राहुल गांधी : हिंदू म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो #5मोठ्याबातम्या

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. हिंदू म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो- राहुल गांधी

"मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय ते सांगतो. हिंदू म्हणजे अशी व्यक्ती, जी फक्त सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करते, जी व्यक्ती कधीच घाबरत नाही, निडर असते आणि जी व्यक्ती कधीच तिच्या भीतीचं रुपांतर हिंसा किंवा द्वेष किंवा रागात करत नाही. त्याचं सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधी आहेत", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये इथे झालेल्या सभेत ते बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

"महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत माणूस होता. तो त्याच्या भितीचा सामना करू शकला नाही", असं राहुल म्हणाले.

"एक हिंदुत्ववादी गंगेत एकटाच आंघोळ करतो, तर हिंदू कोट्यवधी लोकांसोबत गंगेत आंघोळ करतो. नरेंद्र मोदी स्वत:ला हिंदू म्हणवतात, पण त्यांनी सत्याचं संरक्षण कधी केलं आहे? त्यांनी लोकांना कोविडपासून संरक्षण मिळण्यासाठी थाळ्या पिटायला सांगितलं. ते हिंदू की हिंदुत्ववादी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

2. देशाच्या कोणत्याही भागात छत्रपतींचा अवमान हा निषेधार्हच-फडणवीस

"देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच", असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेसंदर्भात ते बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच", असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुतळा विटंबनेच्या घटनेवर भाष्य करताना रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही, असं वक्तव्य केलं. बोम्मई यांच्या या वक्तव्याचाही शिवसेनेकडून निषेध व्यक्त केला जातोय.

"छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे", अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

3.सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

सुवर्णमंदिरातील 'रेहरास साहिब' पठणाच्या वेळी एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन 'रुमाला साहिब' वर पाय ठेवून शेजारील तलवार उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथील संतप्त भाविकांनी आणि सेवादारांनी त्या तरुणाला बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना शनिवारी (18 डिसेंबर) अमृतसरमध्ये घडली.

'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

सुवर्णमंदिर, अमृतसर
फोटो कॅप्शन, अमृतसर सुवर्णमंदिर

साधारण २० ते २५ वयाच्या या युवकाने पिवळा फेटा घातला होता. सुवर्णमंदिरात पुजा सुरु असताना तो शांतपणे उभा होता आणि त्याने अचानक उडी मारुन तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ताबडतोब त्याला बाहेर आणण्यात आले आणि वाटेत मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

त्याचा मृतदेह शवागृहात पाठवण्यात आला असून रविवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृताच्या मृतदेहावर कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडली नाहीत. तो एकटाच होता की त्याच्यासोबत इतर लोकं होते हे तपासण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासणार असल्याचे उपायुक्त परमिंदर सिंग भंडल यांनी सांगितले.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी ट्वीट करुन म्हटले आहे की, हे "सर्वात दुर्दैवी आणि घृणास्पद कृत्य" असून या प्रकरणाचा खरा हेतू उघड करण्यासाठी तपास केला जाईल.

4. किदंबी श्रीकांत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

भारताच्याच लक्ष्य सेनला नमवत किदंबी श्रीकांतने स्पेनमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या इतिहासात पुरुष गटात अंतिम फेरीत आगेकूच करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

किदंबी श्रीकांत, लक्ष्य सेन, बॅडमिंटन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किदंबी श्रीकांत

याआधी प्रकाश पदुकोण आणि बी.साईप्रणीत यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदकावर नाव कोरलं आहे. सेमी फायनलच्या चुरशीच्या लढतीत श्रीकांतने लक्ष्यवर 17-21, 21-14, 21-17 असा विजय मिळवला.

रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत श्रीकांतची डेन्मार्कचा तृतीय मानांकित अँडर्स अ‍ॅन्टोन्सेन आणि सिंगापूरचा लोह कीन येव यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.

5. माकडांच्या टोळीने घेतला 250 कुत्र्यांचा जीव

संतप्त माकडांच्या टोळीने 250 कुत्र्यांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. ही सर्व माकडं कुत्र्याला एखाद्या इमारतीच्या किंवा झाडाच्या वरच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून या पकडलेल्या कुत्र्याला खाली टाकून देतात. 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारलं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरुवात केली.

माकडांच्या या प्रतापानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागालाही दिली. तसेच या परिसरात उच्छाद घालणाऱ्या माकडांना पकडण्याची मागणी केली. एक दिवस वनविभागाचे कर्मचारी आलेही, मात्र त्यांना या माकडांच्या टोळीतील एकाही माकडाला पकडता आलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)