सुहास यतिराज : पॅरालिम्पिक पदक पटकावणारे जिल्हाधिकारी

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, भारतीय भाषा

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताचे पॅरा बॅडमिंटन खेळाडू सुहास यतिराज यांनी रौप्यपदक पटकावलं आहे.

सुहास हे गेल्या कित्येक महिन्यांपासून पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागले होते. पण सुहास यांची ओळख केवळ पॅरालिम्पिक खेळाडू म्हणूनच नाही, तर त्यांची आणखी एक ओळख आहे.

सुहास यतिराज हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) म्हणून कार्यरत आहेत.

ते 2007 च्या बॅचमधून उत्तर प्रदेश कार्यक्षेत्रात रूजू झाले होते. दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुद्धनगर (नोएडा) येथे ते सध्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.

दोन गोष्टींचं आव्हान

सुहास यांच्याकडे नोएडाचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आली. त्यावेळी नोएडाची परिस्थिती अत्यंत बिकट होती.

दरम्यान याच काळात सुहास यांना पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतही सहभाग नोंदवायचा होता.

खरंतर सामान्य दिवसांमध्येही IAS अधिकारीपदाची जबाबदारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून सराव या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणं अतिशय अवघड काम आहे.

पण सुहास यांनी आपल्या पद्धतीने हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे.

सुहास यतिराज यांनी कोव्हिड-19 नियंत्रणासोबतच पॅरालिम्पिक स्पर्धेची तयारीही केली.

दिवसभर सर्वांना विविध प्रकारचे आदेश देणारा अधिकारी आणि संध्याकाळी आपल्या प्रशिक्षकाकडून खेळाचे बारकावे समजून घेणारा खेळाडू अशा दोन्ही भूमिका यतिराज यांनी पार पाडल्या.

टोकियोला रवाना होण्यापूर्वी यतिराज यांनी बीबीसी न्यूजशी विशेष संवाद साधला होता.

त्यावेळी ते म्हणाले, "जेव्हा आपलं काम आपल्याला आवडत नसतं, अशा वेळी दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये ताळमेळ बसवणं आपल्याला अवघड वाटतं. पण मला माझं काम आवडतं. बॅडमिंटन माझं पॅशन आहे. त्यामुळे मी कधीच थकत नाही किंवा बोअर होत नाही. दोन्ही गोष्टींसाठी मी वेळ काढतो.

प्रत्येक आघाडीवर कमाल

सुहास यतिराज यांचा जन्म कर्नाटकात झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांची बदली होत राहायची.

बीबीसीसोबत बोलताना सुहास म्हणाले, "गावातून शहरात बदली झाल्यानंतर अनेक शाळा अॅडमिशन देण्यात टाळाटाळ करायचे. त्यामुळेच वडील मला परिश्रम घेणं सुरू ठेव, असं सांगत राहायचे.

इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर काही काळ मी IT क्षेत्रात काम केलं. त्यानंतर परदेशात निघून गेलो. पण पुन्हा वाटलं की समाजासाठी काहीतरी करायला हवं. त्यासाठीची खरी संधी नागरी सेवेत आहे. त्यामुळे त्याची तयारी सुरू केली. पुढे मी IAS अधिकारी बनलो, मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण ही माझ्या आयुष्यातली एक बाजू आहे."

त्याव्यतिरिक्त दुसरी बाजू म्हणजे मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. IAS प्रशिक्षण सुरू होतं, तेव्हाही मी अॅकेडमीत जाऊन खूप सराव करायचो. स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचो. माझी पोस्टींग कुठेही झाली तरी मी बॅडमिंटन खेळणं सोडलं नाही."

जीव ओतून खेळात सहभाग

बीबीसीला 2017 मध्ये सुहास यांनी एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं, शालेय-महाविद्यालयीन काळात मी क्रिकेट खूप खेळायचो. मला बॅटिंग खूप चांगली जमायची. मी अनेक सामने खेळले. पण IAS बनल्यानंतर बॅडमिंटनकडे माझा ओढा वाढला.

एका पायात समस्या असल्यामुळे सुहास पॅराअॅथलीट खेळाडू म्हणून ओळखले जातात.

बीबीसीशी बोलताना त्यांनी बॅडमिंटनच नव्हे तर आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठीचे अनेक टिप्स सांगितले.

शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांचं उदाहरण देताना ते सांगतात, प्रा. हॉकिन्स यांच्यापेक्षा जास्त व्यंग असलेला व्यक्ती जगात क्वचितच तुम्हाला आढळेल. त्यांना चालता येत नसे. बोलता येत नसे. पण तरीही त्यांनी किती काय केलंय. मी तर पॅरा अॅथलीट आहे. त्यामुळे मी कारणं सांगत न बसता, पुढे गेलं पाहिजे."

करिअरचा विचार केल्यास सुहास यतिराज राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेले आहेत. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणारे ते भारताचे पहिले प्रशासकीय अधिकारीही बनले आहेत. त्यावेळी ते आझमगढचे जिल्हाधिकारी होते.

तो काळ आठवताना सुहास सांगतात, "मी 2016 मध्ये एशियन पॅरा चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झालो होतो. त्या सामन्यात मी घाबरत घाबरतच खेळत होतो. त्यामुळे मी खूप मागे राहिलो. दरम्यान, पाणी पिण्यासाठी एक छोटा ब्रेक होता. तेव्हा मी विचार केला, माझ्याकडे एक चांगली नोकरी आहे. मग मी घाबरून का खेळू. मी पराभूत होऊन मागे परतलो तरी माझ्याकडे नोकरी आहे. म्हणून मी तो सामना अतिशय मोकळेपणाने खेळला. त्यानंतर फक्त तो सामनाच नव्हे तर मी एशियाई चॅम्पियनही बनलो.

अवघड परिस्थितीतही लढून यश संपादित करणं ही सुहास यांची कला आहे. भारतात आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू आणि प्रशासकीय सेवेतील अधिकारी या भूमिका एकाचवेळी बजावणारे खेळाडू खूपच कमी असतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)