जलयुक्त शिवार योजनेच्या 1000 कामांची चौकशी होणार #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. जलयुक्त शिवार योजनेच्या 1000 कामांची चौकशी होणार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेतील 1000 कामांची चौकशी होणार आहे. ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.

या योजनेतील कामांची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांची समिती स्थापन केली होती.

या समितीने जलयुक्त शिवार योजनेतील 1000 कामांची चौकशी करावी अशी शिफारस केली आहे.

यानुसार 900 कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तर 100 कामांची विभागीय चौकशी होणार आहे.

भारतीय जनता पार्टीने या घडामोडींवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला बदनाम करताना अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचे पाप करू नये असं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी मांडले आहे.

2. सीएए कायदा मुस्लिमांविरोधात नाही- मोहन भागवत

नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट (सीएए) मुस्लिमांविरुद्ध तयार करण्यात आलेला नाही.

या कायद्यामुळे देशातील मुस्लिमांचे नुकसान होणार नाही असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

गुवाहाटी येथिल एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

देशाच्या फाळणीनंतर अल्पसंख्याकांची काळजी घेऊ असे वचन देण्यात आले होते, ते भारताने पाळले मात्र पाकिस्तानने पाळलेले नाही असे भागवत म्हणाले आहेत.

सीएए आणि एनआरसीचा हिंदू-मुस्लीम विभाजनाशी संबंध नाही, त्याला राजकीय लाभासाठी धार्मिक रंग देण्यात आला असंही ते म्हणाले. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

3. मुंबईकरांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आंदोलन करू- प्रवीण दरेकर

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आता लोकल सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे. गेले अनेक दिवस लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी होत आहे.

आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये या मुद्द्यावरून नवा संघर्ष सुरू होईल अशी चिन्हं दिसत आहेत.

भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेप्रवास करण्याची मुभा द्या अन्यथा प्रत्येक स्टेशनवर आंदोलन करू असं दरेकर म्हणाले आहेत.

लोक खूप लांबून टॅक्सी, खासगी गाडीने प्रवास करतात, त्यात पैसे खर्च होतात.

आता हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे, त्यामुळे आठवडाभरात निर्णय झाला नाही तर स्टेशनवर आंदोलन करू असा इशारा दरेकर यांनी दिला आहे. ही बातमी एबीपी माझानं दिली आहे.

4. मुख्यमंत्र्यांनी गाडी चालवल्यामुळे कोरोना गेला का?- निलेश राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेल्यामुळे महाराष्ट्रातला कोरोना गेला का? असा प्रश्न माजी खासदार निलेश राणे यांनी विचारला आहे.

तुम्हाला रिझल्ट देण्यासाठी खुर्चीवर बसवलंय, गाडी चालवण्यासाठी नाही. असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

'पावसामुळं 25 लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडेनात, हात टेकले यांच्यासमोर' अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यंत गेले असते तर लोटांगण घातलं असतं असं मत भातखळकर यांनी व्यक्त केलं आहे.

5. 31 ऑगस्टला दहीहंडी होणार-मनसे

कोरोनाच्या काळामध्ये गणेशोत्सव, वारी, दहीहंडी अशा सण-उत्सवांबाबतीत विविध प्रकारचे नियम तयार करण्यात आले आहेत.

मात्र यावर्षी 31 ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी होणार असा निर्धार मनसेने व्यक्त केला आहे.

मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी 31 ऑगस्ट रोजी खबरदारी घेऊन दहीहंडी साजरी करू, असे स्पष्ट केले आहे.

याबाबत शिवसेना प्रवक्ता सचिन अहिर म्हणाले, "दहीहंडीची सर्वपक्षीय बैठक झाली आहे. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रतीकात्मक गणेश उत्सव याबरोबरच वारी देखील खूप चांगली झाली. कोणी जर काही राजकारण करत असेल तर योग्य नाही. दोन डोस झाले असतील तर परवानगी द्या असं म्हणत असतील तर हे कोण कसं ठरवणार? प्रत्यक्षपणे हे ठरवणं शक्य होणार नाही." न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)