You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रक्षाबंधन : या भाऊ-बहिणीच्या जोडीने एकाच दिवशी ऑलिम्पिकमध्ये मिळवलं सुवर्णपदक
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा नुकतीच पार पडली. यंदा अनेकांनी आपलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण केलं. काहींनी आपल्या जुन्या कामगिरीत सुधारणा केली. काहींना पदकाशिवाय परतावं लागलं असलं तरी त्यांनी अनुभवाची शिदोरी घेऊन परतीची वाट धरली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या सर्वांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ही स्पर्धा आठवणीत राहील, हे नक्की.
पण जपानमधील दोन भावंडांसाठी ही स्पर्धा कायमस्वरुपी स्मरणात राहणार आहे. कारण ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत कधीच न घडलेला योग या दोघांनी घडवून आणला आहे.
या दोन्ही भावंडांनी एकाच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. या कामगिरीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच वेळी सुवर्णपदकाची कमाई करणारे ते पहिले भाऊ-बहिण बनले.
उद्या (22 ऑगस्ट) राखी पौर्णिमा. या निमित्ताने जाणून घेऊ जपानच्या हिफुमी आबे आणि उता आबे या दोघांच्या 'सुवर्ण' पराक्रमाची ही प्रेरणादायक कहाणी.
एकाच दिवशी पटकावले सुवर्णपदक
25 जुलै 2021. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युदो खेळाच्या फेऱ्या सुरू होत्या. जपानच्या ज्युदो पथकात 21 वर्षीय उता आणि तिचा 24 वर्षीय भाऊ हिफुमी या दोघांचा समावेश होता.
त्यांनी मजल दरमजल करत ज्युदो स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. एकाच दिवशी फक्त काही मिनिटांच्या अंतराने दोघांचाही अंतिम सामना होणार होता.
21 वर्षीय उता आबे महिलांच्या 52 किलो वजनी गटातून अंतिम सामन्यासाठी उतरली. उताने राऊंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलच्या लॅरिसा पिमेंटा, क्वार्टर-फायनल सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या चेल्सी गाईल्स तर सेमीफायनलमध्ये इटलीच्या ओडेट ग्युफ्रिटा या दिग्गज खेळाडूंना नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामन्यात तिचा सामना फ्रान्सच्या अमॅन्टीन बुचर्ड हिच्याशी झाला. या सामन्यात अतिशय कुशलतेने बुचर्डला हरवून सुवर्णपदक पटकावलं.
दुसरीकडे पुरुषांच्या 66 किलो वजनी गटात हिफुमी आबे याने दिमाखदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. हिफुमीने राऊंड ऑफ 16 मध्ये फ्रान्सच्या किलियन ले ब्लाऊच, उपांत्यपूर्व सामन्यात बास्खू योंडोपेरेन्लेई आणि उपांत्य सामन्यात ब्राझीलच्या डॅनियल कार्गिनन यांना हरवलं होतं. त्यानंतर अंतिम फेरीत त्याची गाठ जॉर्जियाच्या वाझा मार्गेलॅशव्हिली याला पराभूत करून हिफुमीने सुवर्णपदकाची नोंद केली.
विशेष म्हणजे दोन्ही भावंडांच्या अंतिम सामन्यात काही मिनिटांचंच अंतर होतं.
सुरुवातीला लहान बहीण उता आणि नंतर मोठा भाऊ हिफुमी याने आपल्या सोनेरी कामगिरीने इतिहास घडवून आपल्या आबे कुटुंबाचं तसंच जपानचं नाव नव्या उंचीवर नेलं.
विजयानंतर हिफुमीने पत्रकारांशी संवादही साधला होता. त्यावेळी तो म्हणाला, आजचा दिवस आमच्यासाठी एक अविस्मरणीय दिवस आहे. एक भाऊ-बहीण म्हणून यापेक्षा आणखी लक्षवेधी कामगिरी आमच्यासाठी कोणतीही नाही. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ही कामगिरी करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो."
