योगी आदित्यनाथ : 'अब्बा जान म्हणणाऱ्यांनाच पूर्वी रेशन मिळायचं' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) 'अब्बा जान' म्हणणाऱ्यांनाच पूर्वी रेशन मिळायचं - योगी आदित्यनाथ

"भाजपचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात असे. आता सर्वांना समान न्याय मिळतो. 2017 पूर्वी फक्त जे 'अब्बा जान' म्हणत होते, तेच रेशन संपवत होते," असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना केले. ते उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील कार्यक्रमात बोलत होते.

"आम्ही गरिबांना शौचालयं दिली. शौचालयं देताना कुणाचा चेहरा पाहिला गेला का? रेशन मिळतोय ना? 2017 पूर्वी असं होत होतं का? तेव्हा तर 'अब्बा जान' म्हणणारेच रेशन संपवत होते," असं योगी आदित्यनाथ या भाषणात म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

'अब्बा जान' हा शब्द मुस्लीम समाजात वडिलांना हाक मारण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या टीकेला वेगळं वळण लागलं आहे.

"मोदी सत्तेत आल्यानंतर विकासाचे अजेंडे खऱ्या अर्थानं बदलले. मोदींनी देशाचं राजकारण बदललं, गाव, गरीब, शेतकरी, तरुण, महिला आणि समाजातील प्रत्येक समूहातील लोकांसाठी काम केलं," असं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं.

2) 'मुख्यमंत्री बदलून अपयश झालं जाणार नाही, CM नव्हे, PM बदला'

गुजरातमध्ये भाजपने मुख्यमंत्री बदलला. विजय रूपाणींना बाजूला करून, भूपेंद्र यादव यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं. याच घडामोडीवरून काँग्रेसनं भाजपवर टीका केलीय.

"भाजप सर्व राज्यात अपयशी ठरलीय. किंबहुना, संपूर्ण भारतालाच भाजपनं अपयशी ठरवलंय," असं म्हणतं काँग्रेसनं '#CM_नही_PM_बदलो' मोहिम सुरू केलीय. लोकमतनं ही बातमी दिलीय.

मुख्यमंत्री बदलून काहीही होणार नाही, पंतप्रधान बदला, असं काँग्रेसनं म्हटलंय.

श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा, असा मोदींचा मंत्र असल्याची टीकाही काँग्रेसनं केलीय.

दरम्यान, भाजपकडून काँग्रेसच्या या ऑनलाईन मोहिमेवर अद्याप कुठले उत्तर आलं नाहीय.

3) उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना निवडणूक लढवणार - संजय राऊत

उत्तर प्रदेश आणि गोव्यात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका शिवसेना लढवेल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटना शिवसेनेला समर्थन देण्याच्या तयारीत असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.

उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी 80 ते 100 जागा, तर गोव्यातील 40 पैकी 20 जागांवर शिवसेना लढेल, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

"पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवलीय. समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. तर गोव्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबवणार आहोत," असंही राऊत म्हणाले.

4) 'गांधी जयंतीपासून अनिल परबांचं कार्यालय पाडण्यास सुरुवात होणार'

"लोकायुक्तांनी शिवसेना नेते अनिल परब यांचं कार्यालय पाडण्याचे आदेश दिले आहेत. लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब यांच्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिली," असं भाजपचे खासदार किरीट सोमय्या म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) अनिल परब यांचं बेकायदेशीर कार्यालय पाडण्यास सुरुवात होईल, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला.

मुंबईतील वांद्रे इथं अनिल परब यांचं अनाधिकृत कार्यालय असून, त्यासंदर्भात लोकायुक्तांनीच बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याचं सोमय्या म्हणाले.

यापूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा रत्नागिरीतील बंगला पाडण्यात आला. त्यामुळे आता अनिल परब यांच्या कार्यालयावर सोमय्यांच्या दाव्यानुसार काही कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

5) राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष करा - NSUI

खासदार राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेसचं अध्यक्ष करा, अशी मागणी भारतीय विद्यार्थी संघटनेनं (NSUI) केलीय. NSUI ही काँग्रेसची विद्यार्थी विंग आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"राहुल गांधी हे प्रामाणिक आहेत आणि ते भूमिका घेणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद झालाय. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी कायम पाठिंबा दिलाय," असं NSUI ने प्रस्ताव सादर करताना म्हटलं.

राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटतं, असंही NSUI ने म्हटलंय.

काँग्रेसच्या युवा संघटनेनं राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आठवड्याभरातच विद्यार्थी संघटनेनंही असाच प्रस्ताव मंजूर केलाय.

राहुल गांधी यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत, काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)