किरीट सोमय्या : 'मिलिंद नार्वेकर लॉकडाऊनमध्ये बंगला बांधत होते, CBI चौकशी व्हावी' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) मिलिंद नार्वेकर लॉकडाऊनमध्ये बंगला बाधत होते, CBI चौकशी व्हावी - सोमय्या

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मिलिंद नार्वेकर 10-15 कोटींचा बंगला बांधत होते, त्यासाठी बऱ्याच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

किरीट सोमय्यांनी या आरोपांचा व्हीडिओ ट्विटरवर, फेसबुकवर पोस्ट केला असून, त्याद्वारे मिलिंद नार्वेकरांच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे.

"लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते, तर डावा हात मिलिंद नार्वेकर बंगला बांधत होते," असा आरोप सोमय्यांनी केला.

तसंच, मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडं तोडून बंगला उभारायचं काम सुरू केल्याचं सोमय्यांचं म्हणणं आहे.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव आहेत.

2) आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा RSS चा उद्देश - पटोले

"आरक्षण, संविधन आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे. संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपवण्यासाठीच काम करत आहे," असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले यांनी हे मत व्यक्त केले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपचं आज (26 जून) आंदोलन आहे.

याबाबत नाना पटोले म्हणाले, "देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागितला. पण केंद्रानं तो दिला नाही. केंद्राने तो डेटा दिला नसल्यानं सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं."

"ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याला केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवून त्यांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव आहे," असा आरोप पटोलेंनी केला.

तंसच, आज (26 जून) काँग्रेसही याप्रकरणी राज्यव्यापी आंदोलन करेल, अशी माहिती पटोलेंनी दिली.

3) कर्नाटकचे माजी मंत्री म्हणतात, 'फडणवीस माझे गॉडफादर'

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माझे गॉडफादर आहेत, असं कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

जारकीहोळी कर्नाटक भाजपमधील काही नेत्यांमुळे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रमेश जारकीहोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

"मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. फडणवीस माझे गॉडफादर असल्यनं त्यांची भेट घेतली. RSS आणि भाजपने जो सन्मान दिला, तो गेल्या 20 वर्षांत काँग्रेसमध्ये असताना मिळाला नाही," असं जारकीहोळी म्हणाले.

तसंच, काँग्रेस बुडतं जहाज असून, तिथे परत जाण्याचा विचार नसल्याचंही ते म्हणाले.

4) परांजपे बिल्डर : 'हा कौटुंबिक विषय, व्यवसायाशी संबंध नाही'

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीनंतर दोघांनाही सोडण्यात आलं.

याबाबत परांजपे कुटुंबातील सदस्य आणि कंपनीचे संचालक अमित परांजपे यांनी व्हीडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "एका व्यक्तीने गैरसमजातून विलेपार्ले (मुंबई) येथे तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात श्रीकांत, शशांक यांच्यासह चुलत भावांना बाजू जाणून घेण्यासाठी मुंबईत बोलावण्यात आलं होतं."

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

तक्रारदार व्यक्ती वगळता परांजपे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असल्याचा दावा अमित परांजपे यांनी व्हीडिओतून केलाय.

5) PMC बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आणखी 6 महिन्यांनी वाढले

पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अर्थात PMC बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे (RBI) निर्बंध आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आले आहेत. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिली आहे.

1 जुलै 2021 पर्यंत PMC बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. आता त्यात वाढ करून, 31 डिसेंबर 2021 पर्यंत हे निर्बंध कायम असतील.

पीएमसीची स्थापना 1984 साली मुंबईतील सायन इथं झाली. या बँकेच्या सहा राज्यांमध्ये मिळून 137 शाखा आहेत. बँकेच्या महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही शाखा आहेत.

24 सप्टेंबर 2019 पासून पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीअंतर्गत आणण्यात आली आहे. तसंच बँकेवर अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत.

बँकेवर निर्बंध लादल्यानंतर RBI नं खातेधारकांना एकावेळी 1 हजार रुपयेच काढता येतील असं म्हटलं होतं. त्यानंतर ही मर्यादा वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)