मोठा भाऊ म्हणून होता दबाव
या स्पर्धेत उता आबे सुरुवातीपासूनच ज्युदो 52 किलो वजनी गटात गटातून सुवर्णपदकाची प्रमुख दावेदार मानली जात होती. तिने आपल्या नावास साजेशी कामगिरी करत मोठ्या भावाच्या आधीच सुवर्णपदक पटकावलं.
पण तिच्या या विजयामुळे मोठा भाऊ हिफुमीवर चांगल्या कामगिरीचा दबाव येणं हे स्वाभाविकच आहे.
ऑलिम्पिक.कॉम वरील बातमीनुसार, याविषयीची त्याची चलबिचल अखेर बोलूनच दाखवली.
हिफुमी म्हणतो, "उताने सुवर्णपदक मिळवल्याने तिचा मोठा भाऊ या नात्याने मीसुद्धा सुवर्णपदक पटकवावं, हे माझ्यासाठी अनिवार्य बनलं होतं. कोणत्याही परिस्थितीत मला पराभव पत्करायचाच नव्हता."
याच विचारातून हिफुमीने आपल्या जीवाची बाजी लावून आपला सर्वोत्तम खेळ दाखवला आणि पदक पटकावलं.
हिफुमीसाठी ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रवास तसा खडतरच राहिला. जपानच्या ज्युदो पथकात तो 14वा आणि अखेरचा सदस्य म्हणून सहभागी झाला होता.
डिसेंबर महिन्यात ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता फेरी झाली. यामध्ये विजय मिळवून त्याने ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवलं होतं.
लहान बहिणीकडून मोठ्या भावाला प्रोत्साहन
हिफुमी आणि उता यांना लहानपणापासूनच ज्युदो खेळाची प्रचंड आवड होती. तेव्हापासूनच त्यांची ज्युदो स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये चढाओढ सुरू असायची. आजच्या घडीला दोघांकडेही ऑलिम्पिकमधील सर्वोच्च सन्मान आहे.
उताने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतर काही पत्रकार तिच्याशी संवाद साधण्यासाठी गेले. त्यावेळी उताने त्यांच्याशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
माझ्या भावाचा सामना आता होणार आहे, ते झाल्यावरच मी तुमच्याशी बोलू शकेन, असं म्हणत ती भावाचा सामना पाहायला निघून गेली.
हिफुमीचा सामना पूर्ण होईपर्यंत उता मॅटजवळ उभी राहून त्याला प्रोत्साहन देत होती. अखेर, हिफुमीने विजयाची नोंद केल्यानंतरच तिने सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर दोघांनी एकत्रितरित्या आपल्या विजयाचा आनंद साजरा केला.
जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतही दोघांना सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आबे भावंडांनी आपल्या नावे एक दुर्मिळ असा विक्रम नोंदवला आहे. पण याआधीही अशा प्रकारचा पराक्रम दोघांच्या नावावर आहे.
2018 साली झालेल्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतही हिफुमी आणि उता यांनी एकाच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यावेळीही दोघांचं बरंच कौतुक झालं. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी या कामगिरीची पुनरावृत्ती करून सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
भावा-बहिणींमधील कुरघोडी आणि ज्युदो
हिफुमी आणि उता या दोघांचाही जन्म कोबे येथे झाला. प्राथमिक शाळेत असताना हिफुमीने सर्वप्रथम टीव्हीवर ज्युदो खेळ पाहिला. त्यावेळी त्याला हा खेळ प्रचंड आवडला. त्यानंतर त्याने तत्काळ ज्युदो प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला.
प्रशिक्षण केंद्रात त्याचा सामना त्याच्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांशी व्हायचा. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तो प्रचंड भयभित होत असे.
हिफुमी तुलनेत किरकोळ अंगकाठीचा होता. तो तिसरीत असताना एकदा तर तो एका मुलीकडून पराभूत झाला होता.
पण, हिफुमीने मेहनत घेत आपल्या कमतरतेवर मात केली. त्यासाठी त्याला त्याचे वडील कोजी आबे यांनी खूप मदत केली.
कालांतराने हिफुमीने आपल्या सरावाचा दर्जा उंचावत नेत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून खेळात कौशल्य मिळवलं.
