कोरोना: लॉकडाऊनमुळे पालकांसमोर होम स्कूलिंगचा पर्याय

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोरोनामुळे शाळा बंद असून आता यापुढे शालेय शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत चर्चा केली जात आहे. त्यापैकी एक म्हणजे होम स्कूलिंग.

गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यातल्या शाळा लॉकडाऊनमुळे बंद आहेत. येत्या काही दिवसांत लॉकडाऊन शिथील करत शाळा सुरू झाल्या तरी कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे होम स्कूलिंग करणाऱ्या पालकांकडून इतर पालक मार्गदर्शन घेत आहेत.

शाळेत न जाता घरी राहून शिक्षण घेण्याच्या संकल्पनेला होम स्कूलिंग म्हटलं जातं.परदेशातही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी होम स्कूलिंगची संकल्पना गेल्या दहा वर्षात भारतात बऱ्यापैकी रुजली.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी होम स्कूलिंग करणाऱ्या पालकांची संख्या वाढली. लॉक डाऊनच्या निमित्ताने होम स्कूलिंग या शिक्षण पद्धतीची चर्चा पालकांमध्ये होताना दिसत आहे.

मुलांना शाळेऐवजी घरी शिकवण्यासाठी होम स्कूलिंग पर्याय ठरू शकतो का याची चौकशी पालकांकडून केली जात आहे. यानिमित्तानं आम्ही होम स्कूलिंग करणाऱ्या काही पालकांशी संवाद साधला.

होम स्कूलिंग म्हणजे नेमके काय ?

होम स्कूलिंग करणारे पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवत नाहीत. ते घरीच आपल्या मुलांना अभ्यासक्रम शिकवतात. मुलाचे पालक हेच त्याचे प्राथमिक शिक्षक असतात.

गरज भासल्यास मुलांना शिकवणीसाठी बाहेर पाठवले जाते. शालेय नियमांचे बंधन घरी नसते त्यामुळे होम स्कूलिंग अंतर्गत मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण दिले जाते.

गेल्या तीन वर्षांपासून आपल्या मुलाला होम स्कूलिंग करणाऱ्या अमृता जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "माझ्या मुलाला स्वच्छंद शिक्षण घेता यावे यासाठी मी त्याला शाळेत प्रवेश न देता घरीच शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलांना शाळेत सहा-सात तास सलग बसवणे आणि सगळ्या मुलांना एकाच पद्धतीने शिकण्याची सक्ती करणे मला पटत नव्हते म्हणून मी होम स्कूलिंगचा निर्णय घेतला."

महानगरांमधल्या शाळांच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीबाबतही पालकवर्ग समाधानी नाही. मुलांना शाळांकडून गृहपाठ, प्रोजेक्ट्स, कलाकृती, साहित्य-शिक्षण असा बराच अभ्यास देण्यात येतो. हे सगळं करत असताना मुलांना त्यांच्या आवडीनिवडी जोपासता येत नाहीत, असंही अनेक सर्वेक्षणांमधून समोर आले आहे.

"आपण 50 वर्षे जुन्या शिक्षण प्रणालीअंतर्गत मुलांना शिक्षण देतोय," अशी प्रतिक्रिया होम स्कूलिंग करणाऱ्या पालक रुबी भाटीया यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

त्या म्हणाल्या, "मुलांना जे विषय आवडतात ते शिकण्याचा त्यांना अधिकार आहे. जे विषय त्यांना अवघड वाटतात ते शिकण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. होम स्कूलिंगमध्ये तुम्हाला स्वत:च्या मुलांकडे लक्ष देण्याची संधी मिळते."

"माझ्या मुलाला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी मी हॅरी पॉटरची पुस्तकं देते. त्याला ती आवडतात. यामुळे तो आवडीने भाषा शिकतो. रसायनशास्त्र शिकवण्यासाठी मी किचन वापरते. यामुळे त्याला सोप्या भाषेत किचकट विषय समजतो. याच पद्धतीने बाजारात जाऊन गणित विषय शिकता येतो," जोशी यांनी आपला अनुभव सांगितला.

होम स्कूलिंगचा पर्याय अवलंबणाऱ्या अजून एक पालक सुप्रिया यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "कोरोना आरोग्य संकटाची माहिती असो वा चक्रीवादळ येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज, या घटना मुलांना समजेल अशा भाषेत आम्ही शिकवतो. त्यासाठी हवामान खात्याने दिलेला नकाशा, इतर वादळांची माहिती, त्याची वैज्ञानिक कारणे आम्ही मुलांना सांगतो."

