
यापूर्वीही माझ्यावर आरोप झाले, तेव्हा प्रत्येकवेळी मी दावे केले आहेत. हा सातवा दावा असेल. माझ्यावर लोकांच्या असलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी ते गरजेचं असल्याचं मुश्रीफ म्हणाले.
सोमय्या अब्रू नुकसानीच्या खटल्याच्या तारखेला कोल्हापुरात येतील त्यावेळी माहिती घेतल्यास, कोल्हापूरमधून भाजप सपाट झाल्याचं त्यांच्या लक्षात येईल, असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी हायब्रिड अम्युनिटी बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन भ्रष्टाचार विरोधी पथकाकडं तक्रार करणार असल्याचंही मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)