'जलयुक्त शिवार प्रकरणाला अद्याप क्लिन चीट नाही, भाजपने सेलिब्रेट करू नये'- पाटील

जलयुक्त शिवार प्रकरणात कोणतीही क्लिन चीट देण्यात आलेली नाही, असा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

आज (बुधवार, 27 ऑक्टोबर) आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाटील माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, "यासंदर्भात खुलासा आधीच करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने कोणत्याही क्लिन चीटच्या अभावी अशा पद्धतीने सेलिब्रेशन करण्याची आवश्यकता नाही. चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानंतरच त्यावर बोलणं योग्य राहील," असं पाटील म्हणाले.

"कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात आज चर्चा झाली होती. या प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली नाही, असं विभागानेही स्पष्ट केलं. या संदर्भात चौकशीच अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पूर्ण चौकशी झाल्यानंतरच यावर बोलणं योग्य होईल," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

जलयुक्त शिवार योजना ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात सर्वत्र राबवण्यात आली होती. ही फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना मानली गेली.

पण, फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर या योजनेविषयी चौकशी लावण्यात आली होती.

जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात तक्रारी व आरोप करण्यात येत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

याच समितीचा अहवाल आला असून त्यांनी फडणवीस सरकारला क्लिन चीट दिली आहे, असा दावा माध्यमांवरील बातम्यांमध्ये करण्यात येत होता.

पण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या बातम्यांना पूर्णविराम दिलं आहे. या प्रकरणातील चौकशी अजून सुरू असल्यामुळे क्लिन चीट देण्याचा प्रश्नच नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

दरम्यान, जलयुक्त शिवार चौकशीत क्लिन चीट मिळाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या आधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

आज दुपारी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "अहवाल मी अजून बघितलेला नाही. पण मला माध्यमातून जे कळत आहे. त्याने मला अतिशय आनंद होत आहे. कारण ही जनतेची योजना आहे. मुळात ही जनतेने राबवलेली योजना आहे. 6 लाख कामं झाली आहेत."

ते पुढे म्हणाले, "यापूर्वीही उच्च न्यायालयाने देशभरातील एक्सपर्टची एक समिती तयार केली होती. त्या समितीने ही योजना कशी योग्य आहे हे आणि कसं योग्य काम यात झालं आहे, याचा रिपोर्टही दिला होता. तो रिपोर्टही उच्च न्यायालयानेही स्वीकारला होता."

"योजनेबाबत काही तक्रारी असू शकतात, हे खरं आहे. त्याबाबत चौकशीही झाली पाहिजे, अशी मी घोषणा मी स्वत: केली होती. 6 लाख कामे झाली आहेत त्यापैकी 600 कामांची चौकशी होणं ही काही मोठी गोष्ट नाही. जी चुकीची गोष्ट आहे त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्याकरता योजनेला बदनाम करणं योग्य ठरणार नाही," असं फडणवीस म्हणाले.

या प्रतिक्रियेचा व्हीडिओही फडणवीस यांनी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला होता. पण संध्याकाळी मात्र जयंत पाटील यांनी अशी कोणतीही क्लिन चीट दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)