दुसरीकडे, उता 5 वर्षांची असतानापासूनच मोठ्या भावाच्या पाठोपाठ ज्युदो क्लासला जाऊ लागली होती.
जपान न्यूजशी बोलताना ती सांगते, मला त्यावेळी मित्र-मैत्रिणींना भेटणं, गप्पा मारणं या गोष्टींमध्येच जास्त रस होता. ज्युदोची तितकी आवड नसल्याने मी जास्त सराव करायचे नाही.
पण हळूहळू हिफुमीने आपल्या भावाला मागे टाकत अत्यंत वेगाने ज्युदो खेळ शिकून घेतला. केवळ दुसऱ्यांचा खेळ पाहून तिला तो आत्मसात करता येई.
दरम्यान, हिफुमी याने सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवल्यानंतर उतानेही ज्युदो खेळाचा विचार गांभीर्याने करणं सुरू केलं.
माझ्या भावाचं जास्त कौतुक झालेलं, त्याला इतकं अटेन्शन मिळणं मला त्यावेळी आवडायचं नाही. त्याने केलं ते मीही करू शकते, असं मला वाटायचं, उता प्रामाणिकपणे सांगते.
उता बारावीत असताना राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली. पण यामुळे ती खचून गेली नाही. तिला हरणं मान्य नव्हतं. तिने आपल्या भावाचे व्हीडिओ पाहून सराव करणं सुरू केलं. तिने त्याच्यासारख्या हालचाली शिकून घेतल्या. पुढच्या वर्षी उताने राष्ट्रीय स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं.
पुढे दोन्ही भावंडांनी मिळून एकमेकांसोबत सातत्याने सराव केला. त्यांनी ज्युदोकडे लक्ष केंद्रीत करून ऑलिम्पिक पदकाचं ध्येय समोर ठेवलं होतं.
पुढे 2018 मध्ये जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत दोघांनाही एकाच वेळी विजेतेपद मिळालं. तर आता ऑलिम्पिक पदकाचंही त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
इतर खेळाडू, पालकांसाठी प्रेरणा
कोणत्याही पदकामागे कठोर मेहनत आणि त्या मेहनतीची एक प्रेरणादायक अशी कहाणी जरूर असते. हिफुती आणि उता आबे यांचं सुवर्णपदक आता फक्त त्या दोघांचं राहिलेलं नाही.
क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं पटकावू इच्छिणाऱ्या प्रत्येक भावंडांचं ते पदक आहे. फक्त जपानच नव्हे तर जगभरातील कित्येक भाऊ-बहीण त्या पदकाचे कळत-नकळत वाटेकरी बनले आहेत.
यातून प्रेरणा घेऊन आगामी काळात विविध स्पर्धांमध्ये इतर भाऊ-बहिणींच्या जोड्यांनी पदके कमावली तर त्याचं श्रेय नक्की हिफुमी-उता भावंडांनाही असणार आहे.
भावा-बहिणींचं नातं खूपच हळवं आणि संवेदनशील मानलं जातं. दोघंही एकमेकांना जितका त्रास देतात, खोड्या काढतात, तितकंच एकमेकांना जीवही लावतात.
भाऊ-बहीण एखादं ध्येय घेऊन समोर येतात, तेव्हा ते प्राप्त करण्यापासून त्यांना कुणीच रोखू शकत नाही.
हिफुमी आणि उता यांच्या कहाणीतून हेच आपल्याला शिकायला मिळतं. केवळ शिक्षण अथवा नोकरीच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही बहिणी भावाच्या बरोबरीने यश प्राप्त करू शकतात.
त्यामुळे पालकांनीही आपल्या अपत्यांमध्ये मुलगा-मुलगी भेद न करता दोघांनाही प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिल्यास अशी कामगिरी कुणीही करू शकेल. पण त्यासाठी आवश्यक ती मेहनत करण्याची तयारी ठेवणं महत्त्वाचं आहे.
आगामी क्रीडा स्पर्धांमध्ये हिफुमी-उता यांच्यासारख्या पदकविजेत्या भावंडांची संख्या वाढलेली असेल, हीच अपेक्षा या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण बाळगूया.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)