पावसाळी अधिवेशन: मोदी म्हणाले 'दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही'

संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गदारोळ झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एनडीएने दलित, महिला आणि ओबीसींना स्थान दिले आहे. यावरून मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. या वर्गातील लोक मंत्रिपदी विराजमान झाले ही गोष्ट विरोधकांना बघवक नाही त्यामुळे ते गोंधळ करत आहेत अशी टीका मोदींनी केली.

या गदारोळानंतर संसदेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

संसदेचचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालेल.

लोकसभेकडून जारी झालेल्या पत्रकात असं म्हटलंय की "सतराव्या लोकसभेचं सहावं अधिवेशन 19 जुलैला सुरू होऊन 13 ऑगस्टला संपेल."

दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकाच वेळी होत असलं तरी या अधिवेशनात कोव्हिडसंबंधीचे सगळे नियम पाळण्याच्या सूचना आहेत.

या अधिवेशनात एकूण 23 विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांमध्ये 6 जुनी तर 17 नवी विधेयकं आहेत.

पेन्शन फंडसंदर्भात सरकारनं बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या त्यानुसार एनपीएस ट्रस्ट पेन्शन फंडापासून वेगळं करणारं विधेयक, सामान्य लोकांच्या बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणारं ठेव विमा दुरुस्ती विधेयक ही बिलं मांडली जातील.

तसेच, वीजेच्या वितरणात खासगी कंपन्यांनाही अधिक मुभा देणारं वीज वितरण दुरुस्ती विधेयक आणि डीएनए तंत्रज्ञान वापर नियमन विधेयक- डीएनए तंत्रज्ञानाचा वापर केवळ ठराविकच पद्धतीनं करता यावा विधेयक ही काही महत्त्वाची विधेयकं मांडली जातील आणि त्यावर चर्चा होईल.

पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. 'विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी सरकार तयार आहे. सर्वांनी मिळून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सकारात्मक पद्धतीने पार पाडू,' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएतल्या सदस्य पक्षांचीही बैठक रविवारी झाली.

विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या गोष्टींमुळे विरोधक सभागृहात आक्रमक होतील अशी शक्यता आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवता न येणं, लसीकरणाचा वेग या गोष्टींवरून सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता तर आहेच.

दुसरीकडे उत्तरप्रदेशचं लोकसंख्या वाढ नियंत्रण बिल आणि आताच समोर आलेलं पेगासस प्रकरण यावरून संसदेत विरोधक प्रचंड आक्रमक होऊ शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)