You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : ऑनलाईन शाळेसाठी पाचगणीच्या शिक्षिकेचा ‘जुगाड’ व्हायरल
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
कोरोनामुळे शाळा ऑनलाईन भरू लागल्या आहेत. मात्र ही शिकवणी सोपी नाही. अडचणींवर अनोखा मार्ग काढत एका शिक्षिकेची कहाणी.
कपाटातला एक हँगर, रबरबँड्स, एक खुर्ची आणि छताला बांधलेल्या कापडी दोऱ्या.
पाचगणीतल्या शिक्षिका मौमिता भट्टाचार्जी यांनी घरातच असणाऱ्या अशा जुजबी गोष्टी वापरून मोबाईल स्टँड तयार केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरातूनच ऑनलाईन धडे देताना फोन स्थिर राहावा म्हणून हा सगळा खटाटोप केला, तेव्हा मौमिता यांना इंटरनेटवर आपल्याला एवढा प्रतिसाद मिळेल याची कल्पना नव्हती.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
त्या सांगतात, "मला वाटलं नव्हतं, की लोकांना हे एवढं आवडेल. माझ्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी तुम्ही ऑनलाईन कसं शिकवता असं विचारलं होतं. म्हणून मी या हँगरचा व्हीडियो लिंक्डइनवर पोस्ट केला. मला वाटलं हे पाहून बाकीच्यांना मदत होईल आणि तेही असं काहीतरी करतील."
पण मौमिता यांचा हा व्हीडियो व्हायरल झाला. त्यावर प्रतिक्रिया देणारे सगळेच या शिक्षिकेच्या कल्पनाशक्तीला आणि शिक्षणाविषयी निष्ठेला दाद देतायत.
41 वर्षांच्या मौमिता पाचगणीच्या सेंट झेवियर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये रसायनशास्त्राच्या शिक्षिका आहेत. त्या ICSE बोर्डाच्या नववी दहावीतील विद्यार्थ्यांना शिकवतात आणि HSC बोर्डाच्या म्हणजे बारावीच्या मुलांनाही शिकवतात.
कुठलीही कठीण समीकरणं समजावून सांगताना एखाद्या सॉफ्टवेअरपेक्षा त्यांना आजही फळा आणि खडू वापरणं आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणं महत्त्वाचं वाटतं. "मी कॉम्प्युटर आणि पॉवरपॉइंटचा वापर करू शकले असते. पण माझ्या मते विद्यार्थ्यांना आपण वर्गातच बसलो आहोत असं वाटायला हवं."
लॉकडाऊनमुळे सुचलेला 'जुगाड'
रोजच्या जगण्यातल्या अशा एखाद्या छोट्या समस्येवर काढलेला कामचलाऊ किंवा सोपा उपाय यालाच बोलीभाषेत 'जुगाड' असं म्हटलं जातं. मौमिता यांना हा जुगाड कसा सुचला?
20 मार्चला महाराष्ट्रात लॉकडाऊन झालं, तेव्हा मौमिता यांची शाळाही लगेच बंद झाली. ही शाळा म्हणजे महाबळेश्वर जवळचं हिलस्टेशन पाचगणी इथलं एक बोर्डिंग स्कूल आहे. त्यावेळी आपल्या विषयाची परीक्षा झालेली असल्यानं मौमिता यांच्यावर फारशी जबाबदारी नव्हती.
वर्षभराचा ताण संपल्यामुळे मी काहीशी निवांत होते, असं त्या लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या दिवसांविषयी सांगतात. पण काही दिवसांतच त्यांच्या लक्षात आलं, की लॉकडाऊन काही लवकर संपणार नाही, ते काही आठवडे किंवा कदाचित काही महिने सुरू राहील.
"मला विद्यार्थ्यांची, विशेषतः दहावी-बारावीच्या मुलांची चिंता वाटत होती. अभ्यासक्रम कसा पूर्ण करणर हा प्रश्न पडला होता. विद्यार्थीही विचारत होते की आम्ही अभ्यास कसा करायचा? मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं."
शिक्षिक म्हणून आपल्या सतरा वर्षांच्या कारकीर्दीत मौमिता यांच्यावर अशी वेळ कधी आली नव्हती, जेव्हा त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटू शकणार नव्हत्या. म्हणून त्यांनी छोटे छोटे व्हीडियो तयार करायचं ठरवलं.
शाळेतल्या एक ज्येष्ठ शिक्षिका मिस मेरी आणि संचालक फादर टॉमी यांना त्यांनी आपली कल्पना सांगितली आणि दोघांनाही ती आवडली. मौमिता यांना मग शाळेतून एक फळाही मिळाला. सुरूवातीला त्या आपल्या साध्या स्मार्टफोनवर दोन मिनिटांचे छोटे व्हीडियोज बनवत असतं.
