You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना शिक्षण: महाराष्ट्रातील 'या' शहरात 'मिशन मॅथेमॅटिक्स', बोलक्या भिंतीतून गणिताची गोडी
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
चंद्रपुरातल्या अनेक घरांच्या भिंतींवर, पडक्या वाड्यांवर, पाण्याच्या टाकीवर, सिमेंटच्या कुंपणावर गणिताची चित्र रेखाटलेली दिसतात. नफा-तोटा, त्रिकोण-चौकोन, वर्तुळ-त्रिज्या, प्रमेय अशा गोष्टी भिंतीवर रंगवल्या आहेत.
एरवी भिंतींवर सरकारच्या योजनांची घोषवाक्य किंवा फारतर सुविचार वगैरे दिसतात. अशावेळी भिंतींवरील गणितं पाहून काहीसं आश्चर्यचकित व्हायला होतं.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. ग्रामीण भागात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. चंद्रपुरात पाचवी ते आठवची वर्ग सुरू झाले आहेत. पण प्राथमिक शिक्षणासाठी आणि इतर सर्वच विद्यार्थी या गणिताच्या भिंतींसमोर उत्सुकतेनं थांबतात, वाचतात. काही विद्यार्थी वही-पेन घेऊन भिंतींवरील गणितं लिहूनही काढतात.
वाचायला आणि पाहायला काहीसा अनोखा वाटणारा हा उपक्रम राबवलाय चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल कर्डिले यांनी.
कोरोनाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आलं. त्यामुळे इतर सर्वच गोष्टींप्रमाणे शाळाही बंद झाल्या. पण शिक्षण बंद होता कामा नये, यासाठी राहुल कर्डिले यांनी उचललेलं हे पाऊल सध्या कौतुकाचं निमित्त ठरलंय.
ज्या विषयाबाबत विद्यार्थी बऱ्याचदा नाकं मुरडताना दिसतात, त्याच गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी राहुल कर्डिले हे 'मिशन मॅथेमॅटिक्स' नावाचा उपक्रम राबवत आहेत. या अनोख्या उपक्रमाबाबत बीबीसी मराठीनं राहुल कर्डिले यांच्याकडून जाणून घेतलं.
2015 च्या बॅचचे IAS अधिकारी असलेले राहुल कर्डिले हे 2019 च्या मार्च महिन्यात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) रूजू झाले.
स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या राहुल कर्डिले यांनी चंद्रपुरात कृषी आणि शिक्षण या दोन क्षेत्रांवर विशेष भर देत उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. 'मिशन मॅथेमॅटिक्स' हा त्याचाच एक भाग.
गावातल्या भिंतींवर गणितातल्या गोष्टी आकर्षक रुपात रेखाटणं, रंगवणं अशी सहज-सोपी, पण तितकीच महत्त्वाची कल्पना या उपक्रमामागे आहे.
पोंभुर्णा तालुक्यात 'मिशन मॅथेमॅटिक्स'ची बिजं
'मिशन मॅथेमॅटिक्स'ची बिजं चंद्रपुरातील पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी या गावात सापडतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला अक्षय वाकुडकर या तरुणानं घोसरी या त्याच्या गावात भिंतींवर 'गणितं' रेखटली होती. कमी मनुष्यबळ, मर्यादित आर्थिक क्षमता यांमुळे हा उपक्रम मर्यादित स्वरूपात राहिला होता.
गेल्यावर्षी दिवाळीच्या दरम्यान राहुल कर्डिले यांनी अक्षय वाकुडकरचा हा उपक्रम पाहिला आणि त्याला जिल्हा परिषद कार्यालयात बोलावून घेतलं. जिल्हा परिषद हा उपक्रम जिल्हा स्तरावर राबवू इच्छित असल्याचे कर्डिलेंनी अक्षयला सांगितलं.
पण कामाच्या व्यग्रतेमुळे आणि नंतर कोरोनाच्या संकटात उपक्रम प्रत्यक्षात येण्यापासून रेंगाळत राहिला. त्याचवेळी लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने सरकारनं ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना दिल्या. त्या अनुषंगाने सर्वेक्षण केलं असता, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या लक्षात आलं की, जिल्ह्यात अंदाजे 30 ते 35 टक्के पालकांकडेच ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधा आहेत. परिणामी मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची भीती समोर दिसत होती. मग इथूनच गणिताच्या उपक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली.
