क्रांती रेडकर म्हणतात, कायदा सुव्यवस्थेवर विश्वास; तपासात सहकार्य करणार

"समीर वानखेडेंवरील आरोप चुकीचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. हे फक्त आरोप आहेत. आम्ही CBI कारवाईत पूर्ण सहकार्य करतोय. कायदा सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करायला तयार आहोत", असं समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. आर्यन खान प्रकरणाशी संबंधित हा भ्रष्टाचाराचा गुन्हा आहे.वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना क्रांती यांनी आपली भूमिका मांडली.

क्रांती यांनी घेतली होती रामदास आठवलेंची भेट

समीर वानखेडे कार्यक्षम अधिकारी आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करू नये. वानखेडे कुटुंबीयांना बदनाम करण्याचं षड्यंत्र थांबवा, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आज (31 ऑक्टोबर) रामदास आठवले यांची भेट घेतली होती. त्यानंतर रामदास आठवले माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, "नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवला आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते मुस्लीम कधीच नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. त्यांनी सर्व कागदपत्रं आम्हाला दाखवली आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत."

ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी क्रांती रेडकर यांना वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. महाविकास सरकार आल्यापासून विरोधी पक्षाला कुणी विचारत नाही."

तर अभिनेत्री क्रांती रेडकर यावेळी म्हणाल्या, "कोणाचा नवरा कोण आहे, तो हिंदू आहे की मुस्लीम, याविषयी नवाब मलिक यांना करायचं आहे? ते ड्रग्जविषयी बोलत आहेत काय? समीर वानखेडेंच्या खासगी आयुष्याविषयी तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे? नवाब मलिक यांचे जावई समीर खानकडे किती ड्रग्ज मिळालं हे मात्र कुणीच विचारत नाही."

या पत्रकार परिषदेत समीर वानखेडेंच्या वडिलांनी त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीची कागदपत्रं इत्यादी दाखवून आपण ज्ञानदेव कचरूजी वानखेडे असून कुठल्याही प्रकारचं धर्मांतर केलं नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांच्या या आरोंपावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "रामदास आठवले हे वानखेडे कुटुंबाच्या सोबत उभे राहिले आहेत. एखाद्या दलित व्यक्तीचा हक्क एखाद्यानं हिरावून घेतला असेल आणि दलित नेता त्याला पाठिंबा देत असेल, तर याशिवाय दुसरं दुर्दैव असू शकत नाही."

क्रांती रेडकर कोण आहेत?

'माझे पती खोटे नाहीत, मग आम्ही हे का सहन करायचं. रोज रोज का सिद्ध करायचं? ट्विटर कोर्ट आहे का? ज्या माणसाचा 15 वर्षांचा रेकॉर्ड क्लीन आहे, त्याच्याबद्दल असं का म्हटलं जाईल?' असं म्हणत अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपले पती आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं समर्थन केलं आहे.

पतीच्या कामापासून दूर राहणाऱ्या क्रांती माध्यमांसमोर त्यांच्या कामाबद्दल व्यक्त झाल्या. याला कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ एक केलेले आरोप.

2 ऑक्टोबरला रात्री एनसीबीनं मुंबईजवळ एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी कारवाई केली आणि काही जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये एक नाव होतं अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. या कारवाईसोबतच ती करणाऱ्या अधिकाऱ्याची, समीर वानखेडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि समीर वानखेडेंवर खंडणीचे तसेच वैयक्तिक स्वरूपाचेही आरोप केले.

नवाब मलिकांच्या या आरोपांनंतर समीर वानखेडेंचं खाजगी आयुष्यही प्रकाशझोतात आलं आणि मराठी चित्रपटसृष्टीतला नावाजलेला चेहरा असलेल्या क्रांती रेडकर या पत्नीच्या भूमिकेतून समीर वानखेडेंची बाजू मांडताना दिसायला लागल्या.

क्रांती यांनी आधी सोशल मीडिया आणि नंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपले पती आणि कुटुंबीयांवरील आरोपांचं खंडन केलं आहे.

क्रांती यांनी थेट मलिकांविरोधात भूमिका घेतल्यानंतर यांच्या कौटुंबिक आयुष्यासोबतच त्या कोण आहेत? त्यांची कारकीर्द कशी होती? असे प्रश्न अनेकांना पडले.

क्रांती यांचं करिअर

क्रांती रेडकर या मुंबईच्याच. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं. रामनारायण रुईया कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली.