"माझा फोन फारसा चांगला नाहीये. म्हणून मी दोन-दोन मिनिटं रेकॉर्ड करून थांबायचे. कधीकधी माझ्या मुली फोन धरून उभ्या राहायच्या. माझे पती सध्या लॉकडाऊनमुळे घरी आहेत, आणि मी त्यांनाही कधीकधी फोन धरायला लावायचे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं" असं मौमिता सांगतात.
काही दिवसांनी शाळेनं ऑनलाईन क्लासेस सुरू केले. शिक्षकांना एक वेळापत्रक देण्यात आलं आणि त्यांनी एक-एक तासभर शिकवायचं असं ठरलं. पण एवढा वेळ फोन हाती धरून कोण उभं राहणार? हातात फोन धरून रेकॉर्ड केलं तर तो हलण्याची शक्यता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. व्हीडियो जरासा हलला, की बफर व्हायचा आणि विद्यार्थ्यांना काही नीट दिसेनासं व्हायचं.
म्हणूनच मौमिता यांना ट्रायपॉड किंवा स्टँड हवा होता. तो विकत आणणं एरवी सहज शक्य होतं. पण जागतिक साथीचं संकट आणि लॉकडाऊनमुळे ते कठीण बनलं होतं. "मी ऑनलाईन मागवू शकले असते. पण पाचगणी हे एक दूर डोंगरातलं हिल स्टेशन आहे. हे एक छोटं गाव आहे आणि मी काहीही ऑर्डर केलं, तर ते येईपर्यंत कित्येक दिवस जातात. म्हणून मी विचार केला, असा काही उपाय करता येईल का, ज्यानं कुणाला फोन धरून उभं राहावं लागणार नाही?"
आणि मौमिता यांनी स्वतःच तो उपाय शोधला.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
विद्यार्थांनाही ही कल्पना अगदी आवडली असल्याचं मौमिता सांगतात. "फक्त व्हीडियो व्हायरल झाला, म्हणूनच नाही, तर विद्यार्थी खरंच आनंदात आहेत. मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे."
यानिमित्तानं मौमिता यांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणंही सोपं झालं. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात शिक्षक म्हणून हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांना वाटतं. "एक शिक्षक म्हणून मला वाटतं की विद्यार्थ्यांना कुठला त्रास होऊ नये. विशेषतः जे बोर्डासारख्या महत्त्वाच्या परीक्षांना सामोरं जाणार आहेत. मला शिकवायला आवडतं, म्हणून मी या क्षेत्रात आले आहे. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, तर तुम्ही त्यासाठी जास्त मेहनत घेता."
आपला व्हीडियो व्हायरल झाल्यानं मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांना आश्चर्यही वाटतं. "शाळा सुरू असती, तर मी कदाचित मोबाईल फोनला हातही लावला नसता. पण मी आता सध्या फोनच वापरते आहे."
अशा ऑनलाईन शिकवणीतही अनेक अडचणी असतात. गुगल क्लास रूम किंवा झूम यांसारखी मीटिंग सॉफ्टवेअर वापरताना सुरूवातीला मौमिता यांना त्यांच्या मुलींनी आणि विद्यार्थ्यांनी मदतही केली होती.
पुढची आव्हानं
मौमिता इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवत असल्यानं, त्यांच्या बहुतेक सर्व विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा फोन आहेत. पण तरीही नेटवर्क नसणं, वीज नसणं अशा समस्या येतात आणि लाईव्ह शिकवणीत अडचणी येतात. अशा वेळी मौमिता छोटे व्हीडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅपवरून विद्यार्थ्यांना पाठवतात.
पण सगळ्यांनाच हे शक्य नाही. भारतात स्मार्टफोनचा प्रसार गावोगावी झाला आहे आणि स्वस्त डेटा रेटमुळे इंटरनेट सगळीकडे पोहोचल्याचं चित्र आहे. पण अनेक शिक्षक आणि विशेषतः विद्यार्थ्यांना आजही स्मार्टफोन परवडत नाही आणि ऑनलाईन शिक्षणापासून ते दूरच आहेत. अगदी महाराष्ट्रासारख्या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्यातही फक्त वीस टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असल्याचं शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर सांगतात.
मौमिता यांनाही त्याची जाणीव आहे. पण त्या म्हणतात, "अनेक समस्या आहेत आणि आपण सगळ्याच सोडवू शकत नाही. आपल्या हातात जे आहे, ते आपण करावं. दुसऱ्या कुणावर का अवलंबून राहायचं? सरकारनं किंवा शाळेनं आपल्याला हे द्यावं म्हणजे आपण ते करू, असं कशासाठी? इच्छा तिथे मार्ग असतो शेवटी. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, तर तुम्ही कसंही ते करू शकता."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)