कोरोना संकटकाळात होम स्कूलिंगचा पर्याय

लॉकडाऊनमुळे शालेय शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेही सध्या नाईलाजास्तव पालक होम स्कूलिंग करतच आहेत. पण हा पर्याय शाळांइतका प्रभावी ठरू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

"शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होतो. शाळेइतके गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना घरी देता येणं शक्य नाही. शिवाय, पालकांसाठी होम स्कूलिंग हे प्रचंड आव्हानात्मक काम आहे. हे सगळ्यांना जमेलच असे नाही," असं मत शिक्षण तज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.

होम स्कूलिंगसाठी मुळात पालकांना शिक्षण आणि शिकवण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. शाळा नाही म्हणून खर्च नाही, असं नसून विविध विषयांसाठी शिकवणी, खेळ, कला, संगीत याचे वर्ग लावण्यासाठी खर्च आहेच.

"कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत होम स्कूलिंग प्रभावीपणे करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी होम स्कूलिंग करणाऱ्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडूनही एखादा कार्यक्रम आयोजित केला तर पालकांना मदत होईल," असंही मत काळपांडे यांनी व्यक्त केले.

होम स्कूलिंगसाठी अभ्यासक्रम काय असतो?

होम स्कूलिंग करणाऱ्या पालकांना अभ्यासक्रमही स्वत: निवडता येतो. काही पालक राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवतात, तर काही पालक सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई मंडळाच्या पुस्तकातून शिकवतात.

या सगळ्या मंडळांचा मिळून स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केलेले पालकही आहेत. प्राथमिक शिक्षण पालक स्वत: देतात. "काही विषयांसाठी शिक्षक नेमले जातात अथवा मुलांना शिकवणीला पाठवले जाते. अर्थात यामध्येही मुलांची आकलन क्षमता पाहून पालक निर्णय घेऊ शकतात. तसेही शाळेत जाणारी मुलं शिकवणीलाही जातातच," जोशी यांनी सांगितले.

होम स्कूलिंगचे विद्यार्थी कोणत्याही वर्षी शाळेत प्रवेश घेऊ शकतात. तसंच राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ आणि राज्य मुक्त शिक्षण मंडळाअंतर्गत आठवी, नववी, दहावीची परीक्षाही देऊ शकतात. काही बोर्डाच्या शाळा तर स्वतंत्र उमेदवार म्हणूनही होम स्कूलिंगच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देतात.

होम स्कूलिंगमधली आव्हानं

पालक रुबी भाटीया सांगतात, "मुलांना घरी शिकवणे म्हणजे सोपे काम नाही. त्यासाठी पालकांनाही शिस्त असणं आवश्यक आहे. मुलांसाठी त्यांचे पालकच शिक्षक असल्याने त्यांच्या सवयी मुलं लवकर आत्मसात करतात."

होम स्कूलिंग करणाऱ्या पालकांना नियोजन करुनच त्यांची कामे करता येणे शक्य असल्याचं अमृता जोशी सांगतात. "खरेदी करायची म्हणून मैत्रिणीचा फोन आला तर जाता येत नाही. मुलाची शाळा आहे असे सांगावेच लागते. अचानक एखाद्या ठिकाणी जाता येत नाही. कार्यक्रमांनाही जाणं अनेकदा शक्य होत नाही. मुलांच्या अभ्यासाला प्राधान्य द्यावे लागते."

त्यामुळे होम स्कूलिंगचा निर्णय पालकांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. मुलांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने त्यांनाही शाळेत जावेसे वाटते का, त्यांचं याबद्दलचं मत काय आहे हेही पालकांनी विचारात घ्यायला हवे असा सल्ला होम स्कूलिंगचे चालक-पालक देतात.

समाजाकडून आजही अपेक्षित मान्यता नाही

शाळेत न गेलेली मुलं म्हणजे अशिक्षित असाच अर्थ समाजात लावला जातो. शाळा हा मुलांच्या जीवनातला अविभाज्य घटक समजला जातो. आम्ही मुलांना शाळेतच पाठवत नाही हे ऐकलं की, समोरच्या व्यक्तीला धक्का बसतो, असं अमृता जोशी सांगतात.

"जो समाज आजही विधवा स्त्रीला हळदी कुंकू लावण्याच्या विरोधात आहे. त्या समजाकडून मोठ्या बदलाकडे सकारात्मकतेनं पाहिलं जाईल अशी मी अपेक्षा करत नाही. पण होम स्कूलिंग हे दुर्मिळ असल्याने पालकांमध्ये आत्मविश्वास असेल तरच मुलांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो," असं जोशी यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.