नाना पटोलेंची स्वबळाची भाषा ही त्यांची वैयक्तिक भूमिका की पक्षाची?

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चर्चेत आहेत. शरद पवारांनी त्यांच्याबद्दल केलेलं विधान असो वा त्यांनी स्वबळाचा दिलेला नारा असो त्याबद्दल चर्चा सुरू आहे. पण त्यात एक प्रश्न अनेकांना पडत आहे, तो म्हणजे नाना पटोले आपल्या मनातलं बोलत आहेत की ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे?

"नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं पक्ष वाढवण्याचा त्यांचा विचार गैर काही नाही. उलट नाना पटोलेंच्या अशा आक्रमक भूमिकेमुळं काँग्रेस राज्यात पुन्हा दखलपात्र पक्ष बनत आहे. त्यासाठी पक्षानंच त्यांना बळ दिलेलं असणार," असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये नाना पटोलेंनी अनेकदा स्वबळाची वक्तव्यं केली आहेत. पण यावेळी त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसबरोबर दगा झाल्याचं म्हटलं आहे. तसंच स्वबळाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचंही पटोले म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेकदा काँग्रेसची नाराजी समोर आलेली आहे. कधी मंत्र्यांची तर कधी नेत्यांची. सरकारमधील तीन पक्षांमध्ये काँग्रेस कायम नाराज असल्याचं जाणवत होतं.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला कमी महत्त्व दिलं जात असल्याचंही अनेकदा काही मंत्री आणि नेत्यांकडून म्हटलं गेलं. त्यात नाना पटोलेंनी वारंवार अशाप्रकारे स्वबळाचा नारा दिल्यानं आता, त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रियादेखील आल्या. या मुद्द्यावरून कुरबुरीही झाल्या. काँग्रेसचे इतर नेते मात्र याबाबत सावध भूमिका देताना दिसतात.

त्यामुळं नाना पटोले वारंवार जी भूमिका मांडत आहेत ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे की, त्यांच्या पक्षाची? असा प्रश्न निर्माण होतो.

काय म्हणाले नाना पटोले...

नाना पटोले यांनी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असं स्पष्ट केलं आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा तसं म्हटलं आहे. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या चर्चेचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आम्ही स्वतंत्र लढणार आहोत असं जाहीर केलं. स्वतंत्र लढण्यासाठी आम्ही आमची तयारी सुरू केली आहे, असे संकेतही नाना पटोले यांनी दिले.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं, "आम्ही मित्रपक्षांनाही (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) यामाध्यमातून आमचा संदेश पोहोचवला' असल्याचं म्हटलं. आम्ही याबाबत आताच जाहीर करत आहोत. ऐनवेळी सांगितल्यास तो पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार ठरेल."

बुधवारीदेखील त्यांच्या या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर ऐनवेळी दगा झाल्याचंही ते म्हणाले.

हे सगळं बोलत असतानाच राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नसल्याचंही काँग्रेसकडून स्पष्टपणे सांगितलं जात आहे.

पटोलेंना पक्षाचा पाठिंबा

नाना पटोलेंची भूमिका आणि त्यांच्या पक्षाची भूमिका ही वेगळी नाही. उलट काँग्रेसच्या नेतृत्वानं त्यांना तशा प्रकारची मोकळीक दिली असल्याचं मत दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केलं.

''कोणत्याही पक्षानं स्वबळाचा नारा देण्यात काहीच गैर नाही. शिवसेनेनंही स्वबळावर भगवा फडकवण्याची भाषा केली आहे. त्यामुळं आगामी मनपा निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीनंही त्यात काही चुकीचं नाही,'' असंही आवटे म्हणाले.

पुणे लोकमत संपादक प्रशांत दीक्षित यांनीही याबाबत असंच मत व्यक्त केलं आहे. "पटोले हे अनुभवी नेते आहेत. त्यांना राजकारण बरोबर कळतं. त्यामुळं ते अशाप्रकारची वैयक्तिक भूमिका घेण्याची शक्यता नसून, पक्षाचीच ती गरज आहे."

