You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL Auction : पुढच्या सीझनमध्ये नसतील 'हे' दिग्गज खेळाडू
अहमदाबाद आणि लखनौ या नव्या संघांनी आपल्या प्रत्येकी तीन खेळाडूंची नावे जाहीर केल्यानंतर सध्या त्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यासोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या IPL च्या खेळाडूंच्या मोठ्या लिलावाची वातावरण निर्मितीही यामुळे झाल्याचं दिसून येतं.
सध्या प्रत्येक संघ आपल्याकडे कोणते खेळाडू असतील, याबाबत डावपेच आखत आहे. आपल्या आवडीच्या खेळाडूसाठी पाहिजे ती रक्कम लावायला संघ सज्ज झाले आहेत.
पण याच दरम्यान काही खेळाडू यंदाच्या वर्षी IPL लिलावापासून दूर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या खेळाडूंच्या यादीत अनेक मोठी-मोठी आणि आश्चर्यचकीत करणारी नावं आहेत, हे विशेष.
लिलावात 1200 पेक्षा जास्त खेळाडूंची नोंदणी
IPL च्या 2022 च्या म्हणजेच 15व्या सीझनचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या लिलावासाठी भारतासह जगभरातील 1200 पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
मात्र, अनेक मोठ्या खेळाडूंनी यामध्ये आपलं नाव नोंदवलेलं नाही. या खेळाडूंच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज यंदाच्या IPL लिलावापासून दूर राहणार आहेत.
इंग्लंडचे बहुतांश खेळाडू लिलावापासून दूर
यंदाच्या वर्षीच्या लिलावात इंग्लंड संघातील बहुतांश खेळाडू दिसणार नाहीत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांनीही नाव नोंदवलेलं नाही.
IPL स्पर्धेच्या 15 व्या सीझनचं आयोजन यंदाच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एप्रिल-मे महिन्यात भारतातच करण्यात येऊ शकतं. स्टोक्स आणि वोक्स हे दोघेही नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅशेज मालिकेत इंग्लंड संघात सहभागी होते. या मालिकेत इंग्लंडला मानहानीजनक पराभव पत्करावा लागला होता.
याशिवाय आतापर्यंत IPL कधीच न खेळणारा इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार जो रूट यावर्षीसुद्धा लिलावातून बाहेर आहे.
वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स लिलावात सहभागी झाले आहेत.
के. एल. राहुल सर्वाधिक महागडा खेळाडू
अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवे संघ IPL मध्ये सहभागी झाल्यानंतर हा यंदाच्या वर्षीचा हा पहिलाच लिलाव आहे. यंदाच्या वर्षी एकूण 10 संघ IPL लिलावात बोली लावताना दिसतील.
भारताचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुल याला लखनौ संघाने यापूर्वीच करारबद्ध केलं आहे. तो या संघाचं कर्णधारपद भूषवताना दिसेल.
लखनौ संघाने के. एल. राहुलला 17 कोटी रुपये दिले आहेत. यामुळे आतापर्यंतच्या IPL इतिहासात विराट कोहलीसोबत संयुक्तरित्या सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा विक्रम त्याच्या नावे नोंदवला गेला.
विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 2018 मध्ये 17 कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं.
लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी यासंदर्भात स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं, "मी के. एल. राहुलच्या फलंदाजी आणि यष्टीरक्षण कौशल्यापेक्षाही त्याच्यातील नेतृत्वकौशल्यामुळे सर्वाधिक प्रभावित झालो आहे."
तर अहमदाबादच्या संघाने हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे. सीव्हीसी कॅपिटलकडे मालकी हक्क असलेल्या या संघाने आपल्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लावली.
अहमदाबादने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान यालाही 15 कोटींच्या बोलीसह आपल्या संघात स्थान दिलं. तसंच युवा फलंदाज शुभमन गिल याच्यासोबतच 8 कोटी रुपयांचा करार केला.
लिलावात वर्षागणिक सर्वाधिक बोली
2008-महेंद्रसिंग धोनी (6 कोटी)
2009-अँड्यू फ्लिनटॉफ आणि केव्हिन पीटरसन (प्रत्येकी 7.35 कोटी)
2010-कायरेन पोलार्ड आणि शेन बाँड (प्रत्येकी 3.4 कोटी)
2011- गौतम गंभीर (11.4 कोटी)
2012-रवींद्र जडेजा (9.72 कोटी)
2013-ग्लेन मॅक्सवेल (5.3 कोटी)
2014-युवराज सिंग (14 कोटी)
2015-युवराज सिंग (16 कोटी)
2016- शेन वॉटसन (9.5 कोटी)
2017-बेन स्टोक्स (14.5 कोटी)
2018-बेन स्टोक्स (12.50 कोटी)
2019-जयदेव उनाडकत आणि वरुण चक्रवर्ती (प्रत्येकी 8.4 कोटी)
2020-पॅट कमिन्स (15.5 कोटी)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)