2000 साली 'सून असावी अशी' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2003 साली प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटात त्यांनी एक लहान, पण महत्त्वाची भूमिका साकारली.

2006 साली आलेल्या 'जत्रा- ह्याला गाड रे त्याला गाड' या चित्रपटात क्रांती यांची भूमिका होती. याच चित्रपटातल्या कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्यानं क्रांती यांना लोकप्रियता मिळवून दिली.

क्रांती यांनी माझा नवरा, तुझी बायको, शिक्षणाच्या आयचा घो, फुल थ्री धमाल, लाडीगोडी, ऑन ड्युटी 24 तास, नो एन्ट्री- पुढे धोका आहे, खो-खो अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

2014 साली क्रांती यांनी 'काकण' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं.

क्रांती यांचं वैयक्तिक आयुष्य

2017 साली क्रांती यांचा समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला होता.

क्रांती आणि समीर यांना झिया आणि झायदा या दोन जु्ळ्या मुली आहेत.

काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्वीट केला. समीर यांची पहिली पत्नी मुस्लिम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावाही मलिक यांनी केला होता.

मलिक यांच्या या आरोपानंतर क्रांती यांनी समीर आणि त्यांच्या लग्नातले काही फोटो ट्वीट केले.

"मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केलेलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं होतं. माझ्या सासूबाई आज हयात नाहीत. समीरचं आधीचं लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. त्याने 2016 साली घटस्फोट घेतला. आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार 2017 साली लग्न केलं," असं क्रांती यांनी म्हटलं होतं.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गोवलं गेलं नाव

काही वर्षांपूर्वी आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये क्रांती रेडकरचं नाव गोवण्यात आलं. एका वृत्तवाहिनीने आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये क्रांतींचा सहभाग असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं.

दुबईमधील एका हॉटेलमध्ये क्रांती रेडकर ही क्रिकेटपटू श्रीशांत सोबत सापडली असल्याचं या वृत्त वाहिनीने म्हटलं होतं.

मात्र क्रांतीने हा आरोप फेटाळून लावला होता. "ज्यावेळी हे वृत्त प्रसिद्ध झालं त्यावेळी मी कोकणातील कुडाळमध्ये माझ्या 'काकण' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. मग मी या स्पॉट फिक्सिंगच्या पार्टीत कशी उपस्थित असेन?" असं त्यांनी म्हटलं होतं.

'मी कधीही श्रीशांतला भेटले नाहीये आणि आमचे कोणी कॉमन फ्रेंडही नाहीयेत,' असंही क्रांती यांनी सांगितलं होतं.

क्रांती यांनी म्हटलं होतं की, मला 'स्पॉट फिक्सिंग' म्हणजे काय हे पण माहीत नाही.

एनसीबीचे कौतुक करणारी पोस्ट

क्रांती रेडकर यांनी एनसीबीचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. ती खूप चर्चेत आली होती.

"घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करणं सोपं आहे. मात्र, तुम्ही हे करत असताना एनसीबीचे लोक आघाडीवर राहून लढा देतायत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा," अशी पोस्ट लिहीत अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कामाचं कौतुक केलं आहे.

क्रांती या पोस्टमध्ये म्हणते, "तुमच्या सगळ्यांच सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळ्यांनीच एनसीबीचं काम आणि त्यांनी टाकलेल्या धाडींचं कौतुक केलंत. मात्र, फक्त बॉलिवूडचा उल्लेख आला की लोक यात रस घेतात. मात्र, माध्यमांनी यापूर्वीही एनसीबीने मोठ्या गँगस्टर्सना पकडल्याबद्दल वार्तांकन केलंय याचीही सगळ्यांनी नोंद घ्यावी.

"समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी एनसीबी फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. मी अशा लोकांना म्हणेन की त्यांनी जरा अभ्यास करावा. यापूर्वीची आकडेवारी गोळा करावी. घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करणं सोपं आहे. मात्र, तुम्ही हे करत असताना एनसीबीचे लोक आघाडीवर राहून लढा देतायत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा," असं क्रांती म्हणते.

यापूर्वी क्रांतीने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी ती म्हणाली होती की, "माझे पती देशासाठी त्यांचं आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतायत. मला त्यांचा अभिमान आहे. तो यापूर्वीही निष्ठेने काम करत होता. मात्र, आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने तो प्रकाशझोतात आलाय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)