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरीसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला, मात्र काही गावांच्या भिंतींपर्यंतच मर्यादित राहिलेला हा उपक्रम राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गावांपर्यंत पोहोचणार आहे. पहिल्या टप्पा पूर्ण होत आला असून दुसऱ्या भागात 40 हून अधिक भिंतीवर अशाप्रकारे काम करण्याचा मानस असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
राहुल कर्डिले म्हणतात त्याप्रमाणे, आपल्याकडे साधारणपणे अंगणवाड्या किंवा शाळांच्या भिंतीवर अशाप्रकारे शिक्षणासंबंधी गोष्टी रंगवणं, रेखाटणं हे नवीन नाही. आपण त्याला 'शाळा बोलकी करणं' म्हणतो. पण शाळेव्यतिरिक्त भिंतींवर असा प्रयोग फारच क्वचित दिसतो.
मग बोसरी गावातून उगम पावलेला 'मिशन मॅथेमॅटिक्स'चा प्रयोग प्रशासकीय पातळीवर पोहोचला. आता मोठ्या पातळीवर आणि जास्त क्षमतेनं हा उपक्रम संपूर्ण चंद्रपुरात राबवला जात आहे. त्यासाठीची राहुल कर्डिले यांनी दाखवलेलं आपलं प्रशासकीय कौशल्य वाखणण्याजोगं आहे. हा उपक्रम जिल्हा परिषदेकडून राबवण्यासाठी कशा बैठका घेतल्या, काय नियोजन केलं याबाबत त्यांनी बीबीसी मराठीला विस्तृतपणे सांगितलं.
नियोजन कसं केलं?
'मिशन मॅथेमॅटिक्स' उपक्रम ज्यावेळी जिल्हा पातळीवर राबवण्याचा निर्णय राहुल कर्डिले यांनी घेतला, तेव्हा त्यांनी सर्वांत आधी जिल्हा प्रशासनातील शिक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यासोबत कधी एकत्र, तर कधी स्वतंत्र बैठका घेतल्या.
राहुल कर्डिले सांगतात, "या सगळ्यांना उपक्रमाचं महत्त्व समजावून सांगितलं. कमी खर्चात आणि कमी वेळात अधिक चांगले फायदे असणारी कल्पना असल्याचं पटवून दिलं. जिल्हा परिषदेचं काम म्हणून लोकांच्या नजरेसही पडणारा उपक्रम असल्याचं पटवून दिलं."
"जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला, मात्र खरी जबाबदारी होती ती ग्रामपंचायतींची. कारण त्यांच्या निधीतून हा उपक्रम प्रत्यक्षात आणायचा होता. एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाच ते सहा हजारांचा खर्च येणार होता. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सुद्धा सोयीचा उपक्रम होता. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतींना पुढाकार महत्त्वाचा होता, जो हळूहळू वाढतोय," असं राहुल कर्डिले सांगतात.
ग्रामपंचायतीला उपक्रम राबवण्यास सांगितले असले, तरी जिल्हा परिषदेनंही सक्रीयपणे अंमलबजावणीत सहभाग घेतलाय. कर्डिले म्हणतात, "लोकांवर ढकलून दिलं असतं किंवा ग्रापपंचायत, शाळा यांच्यावर सोडून दिलं असतं, तर उपक्रम प्रत्यक्षात येण्यास वेळ लागला असता."
गणितांची निवड कशी केली?
भिंतीवर रंगवण्यासाठी जी गणितं निवडली गेली, त्यातही खूप विचारपूर्वक निवड करण्यात आली. पहिली-दुसरी ते सहावी-सातवीपर्यंतच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून ही निवड केल्याचे राहुल कर्डिले सांगतात.
"जमेची बाजू म्हणजे, गणित चित्र किंवा अशा आकर्षक गोष्टींमधून समजावणं सोपं असतं. त्यामुळे हा फायदा झाला. मात्र, तरीही निवड करताना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गणितीय माहिती निवडली गेली," असं राहुल कर्डिले सांगतात.
