You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
परमबीर सिंह यांचा पगार थांबवण्याचा निर्णय, फरार घोषित करणार? #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. परमबीर सिंह यांचा पगार थांबवण्याचा निर्णय, फरार घोषित करण्याचाही निर्णय घेणार?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. त्यानंतर परमबीर यांच्यावरही आरोप केले गेले.
या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह हे गायब आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरासमोर नोटीस लावून त्यांना हजर होण्यास सांगितलं होतं, मात्र ते उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सकाळनं ही बातमी दिली आहे.
अँटेलिया स्फोटक प्रकरणानंतर परमबीर यांनी अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर पुढच्या काळात त्यांच्यावरही आरोप झाले. त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात गुन्हेही दाखल झाले.
परमबीर हे मे महिन्यात सुटीवर गेले होते. पण त्यानंतर अजूनपर्यंत ते परतलेले नाहीत. तसंच त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल गृह विभागालाही काही कळवलेलं नाही.
2. 'एनसीबी'च्या कारवायांबाबत मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र- नवाब मलिक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर (एनसीबी) होणारे आरोप, या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारा पदाचा दुरुपयोग आदी तक्रारींबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी (26 ऑक्टोबर) सांगितलं.
समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी करतानाच एनसीबीवर गंभीर आरोप केले.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"मुंबईतील चित्रपट उद्योग हा हॉलीवूडनंतरचा जगातला एक मोठा उद्योग आहे. लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये तीन-चार टक्के वाटा आहे. जर या पद्धतीने या उद्योगाला बदनाम केले तर त्याचा परिणाम काही अभिनेत्यांवरच होईल असं नाही, तर लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. ते लाखो लोक अडचणीत येतील," याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता व्यक्त केल्याचं मलिक यांनी सांगितलं.
3. 'तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला'- चित्रा वाघ
मुंबई क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणी कारवाई करणाऱ्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत.
बॉलिवूडमधील लोकांकडून खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचे आरोप मलिकांनी केले आहेत. या आरोपांना स्वत: समीर वानखेडे, त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.
आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या आरोपांवरुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय.
"तुम्ही त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानित केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडिलांना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही. कर्तव्य बजावत राहीला… तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला," असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलंय.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट करुन आपण क्रांती रेडकर सोबत असल्याचं जाहीर केलंय.
"आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्यासोबत आहे," असं चित्रा वाघ यांनी आपल्या व्हीडिओत म्हटलं आहे.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
4. लशीचे दोन डोस घेतल्याशिवाय 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार नाही लोकलचा पास
वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणी पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यापूर्वी अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अशा कर्मचाऱ्यांना लसीकरणातून सूट दिली गेली होती. मात्र, आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय या कर्मचाऱ्यांना लोकल वा रेल्वेचा पास मिळणार नाही.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
राज्य शासनातर्फे यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होता.
परंतु आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच काळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधिताना लस अनिवार्य करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने याच महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या निश्चित केली होती.
5. काँग्रेस नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा दूर ठेवून पक्षासाठी काम करावं- सोनिया गांधी
काँग्रेस नेत्यांनी पक्ष शिस्त पाळावी, एकत्र यावं, वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पक्ष संघटनेसाठी काम करावं, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं आहे. दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या मंगळवारी (26 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले. काँग्रेस मुख्यालयातून मांडल्या जाणाऱ्या भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. भाजप-संघाच्या द्वेषाच्या विचारधारेचा सामना करायचा आहे असंही त्यांनी नेत्यांना सांगितलंय.
अनेक धोरणात्मक बाबींवर आपल्याच नेत्यांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याचंही सोनिया यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षात शिस्त आणि एकी आवश्यक आहे, असं सोनिया यांनी म्हटलं.
एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)