"महाराष्ट्र हे काँग्रेससाठी पूर्वीपासून महत्त्वाचं राज्य राहिलेलं आहे. त्यामुळं राजकीयदृष्ट्या धोरण म्हणून पटोलेंची भूमिका पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे," असंही प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला बळकटी देणारी भूमिका

''30 वर्षांपूर्वी काँग्रेस सर्वव्यापी पक्ष होता आणि इतर पक्षांना स्वतःची जागा शोधावी लागत होती. पण सध्या काँग्रेसलाच स्वतःची जागा शोधावी लागत आहे. त्यामुळं पक्ष आघाडीवर आहे हे लोकांमध्ये बिंबवणं ही पक्षाचीच गरज असून, तेच पटोले करत आहेत,'' असं मत प्रशांत दीक्षित यांनी मांडलं.

पुढे दीक्षित म्हणतात, ''महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून ते नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होईपर्यंत काँग्रेसत सत्तेत आहे, हे दिसूनही येत नव्हतं. म्हणजेच काँग्रेस दखलपात्र नव्हतं. काँग्रेसला लॉटरी लागली किंवा आयती सत्ता मिळाली अशी वक्तव्यंही लोक करत होते."

काँग्रेसच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष असते आणि काँग्रेसही भूमिका घेताना दिसत आहे असं मत संजय आवटेंनी मांडलं.

"आता काँग्रेस दखलपात्र आहे. काँग्रेसची भूमिका पाहायला मिळते. ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण अशा विषयांत काँग्रेसची स्पष्ट भूमिका दिसत आहे. काँग्रेसला गांभीर्यानं घेतलं जात आहे, आणि ते काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे,'' असं मत संजय आवटे यांनी मांडलं.

काँग्रेसच्या मनातली शंका

नाना पटोले यांनी 2014 चा उल्लेख करत काँग्रेसबरोबर दगा झाल्याचं म्हटलं. तसंच नाना पटोले यांनी 2024 मध्येही काँग्रेसचीच सत्ता येणार असं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वातच केंद्रात सत्ता स्थापन होणार असंही पटोले म्हणाले.

''भाजपसारख्या पक्षासमोर आघाडी उभी करायची असेल तर काँग्रेससारखा प्रमुख पक्ष गरजेचा आहे. त्यानंतर इतर पक्ष सोबत घेऊन भाजपला आव्हान देणं शक्य होईल,'' असं मत दीक्षित यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस हा सर्व राज्यांमध्ये पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसच्या आमदार, खासदारांचे आकडे कमी झालेले असले तरी, 20 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवणारा तो देशातील प्रमुख पक्ष आहे. त्यामुळं काँग्रेसची शक्ती कमी झालेली नसल्याचंही ते म्हणाले.

भविष्यातही 2014 ची पुनरावृत्ती होण्याची शंका काँग्रेसच्या मनात आहे आणि ती शंका गैर नसल्याचं मत आवटे यांनी मांडलं. ''आम्हाला कोणावर विश्वास नाही, त्यामुळं आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत, हे काँग्रेस उघडपणे सांगत असेल तर त्यात गैर काहीच नाही,'' असंही ते म्हणाले.

मित्रपक्षांची भूमिका

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र आहेत. हा मुद्दा भविष्यातील राजकारणाची नांदी असल्यानं काँग्रेसच्या या भूमिकेवर या दोन्ही पक्षांच्या प्रतिक्रियांकडेदेखील सर्वांचं लक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले शरद पवार यांनी या मुद्द्यावरही त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नसल्याचं म्हणत पवारांनी हा विषय टोलवून लावला.

शिवसेना आणि त्यातही संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांचं मधल्या काळात बिनसल्याचं पाहायला मिळालं होतं. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून स्वबळाच्या मुद्द्यावर काँग्रेसला चिमटेही काढले आहेत.

''नानांच्या बोलण्यानं दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का? नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्यानं थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ! असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चिमटा काढला. ''तुम्ही कशाचाही विचार न करता आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर तुमच्याकडे येऊ,'' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

एकूणच पटोलेंची भूमिका हीच काँग्रेसची भूमिका आहे किंवा नाना पटोलेंना काँग्रेसनंच बळ दिलंय असं म्हणायला हरकत नाही.

किंबहुना नाना पटोलेंची नियुक्तीच या माध्यमातून पक्षाला आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी झाली असल्याचं विश्लेषण जाणकारांनी केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)