ही गणितं निवडण्यासाठी 'डाएट' या संस्थेनं मदत केल्याचं कर्डिले सांगतात. 'डाएट' म्हणजे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था. ही संस्था शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात काम करते. या संस्थेच्या मदतीने राहुल कर्डिले यांनी 'मिशन मॅथेमॅटिक्स'अंतर्गत भिंतींवर रंगवण्यात येणाऱ्या गणितांची निवड केली. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेनुसार ही निवड करण्यात आली.
राहुल कर्डिले सांगतात, "हे सर्व करताना कमीत कमी श्रमात जास्त आकर्षक पाट्या तयार करायच्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतील, हे ध्यानात ठेवलं. शिवाय, सकारात्मक रंग वापरल्यानं मुलंही थांबून वाचतात, पाहातात. तसंच, भिंतीही सुंदर दिसतात, परिणामी गाव सुंदर दिसतं."
सुरुवातीला पाच ते सहा प्रारूपं होती. आता 35 ते 40 प्रारूपं तयार करण्यात आली आहेत. तसंच, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावांमधील जवळपास हजार एक भिंतींवर आतापर्यंत 'मिशन मॅथेमॅटिक्स' पोहोचलं आहे.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पालक यांच्याकडून प्रोत्साहन देणार्या प्रतिक्रिया आल्याचं कर्डिले नमूद करतात. तसंच, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनीही कौतुक केल्याचं ते सांगतात.
"शाळा व्यवस्थापन कमिट्या तेवढ्या सक्रीय नाहीत. अन्यथा आणखी प्रभावीपणे आणि वेगानं हा उपक्रम राबवला जाऊ शकतो," अशी खतंही कर्डिले व्यक्त करतात.
ते म्हणतात, "जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून माझ्याकडे जवळपास नऊ हजार कर्मचारी वर्ग येतो. दैनंदिन प्रशासकीय कामं पाहून, आता कोरोना काळात सर्वेक्षणं आहेत, नियमित फाईल वर्क असतं, हे सर्व सांभाळून असे उपक्रम राबवावे लागतात. लोकांकडून जेवढा सहभाग वाढेल, तेवढ्या या उपक्रमाच्या कक्षा रुंदावतील."
पालकांना आणि शिक्षकांना काय वाटतं?
'मिशन मॅथेमॅटिक्स' उपक्रमाबद्दल बीबीसी मराठीनं चंद्रपुरातील शिक्षक आणि काही ग्रामस्थांशीही संवाद साधला.
ब्रिद्र-पाटण केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेथ शिक्षक असलेले यशवंत पिंपळकर सांगतात, "हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यास सांगितलं गेलंय. लॉकडाऊनमुळे उपक्रम राबवण्याची गती कमी असली, तरी आम्ही उत्सुक आहोत."
शिक्षणाचा विचार करून अशाप्रकारचा उपक्रम असल्यानं आनंद वाटतो, म्हणून आम्ही शिक्षक हिरहिरने सहभाग घेतोय, असं पिंपळकर सांगतात.
जिवती तालुक्यातील काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतरही अशाच काहीशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. रोडगुडा (आंबे) गावातील रामू आत्राम हे पालक सांगतात, "आता शाळा बंद असल्यानं मुलांना शाळेतलं शिकायला नवीन काहीच नाही. पण या उपक्रमामुळे मुलं थोडंफार शिकत राहतात. भिंतींकडे येता-जाता लक्ष जात राहतं. वारंवार डोळ्यांसमोर ही गणितं असल्यानं लक्षात राहतात."
आमच्या गावातली बरीच मुलं पाटी-पेन्सिल घेऊन सुद्धा या गणितं रंगवलेल्या भिंतींसमोर दिसतात, असं आत्राम म्हणतात. मुलांबाबत बोलता बोलता रामू आत्रा म्हणतात, "त्या पाट्या पाहून आम्हालाही बरं वाटतं. आम्ही पण शिकू गणितं, असं वाटायला लागलंय."
सुपारी मडावी हे पालकही असेच उत्साही दिसतात. ते म्हणतात, "एरवी फक्त कुठल्या ना कुठल्या घोषणा भिंतींवर असायच्या किंवा भिंती माखलेला असायच्या. आता रंगरंगोटी दिसते आणि तेही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे आनंदच होतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)