समीर वानखेडे प्रकरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारांची ट्रिक- किरीट सोमय्यांचा आरोप #5मोठ्याबातम्या

विविध मराठी वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. वानखेडे प्रकरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारांची ट्रिक- किरीट सोमय्यांचा आरोप

समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ट्रिक असून अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरू होत्या, त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.

'एका अधिकाऱ्याची जात काढली जात आहे, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते याची लाज वाटायला हवी,' अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी टीका केली आहे.

अजित पवारांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू करण्यात आलं असून लक्ष विचलित करण्यात येत असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीआहे.

2. नीरज चोप्रा, रवी दहियासह 11 खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर

टोकियो ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसह एकूण 11 खेळाडूंना 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

भालाफेकपटू नीरज चोप्रा, क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू रवी दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकी संघाचा गोलकीपर श्रीजेश, सुमित अंतिल, अवनी लेखरा, कृष्णा नागर आणि मनीष नरवाल यांना खेलरत्न जाहीर झालाय.

ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धांमुळे या पुरस्कारांची घोषणा उशीरा करण्यात आली.

यावर्षीच्या खेलरत्न विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा समावेश आहे. या सोबतच 35 अर्जुन पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

3. राज्यात सुरू होणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

राज्यातल्या गावात शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत - पाणंद रस्ते योजना' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

राज्यात शेत, पाणंद रस्ते योजना राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करून यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना' असं नाव देण्यात आलंय.

राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते याद्वारे बांधण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

4. मुंबईतल्या 10 हजार सोसायट्यांमध्ये 100% लसीकरण

100 टक्के लसीकरण झालेल्या मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये मुंबई महापालिका 'फुल्ली वॅक्सिनेटेड' चा विशेष लोगो लावणार आहे.

मुंबईतल्या 10 हजार सोसायट्यांमध्ये सर्व रहिवाशांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. येत्या जानेवारीपर्यंत मुंबईतलं लसीकरण पूर्ण होईल असा दावा मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने केलाय.

मुंबईतल्या इमारतीत राहणाऱ्या वा इथे काम करणाऱ्या सर्वांचं लसीकरण झालं असेल, तर त्या सोसायटीवर हा विशेष लोगो लावण्यात येणार आहे. असं केल्याने इतरांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी बीएमसीला आशा असल्याचं एबीपी माझाने म्हटलंय.

5. अग्नी - 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

5000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केली आहे.

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली आहे.

या क्षेपणास्त्रातल्या विशेष तंत्रज्ञानामुळे याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रं लावता येऊ शकतात आणि यामुळे एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेतला जाऊ शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)