You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्धा : मावळच्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश पवार कुटुंबानं दिले - मोदी
"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः शेतकरी असूनही त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. 10 वर्षे कृषिमंत्रीपदी असताना महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहिल्या", अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मावळच्या शेतकऱ्यांनी आपल्या अधिकारांसाठी मागणी केल्यानंतर त्यांच्यानंतर गोळ्या झाडण्याचे आदेश पवार कुटुंबानं दिले होते अशीही टीका पंतप्रधानांनी केली.
वर्धा येथे प्रचाराचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण देशाचे प्रधानसेवक आहोत हे पुन्हा एकदा सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
पंतप्रधान किसान निधी योजनेद्वारे आपल्या सरकारने महाराष्ट्रातील सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत देण्यात आली. गेल्या 70 वर्षांमध्ये काही पक्षांनी गरिबांना नेहमीच गरीब ठेवलं तसेच फक्त स्वतःची तिजोरी भरली. कर्जमाफी, पाण्याची योजना, सिंचन योजनेच्या नावाखाली काँग्रेस राष्ट्रवादीने शेतकऱ्यांन लुटले अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला.
"आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये रखडलेल्या सिंचन योजनांचा वारंवार उल्लेख केला. अनेक दशके सिंचन योजना रखडल्या होत्या. मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. विदर्भाला दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना लागू केली.
या योजनेमध्ये देशातील 99 प्रकल्पांचे काम केलं गेलं. त्यात महाराष्ट्रातील 26 योजना आहेत. म्हणजे त्यामध्ये फक्त महाराष्ट्रातील 25 टक्के प्रकल्पांचा समावेश आहे. कृषिमंत्रीपदी महाराष्ट्रातील शरद पवार असूनही ही स्थिती होती", अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
पवार कुटुंबात गृहकलह
"शरद पवार कोणताही निर्णय विचार न करता घेत नाहीत असं म्हटलं जातं. एकदा निवडणूक लढवू अशी त्यांनी घोषणा केली. त्यानंतर मी राज्यसभेत खूश आहे असं ते म्हणाले. हवेचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे हे त्यांच्या लक्षात आलं. यावेळेस देशाच्या जनतेने भल्याभल्यांना मैदान सोडायला भाग पाडलं आहे. निवडणुकीआधीच त्यांना मैदान सोडायला लावलं आहे."
"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठा गृहकलह सुरू आहे. शरद पवार यांच्या हातातून पक्षावरील ताबा सुटत चालला आहे. त्यांच्या पुतण्याने पक्षावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये तिकीटवाटपात अडचणी येत आहेत. कोठे लढावे, कोणती जागा सोडावी याचा निर्णय घेता न आल्यामुळे त्यांच्या पक्षातील इतरांचंही धैर्य संपत चाललं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. सत्तेत असताना 6-6 महिने ते झोपतात. मध्येच एखादा नेता उठतो आणि भ्रष्टाचार करून पुन्हा झोपतो", अशी टीका पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर केली.
ते पुढे म्हणाले, "वर्ध्यासाठी लोअर वर्धा आणि जलयुक्त शिवार या प्रकल्पांना सुरुवात केल्यामुळे या जिल्ह्यातील शेकडो गावांना लाभ होणार आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन. सिंचन योजना रखडल्यामुळे विदर्भातला दुष्काळ तीव्र झाला."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर करून भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचेही सांगितले.
"आझाद मैदान परिसरात दंगल घडवणाऱ्या तसेच हुतात्म्यांच्या स्मारकाची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं तजवीज करून ठेवली होती. भारतीयांवर हिंदू दहशतवादाचा डाग लावून कोट्यवधी लोकांना दुखावले. भारतीय संस्कृतीला बदनाम करणाऱ्या काँग्रेसला भारतीय कसे माफ करू शकतील?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
शास्त्रज्ञांचं अभिनंदन- पंतप्रधान
वर्धा येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. "पीएसएलव्ही सी 45 यशस्वी झाल्याचा आणि 5 देशांचे दोन डझनाहून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
अशा प्रकारच्या प्रक्षेपणाच्यावेळी इस्रोच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये केवळ वैज्ञानिक बसलेले दिसायचे मात्र आता पहिल्यांदाच सामान्य लोकांनाही अशा महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी देण्यात आली. शेकडो लोकांनी उपस्थित राहून हा सोहळा अनुभवला" असे पंतप्रधानांनी वर्ध्यातील भाषणाच्या सुरुवातीस सांगितले.
'पवार कुटुंबाची काळजी पंतप्रधानांनी करू नये'
शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये असं मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, "पवार साहेबांच्या परिवाराची काळजी पंतप्रधानांनी करू नये.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले तसेच पंतप्रधानांनी सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांची पक्षामध्ये काय स्थिती करून ठेवली आहे याकडे लक्ष द्यावे. शरद पवार आणि महागठबंधन रालोआचे सरकार घालवल्याशिवाय राहाणार नाहीत हे भाजपाच्या व मोदींच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच त्यांना पोटशूळ उठला आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)