नीरज चोपडाला भर मुलाखतीत विचारला सेक्स लाइफबाबत प्रश्न, त्यानं म्हटलं...

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला भालाफेकपटू नीरज चोपडा याला एका कार्यक्रमात पुन्हा एकदा विचित्र किंवा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारण्यात आला.

द इंडियन एक्सप्रेसच्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात नीरजला इतिहासकार राजीव सेठी यांनी थेट त्याच्या सेक्स लाइफबाबत प्रश्न विचारला.

राजीव सेठी यांनी प्रश्न विचारताना नीरजला 'सुंदर' म्हटलं. आपला प्रश्न काहीसा वाह्यात वाटू शकतो, असंही म्हणतानाच त्यांनी कोट्यवधी लोकांना हा प्रश्न पडलेला असून ते विचारायला संकोच करतात असंही म्हटलं.

"अॅथलेटिक ट्रेनिंगमध्ये तुम्ही सेक्स लाईफचं संतुलन कसं राखता. मला माहिती आहे हा प्रश्न काहीसा वाह्यात आहे, पण त्यामागं एक गंभीर प्रश्नदेखील आहे," असं सेठी यांनी नीरजला विचारलं.

या प्रश्नाचं उत्तर देताना नीरज काहीसा अस्वस्थ झाल्यासारखा दिसला. "सर, सॉरी...फक्त सॉरी म्हणतो तुम्हाला. यावरूनच तुम्ही समजून घ्या, " असं उत्तर नीरजनं दिलं.

'उत्तर देण्याची इच्छा नाही'

त्यानंतर सेठी यांनी दुसरा एक प्रश्न विचारला.

"तुम्ही मला सांगा की, तरुण मुलं खेळामध्ये आहेत. सेक्स तर नैसर्गिक आहे, पण तुम्ही अॅथलेटिक ट्रेनिंगबरोबर याचं संतुलन कसं राखता यामागं अनेक संदेश आहेत," असं ते म्हणाले.

यानंतर नीरज चोपडानं कार्यक्रमाचं सूत्र संचालन करणारे 'इंडियन एक्सप्रेस'चे क्रीडा संपादक संदीप द्विवेदी यांना म्हटलं की, तुम्हीच याचं उत्तर द्या.

द्विवेदी यांनी म्हटलं, की चोपडा यांना या प्रश्नाचं उत्तर देण्याची इच्छा नाही.

त्यानंतर "मला माहिती होतं. हा प्रश्न विचारण्यासाठी मला माफ करा," असं सेठी म्हणाले.

"प्लीज सर, तुमच्या प्रश्नांवरून तर तसंही माझं मन उठलं आहे...प्लीज" असं नीरजनं म्हटलं.

त्यानंतर नीरज चोपडानं पुढच्या प्रश्नाकडं वळण्याची विनंती केली. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात नीरज चोपडा आणि बजरंग पुनियाला अनेक जणांनी वेगवेगळे प्रश्न विचारले.

सेठी यांच्या प्रश्नावर सोशल मीडियातून मोठी टीका झाली.

"जर तुम्हाला मलिष्का चुकीची वाटली असेल, तर राजीव सेठी यांनी आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे," असं रोझी नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिण्यात आलं.

"ही एलिट सोसायटी ज्या पद्धतीनं नीरज चोपडाबरोबर वर्तन करत आहे त्यामुळं मी दुःखी झाले आहे. त्यांना त्यांच्या सेक्स लाइफ आणि गर्लफ्रेंडबाबत प्रश्न विचारले जात आहेत," असं दीपिका नारायण भारद्वाज यांनी लिहिलं.

आधीही गर्लफ्रेंडबाबत प्रश्न विचारला होता

नीरज चोपडाला असे प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीतही त्याला गर्लफ्रेंड आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर नीरजनं, "सध्या स्पोर्ट्सवर फोकस करणार आहे," असं म्हटलं होतं.

त्यानंतरही अँकरनं गर्लफ्रेंड असली तरी खेळावर फोकस करता येऊ शकतो असं म्हटलं होतं.

नीरज चोपडानं त्यावर, 'वेळ येईल तेव्हा पाहू' असं उत्तर दिलं.

या व्हीडिओचीही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती, तसंच त्यावर भरपूट टीकाही झाली होती.

काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात झूम कॉलवर नीरज चोपडा दिसत होता आणि रेड एफएमच्या कार्यालयात 'उडे जब-जब जुल्फे तेरी, कवारियों का दिल मचले, जिंद मेरिए...' गाण्यावर काही मुली डान्स करताना दिसत होत्या.

नीरज चोपडा शांतपणे हा डान्स पाहत होता आणि काही बोलण्याच्या स्थितीतही नव्हता. या व्हीडिओवरूनही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आणि #Malishka ट्रेंड करू लागलं होतं.

रेड एफएम मुंबईच्या नीरजची मुलाखत घेण्याच्या पद्धतीवरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. या मुलाखतीत रेडिओ जॉकी (आरजे) मलिष्का मेंडोंसा हिच्या वर्तनावर आणि तिनं वापरलेल्या काही शब्दांवर तसंच नीरजसाठी निर्माण झालेल्या संकोचाच्या स्थितीबाबत आक्षेप व्यक्त केला गेला.

"मैत्रिणींनो.. कठीण आणि गंभीर प्रश्नांची उत्तरंही मिळाली आहेत. पण झूम कॉलवर कॅमेरा फिरवण्याच्या चार सेकंदांपूर्वी आम्ही कुणासाठी डान्स करत आहोत ते तर पाहा," असं मलिष्कानं व्हीडिओ शेअर करताना लिहिलं.

व्हीडीओमध्ये "उडे जब-जब झुल्फें तेरी..." हे गाणं सुरू आहे आणि नीरज चोपडा शांतपणे हसत स्क्रीनकडे पाहत आहे. त्यानंतर आरजे मलिष्का लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर येताच म्हणते, "केवढी मजा आली...सॉरी, आम्ही तुम्हाला फार तर छेडलं नाही ना..."

त्यावर नीरजनं फक्त "थँक्यू, थँक्यू सो मच," एवढंच म्हटलं.

आणखी एक व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात आरजे मलिष्का नीरज चोपडाला, "जाण्यापूर्वी मला तुम्हाला जादू की झप्पी द्यायची आहे, चालेल का?" असं म्हणत स्क्रीनच्या जवळही येते.

त्यावर नीरज पुन्हा काहीसा संकोचलेला दिसून आला आणि "थँक्यू, लांबूनच नमस्ते," असं तो म्हणाला.

या मुलाखतीबाबतही लोकांनी विविध प्रकारे आक्षेप नोंदवला. कुणी याची तुलना लैंगिक शोषणाशी केली तर काही जणांनी हा नीरज चोपडाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)