You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जुही चावलांची 5जीविरोधातली याचिका फेटाळली, कोर्टाने ठोठावला 20 लाखांचा दंड
देशामध्ये 5जी तंत्रज्ञान आणण्याच्या विरोधात अभिनेत्री जुही चावलांनी दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.
न्याय प्रक्रियेचा गैरवापर करण्यात आल्याचं म्हणत कोर्टाने जुही चावलांना 20 लाखांचा दंड ठोठावलाय. ही याचिका प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने दाखल करण्यात आल्याचं वाटत असल्याचंही कोर्टाने म्हटलंय.
दिल्ली उच्च न्यायालयातल्या 5 जी तंत्रज्ञान आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे यासंबंधीच्या सुनावणीची लिंक जुही चावलांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कोर्टाच्या कामकाजात काही दिवसांपूर्वी अडथळा आला होता.
सुनावणीदरम्यान काय घडलं होतं?
याचिकाकर्त्यांचे वकील 'या तंत्रज्ञानामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं. आमची विनंती आहे की, सरकार जोपर्यंत या तंत्रज्ञानामुळे कोणताही अपाय नाही होत हे स्पष्ट करत नाही तोपर्यंत 5जी तंत्रज्ञानावर बंदी घातली जावी' अशा स्वरूपाचा युक्तिवाद करत होते.
तेवढ्यात 'घुंघट की आड से दिलबर का' गाणं सुरू झालं. कोणीतरी हे गाणं गात होतं.
"प्लीज, आवाज म्युट करा," या प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या न्यायाधीशांनी सुनावलं.
त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली.
नंतर पुढे काय झालं? ही नेमकी कशाबद्दलची सुनावणी सुरू होती आणि त्यावेळी अभिनेत्री जूही चावलाची गाणी का गायली गेली?
दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला हिने 5जी तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
5जी तंत्रज्ञान हे आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे याची चाचपणी करण्याचे आदेश सरकारी यंत्रणाना द्यावेत, असं जूही चावला आणि वीरेश मलिक तसंच टीना वाच्छानी या अन्य दोन याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं.
जवळपास 5 हजार पानांच्या या याचिकेमध्ये डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन्स, सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, काही विद्यापीठं आणि जागतिक आरोग्य संघटनांनाही पक्षकार केलं.
जूही चावला, वीरेश मलिक आणि टीना वाच्छानी यांचे वकील दीपक खोसला यांनी म्हटलं की, या तंत्रज्ञानामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं. आमची विनंती आहे की, सरकार जोपर्यंत या तंत्रज्ञानामुळे कोणताही अपाय नाही होत हे स्पष्ट करत नाही तोपर्यंत 5जी तंत्रज्ञानावर बंदी घातली जावी.
या सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर जूही चावला व्हर्चुअली उपस्थित राहिल्या. त्या आल्यानंतर कोणीतरी जूहीच्याच 'हम है राही प्यार के' या चित्रपटातलं गाणं गुणगुणायला लागलं.
न्यायाधीशांनी संबंधित व्यक्तिला म्युट व्हायला सांगितलं.
त्यानंतर थोड्या वेळानं कोणीतरी पुन्हा एकदा 'लाल लाल होटों पे गोरी किसका नाम है' हे गाणं गुणगुणायला सुरूवात केली. जूहीच्याच 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाजायज' चित्रपटातलं हे गाणं होतं. त्यानंतर या व्यक्तीला व्हर्चुअल सुनावणीतून हटविण्यात आलं.
एवढं होऊनही पुन्हा एकदा कोणीतरी जूहीच्याच चित्रपटातलं 'मेरी बन्नो की आएगी बारात' हे गाणं गात होतं.
जस्टिस जेआर मिढा यांनी कोर्ट मास्टरला संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन सुनावणीतून तातडीनं काढून टाकण्याची सूचना केली, तसंच त्या व्यक्तिविरोधात न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस बजावायलाही सांगितलं.
जूही चावला 5जीच्या रेडिओफ्रिक्वेन्सी रेडिएशनच्या घातक परिणामांबद्दल जागृती निर्माण करत असून याच विरोधात तिने दिल्ली उच्च न्यायालयात 5जी मोबाईल तंत्रज्ञानाच्या भारतातील वापराविरोधात याचिका दाखल केली होती.
सी. हरिशंकर यांच्या खंडपीठानं मंगळवारी (1 जून) या प्रकरणाच्या सुनावणीला नकार दिला आणि जूहीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग केली. या याचिकेवर आज (2 जून) सुनावणी झाली.
न्यायालयानं युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)