रवींद्र बऱ्हाटे: माहिती अधिकार कार्यकर्ता कसा बनला मोक्काचा आरोपी?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी

फरार असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे मंगळवारी (6 जुलै) पुणे पोलिसांना शरण आले. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ पुणे पोलीस बऱ्हाटेंच्या शोधात होते.

जमीन लाटणे, फसवणूक, धमकावणे अशा विविध गुन्हांबरोबरच मोक्काचा गुन्हा देखील बऱ्हाटे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बऱ्हाटे आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात 12 गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत बऱ्हाटेंच्या 32 साथीदारांना अटक केली असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयु्क्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र बऱ्हाटे हे पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करत होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली होती.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी जुलै 2020 मध्ये सर्वप्रथम कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये बऱ्हाटे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या केसमध्ये बऱ्हाटे यांच्याबरोबरच बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन त्याचबरोबर अमोल चव्हाण आणि एका महिलेचा समावेश होता.

यानंतर बऱ्हाटे आणि त्यांच्या साथीदारांवर बेकायदा सावकारी, आर्थिक फसवणूक, खंडणी, धमकावणे असे अनेक गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्हाटे हे फरार झाले होते. गेल्या वर्षभरापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.

नुकतच पोलिसांनी त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयूर, पितांबर धिवर, अॅड. सुनील मोरे यांना अटक केली होती.

जवळच्या लोकांना अटक केल्याने 6 जुलैला बऱ्हाटेंनी पोलिसांशी संपर्क केला आणि पोलिसांना सरेंडर केले.

बऱ्हाटेंच्या विरोधात खोट्या तक्रारी ?

बऱ्हाटेंच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारी खोट्या असल्याचं बऱ्हाटे यांचे वकील तुषार चव्हाण यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

चव्हाण म्हणाले, ''बऱ्हाटे यांनी अनेक गैरव्यवहार समोर आणले. तसेच अनेकांच्या विरोधात तक्रारी देखील दाखल केल्या आहेत.

''ज्यांच्या विरोधात बऱ्हाटे यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत तसेच ज्यांचे घोटाळे बाहेर काढले त्यांनी बऱ्हाटेंच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत."

"त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात करण्यात आलेल्या अवैध बांधकामाविरोधात तसेच मांजरी येथील 3 हजार अवैध बांधकामांविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे.

''मोक्का कायदा बऱ्हाटे यांना लागू होत नाही आम्ही कोर्टापुढे ते निर्दोष असल्याचं सिद्ध करू,'' असंही चव्हाण म्हणाले.

कोण आहेत रवींद्र बऱ्हाटे ?

रवींद्र बऱ्हाटे हे मूळ बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करत होते. माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवून त्यांनी अनेक राजकारणी आणि उद्योजकांबद्दलची माहिती उजेडात आणली होती.

पत्रकार परिषदा घेऊन गैरव्यवहारांची माहिती ते माध्यमांना देत होते. त्या माहितीच्याद्वारे अनेकांवर कारवाई देखील झाली होती. त्यांच्या नावाचा दबदबा तयार झाला होता.

पण याच माहितीचा गैरवापर करुन लोकांची फसवणूक, खंडणी, बेकायदा सावकारी केल्याचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले.

'पुण्यातील जुना माहिती अधिकार कार्यकर्ता'

पुण्यातील पुणे मिरर वृत्तपत्रात अनेक वर्षांपासून क्राईम बीट कव्हर करणाऱ्या पत्रकार अर्चना मोरे बऱ्हाटेंविषयी माहिती देताना सांगतात, ''पुण्यातला सर्वांत जुना माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून रवींद्र बऱ्हाटे ओळखले जायचे. ते प्रेस घेणार म्हटलं की सर्व मीडिया हजर असायचा. एकेकाळी बऱ्हाटेंची माहिती अत्यंत विश्वासार्ह मानली जायची."

मोरे यांच्या म्हणण्याला एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी देखील दुजोरा दिला आहे.

ते सांगतात, "राजकारण्यांनी सत्तेचा उपयोग करुन जे घोटाळे केले ते सुरुवातीला बऱ्हाटे यांनी दाखवून दिले. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करुन त्यांनी अनेकांची मदत केली.

"तर दुसरीकडे याच कायद्याचा दुरुपयोग केल्याने त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी येण्यास सुरुवात झाली. माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करुन त्यांनी मालमत्ता जमवल्याचे समोर आलं,'' असं गोंजारी सांगतात.

बऱ्हाटे माहिती अधिकाराचा वापर कसे करायचे?

रवींद्र बऱ्हाटे यांचा मूळ व्यवसाय हा बांधकामच होता. त्यामुळे त्यांना बांधकामाशी संबंधित कायद्यांची माहिती होती. महसूल मधील कायदे त्यांना माहित होते. तसेच जमिनीचे कायदे, जमीन व्यवहारात घोटाळे कसे केले जातात याबाबत त्यांना माहिती होती.

वतनात मिळालेली जमीन विकायची असेल किंवा विकत घ्यायची असेल तर काय नियम असतात याची देखील त्यांना जाण होती. याचाच वापर करुन ते माहिती अधिकारात माहिती मिळवत होते.

माहिती अधिकारात माहिती मिळवत असतानाच दुसरीकडे अनेकांना ब्लॅकमेल केल्याची प्रकरणं समोर आली. याबाबत अर्चना मोरे म्हणतात, ''शैलेश जगताप, रवींद्र बऱ्हाटे आणि इतर साथीदार यांची एक टोळी निर्माण झाली होती. ते एखादा वादात असलेला जमीनीचा प्लॉट शोधत. तो प्लॉट मिळवून देण्याचं आश्वासन देऊन त्याच व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे अनेकांच्या रडारवर ते आले होते.

भाजपच्या नेत्यानं बऱ्हाटेंचे पाय का धरले होते?

12 ऑक्टोबर 2018 मध्ये एका केबल कंपनीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तत्कालिन आमदार योगेश टिळेकर यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.

हडपसर भागात फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी टिळेकर यांनी 'व्हिजन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला 50 लाख रुपये मागितल्याचा आरोप टिळेकर यांच्यावर करण्यात आला होता. बऱ्हाटे हे या कंपनीचे एरिया मॅनेजर म्हणून काम पाहत होते.

टिळेकर हे भाजपचे आमदार होते. 2018 मध्ये राज्यात भाजपचे सरकार होते. टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. टिळेकर हे त्यांच्याविरोधात तक्रार दिली जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते.

टिळेकर हे तक्रारदार बऱ्हाटे यांना भेटायला गेले होते. त्यावेळी बोलताना टिळेकर यांनी बऱ्हाटे यांचे पाय धरले होते. याबाबतचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. बऱ्हाटे यांचे पाय धरल्याचे टिळेकर यांनी देखील मान्य केले होते. बऱ्हाटे यांना समजवण्यासाठी गेल्याचा दावा टिळेकर यांनी त्यावेळी केला होता.

दोन हजाराहून अधिक कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे

कोथरुडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेंची विविध ठिकाणी असलेली मालमत्ता जप्त केली. त्यांच्या घराची झडती घेताना पोलिसांना 2 हजाराहून अधिक कोटींच्या रकमेची कागदपत्रे, कोरे बॅंकेचे चेक सापडले.

बऱ्हाटेंकडे 2 हजार कोटींहून अधिक रकमेची अवैध मालमत्ता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. बऱ्हाटेंना अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यातून नेमका आकडा समोर येण्याची शक्यता आहे.

बऱ्हाटेंना पोलिसांनी बुधवारी (7 जुलै) न्यायालयात हजर केले त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)