You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरीट सोमय्यांचं तिकीट का कापलं गेलं होतं?
भाजपनं ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती. परिणामी किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला होता. शिवसेनेनं त्यांना तिकीट देण्यास तीव्र विरोध दर्शवला होता.
याबाबत प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले होते, "मला खूप आनंद झाला आहे, पक्षानं मला पाच वर्ष संधी दिली. आता पक्षानं माझ्या पेक्षा हुशार मनोज कोटक यांना तिकीट दिलं आहे. ते मला भावा सारखे आहेत."
तर किरीट सोमय्या यांचं काम चांगल आहे, पक्षानं दिलेली जबाबदारी सोमय्यांच्या आशीर्वादाने मी पुढे नेणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज कोटक यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
याआधी शिवसेना-भाजप युतीने मुंबईतल्या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले. तिथं विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली. पण ईशान्य मुंबईच्या जागेवरून बराच खल झाला.
यामागे सोमय्या यांच्या नावाला असलेला शिवसेनेचा प्रखर विरोध हे मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. पण नेमका हा विरोध कोणत्या कारणांमुळे होता?
सोमय्या विरुद्ध शिवसेना
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सेना-भाजपच्या गेल्या चार वर्षांच्या इतिहासात डोकवावं लागेल. 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी असलेली युती शिवसेना-भाजपने त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोडली.
या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतर मुंबईत झालेल्या महापालिका निवडणुकांदरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांवर यथेच्छ टीका केली. शिवसेनेच्या 'सोमय्या विरोधा'ची पायाभरणी याच काळात झाली.
लोकसत्ताचे वरिष्ठ सहाय्यक संपादक उमाकांत देशपांडे सांगतात, 'सेना-भाजपमधून विस्तव जात नव्हता, त्या वेळी भाजपचे आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आणि त्याहीपेक्षा जास्त 'मातोश्री' व थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली होती. शिवसैनिकांच्या ते खूपच वर्मी लागलं होतं. आत्ता सोमय्या यांना होणाऱ्या विरोधामागे ही आगपाखडच कारणीभूत आहे.'
पण याबाबत थोडंसं वेगळं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी मांडलं. ते म्हणतात, 'राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने भाजपशी युती केली, हे अनेक शिवसैनिकांना पटलेलं नाही. त्यामुळे 'युती केली, तरी आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाही' असा संदेश देणं शिवसेनेला गरजेचं आहे. सोमय्या यांना विरोध करून शिवसेना नेमका हाच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.'
शिवसेनेला राग का?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आणि प्रसंगी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात की, सोमय्या नक्कीच पक्षाच्या इशाऱ्यावरूनच बोलले असतील. पण टीका कुठपर्यंत करावी, याचं भान त्यांना राहिलं नाही.
'त्या वेळी सोमय्या म्हणाले होते की, मातोश्रीवर माफियाराज चालतो. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर खंडणीखोरीचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते', प्रधान सांगतात.
शिवसेनेवर टीका करताना सोमय्या यांनी एकदा 'वांद्र्याचा साहेब' असा उल्लेख केला होता. त्यावरून मंबई महापालिकेत सुद्धा गदारोळ झाला होता.
सोमय्या यांनी त्या वेळी केलेले अनेक आरोप गंभीर स्वरूपाचे होते. 'झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमुळे कोणाचं उखळ पांढरं झालं, हे मी जाहीर करेन' असं ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले होते.
या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत उद्धव ठाकरे यांनीही सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना सोमय्या यांनी 'मी माझी संपत्ती माझ्या संकेतस्थळावर जाहीर करतो. माझ्या बँक खात्यांची सगळी माहिती लोकांसमोर ठेवतो. आता उद्धव ठाकरे यांनीही आपली खातेवही लोकांसमोर उघडी करावी,' असं आव्हान उद्धव यांना दिलं होतं.
तसंच सोमय्या यांनी सात कंपन्यांची नावं जाहीर करून या सात कंपन्यांमध्ये शिवसेनेच्या कोणत्या नेत्याचा पैसा गुंतला आहे, ते जाहीर करावं, असं म्हणत शड्डू ठोकले होते.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हाही सोमय्या यांनी शिवसेनेवर घोडेबाजाराचा आरोप केला होता. मनसेच्या नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप करत सोमय्या यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांनी चौकशी करावी, अशी मागणीही केली होती.
शिवसेनेच्या इतर नेत्यांवर आरोप करणं आणि थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणं, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. थेट उद्धव यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे सामान्य शिवसैनिकांच्या मनात सोमय्या यांच्याबद्दल प्रचंड संताप आहे, असं उमाकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघाचा इतिहास
या मतदारसंघात सध्या मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
1967 पासून आतापर्यंत या मतदारसंघातील मतदारांनी आलटून-पालटून कल दिला आहे. तो कसा, तेदेखील बघू या.
1967मध्ये काँग्रेसचे स. गो. बर्वे इथून निवडून आले होते. त्याच वर्षी त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तारा गोविंद सप्रे या काँग्रेस खासदार बनल्या. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम कुलकर्णी यांनी निवडणूक जिंकली.
1977 आणि 1980मध्ये जनता पक्षाकडून सुब्रह्मण्यम स्वामी इथून संसदेत गेले. आपल्या अनेक वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वामींच्या राजकीय कारकिर्दीची ही सुरुवात होती.
1984मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत निवडून आले. पण 1989मध्ये भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी त्यांचा पराभव करत खासदारकी मिळवली.
1991मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पुन्हा गुरुदास कामत यांनी सरशी साधली. पण पुढल्या 1996च्या निवडणुकांमध्ये भाजपचं त्या वेळचं युवा नेतृत्व असलेल्या प्रमोद महाजन यांनी कामतांचा पराभव केला. 1998मध्ये पुन्हा गुरुदास कामत निवडून आले.
देशात 1999मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यात पहिल्यांदा भाजपचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेले.
2004मध्ये मतदारांनी पुन्हा गुरुदास कामत यांना निवडून दिलं. 2009मध्ये राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना निवडून देत मतदारांनी कामत यांच्याविरोधातील आपली नाराजी दाखवून दिली. या निवडणुकीत मनसेने जवळपास दोन लाख मतं घेत सोमय्या यांचा विजय हिरावला.
2014च्या मोदीलाटेत मात्र सोमय्या यांनी जवळपास तीन लाखांच्या मताधिक्याने संजय दिना पाटील यांचा धुव्वा उडवला.
'हा मतदारसंघ नेहमीच फिरता राहिला आहे. मतदारसंघाचा इतिहास बघितला, तर 1977 आणि 1980 मध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता सलग दोन टर्म एकही व्यक्ती निवडून आलेली नाही. गुरूदास कामत यांनाही ही किमया जमली नाही. 2009 मध्ये मनसे फॅक्टरमुळे सोमय्या पडले. यंदाही सेना फॅक्टर निर्णायक ठरणार आहे', उमाकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)