You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
National Sports Day 2021 :मेजर ध्यानचंद यांना यामुळं म्हटलं जात होतं 'हॉकीचे जादूगर'
- Author, रेहान फजल,
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
मेजर ध्यानचंद यांचा आज (29 ऑगस्ट) जन्मदिन. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणूनही साजरा केला जातो.
एखाद्या खेळाडूबाबत किती किस्से किंवा अख्यायिका (दंतकथा) आहेत, त्यावरून ते किती महान आहेत याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यादृष्टीनं विचार केल्यास मेजर ध्यानचंद यांना तोडच नाही.
हॉलंडमध्ये त्यांची हॉकीस्टिक तोडून तिच्यात चुंबक तर लावलेलं नाही, हे तपासण्यात आलं. जपानच्या लोकांना त्यांच्या स्टिकला डिंक लावून ठेवला असल्याची शंका आली होती.
यापैकी काही गोष्टी अतिशयोक्ती करूनही पुढं आल्या असतील. पण व्हिएन्नाच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये त्यांचा एक पुतळा आहे. त्या पुतळ्याला एखाद्या देवाप्रमाणे चार हात असून त्यात चार हॉकी स्टिक दाखवण्यात आल्या आहेत. यावरून त्यांनी त्यांच्या काळात हॉकीमध्ये किती वर्चस्व गाजवलं असेल याचा अंदाज येतो.
गोलकीपरसाठी आव्हान होते ध्यानचंद
आयएनएस दारा 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांच्याबरोबर खेळले होते. पुढं ते पाकिस्तानचे कर्णधार बनले. त्यांनी वर्ल्ड हॉकी मॅगझिनच्या एका अंकात ध्यानचंद यांच्या हॉकी कौशल्याबाबत लिहिलं होतं. "ध्यानचंद यांच्याकडं वेगानं धावण्याची क्षमता कधीच नव्हती. उलट ते कमी वेगानंच धावायचे. पण गॅप शोधण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे होती.
डावीकडे फ्लँक केल्यावर त्यांचे भाऊ रूप सिंह आणि उजवीकडच्या फ्लॅँकमध्ये मला त्यांच्या बॉल डिस्ट्रीब्यूशनचा फायदा मिळायचा. डी मध्ये प्रवेश केल्यानंतर ते एवढ्या वेगानं आणि शक्तीनं शॉट मारायचे की, जगातील कितीही उत्कृष्ट गोलकीपरलाही तो रोखण्याची संधी मिळत नव्हती."
''अनेक लोक त्यांच्या मनगटाचा वापर आणि ड्रिब्लिंगचे चाहते होते. पण खरी क्षमता त्यांच्या मेंदूची होती. बुद्धिबळपटू ज्याप्रकारे बुद्धिपळाच्या पटाचा विचार करतो. त्याप्रकारे ते हॉकीच्या मैदानाचा विचार करायचे. त्यांचा संघ आणि प्रतिस्पर्धी मैदानात नेमक्या कुठल्या भागात खेळत असतील, हे त्यांना न पाहताही लक्षात यायचं," असं दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या केशव दत्त यांनी सांगितलं.
1956 फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मॅराडोनानं अगदी ब्लाइंड अँगलनं समोर न पाहता, तीस फुटांचा मोठा पास दिला होता. त्यावर बुरुचागानं विजयी गोल केला होता.
एखाद्या खेळाडूला अगडी डोळ्यावर पट्टी बांधूनही मैदानाचा अंदाज लावता येत असेल, तर त्यावरून तो किती परिपूर्ण आहे, याचा अंदाज येतो.
"सगळ्यांना जेव्हा ध्यानचंद आता शॉट खेळणार आहेत असं वाटायचं, तेव्हा ते अचानक पास करायचे. ते स्वार्थी नव्हते म्हणून असं करायचे असं काही नाही. स्वार्थी तर ते नव्हतेच पण प्रतिस्पर्ध्यांना धक्का बसावा म्हणून ते प्रामुख्यानं असं करायचे. ते तुम्हाला असा पास द्यायचे की, तुम्हाला त्यावर कोणत्याही परिस्थितीत गोल करण्याची इच्छा असायची," असंही केशव दत्त म्हणतात.
वय वाढल्यानंतरही उत्तम खेळायचे ध्यानचंद
1947 पूर्वी आफ्रिकेच्या दौऱ्या दरम्यान केडी सिंह बाबू यांना चेंडू पास केल्यानंतर ते आपल्याच गोलकडे वळाले आणि त्यांनी बाबू यांच्याकडं पाहिलंही नाही.
त्यांना नंतर असं का केलं? याबाबत विचारण्यात आलं. "जर त्या पासनंतरही बाबू यांना गोल करता आला नसता, तर त्यांना माझ्या टीममध्ये राहण्याचा काहीही हक्क नव्हता,'' असं ते त्यावर म्हणाले होते.
1959 मध्ये ध्यानचंद 54 वर्षांचे होते, तेव्हाही भारतीय हॉकी संघातील कुणालाही त्यांच्याकडून चेंडू मिळवता येत नव्हता, असं 1968 मध्ये भारतीय ऑलिम्पक टीमचे कर्णधार राहिलेले गुरुबख्श सिंग यांनी सांगितलं होतं.
1936 च्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ जर्मनीकडून 4-1 नं पराभूत झाला होता.
जर्मनीला दाखवली जादू
"मी जीवंत असेल तोपर्यंत हा पराभव विसरणार नाही. या पराभवानं आम्हाला एवढा धक्का बसला की, आम्ही रात्रभर झोपू शकलो नाही. आम्ही इनसाइड राइट खेळण्यासाठी आयएनएस दारा यांना लगेचच भारतातून विमानानं बर्लिनला बोलावण्याचा निर्णय घेतला," असं ध्यानचंद यांनी त्यांच्या 'गोल' या आत्मकथेत लिहिलं आहे.
दारा उपांत्य सामन्यापर्यंत बर्लिनला पोहोचले.
जर्मनीच्या विरोधात फायनल मॅच 14 ऑगस्ट 1936 ला होणार होती. पण त्यादिवशी खूप पाऊस झाला.
त्यामुळं सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला सामना झाला. मॅचच्या पूर्वी मॅनेजर पंकज गुप्ता यांनी अचानक काँग्रेसचा झेंडा काढला.
सर्व खेळाडूंनी त्याला सॅल्युट केला. (तोपर्यंत भारताचा वेगळा असा ध्वज नव्हता. भारत गुलाम देश असल्यानं युनियन जॅक झेंड्याखाली भारत ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता.)
बर्लिनच्या हॉकी स्टेडियममध्ये त्यादिवशी फायनल पाहण्यासाठी 40,000 प्रेक्षक उपस्थित होते.
प्रेक्षकांमध्ये वडोदऱ्याचे महाराज आणि भोपाळच्या बेगम यांच्यासह जर्मनीतील बड्या हस्तींचीही उपस्थिती होती.
विशेष बाब म्हणजे जर्मनीच्या खेळाडूंनीही भारताप्रमाणे लहान-लहान पास करत खेळण्याचं तंत्र अवलंबलं होतं. हाफ टाईमपर्यंत भारताकडं केवळ एका गोलची आघाडी होती.
त्यानंतर ध्यानचंद यांनी स्पाइक असलेले बूट आणि मोजे काढले अन् अनवाणी पायांनी खेळू लागले. त्यानंतर एकापाठोपाठ गोलचा पाऊस पडला.
"भारतानं सहा गोल केल्यानंतर जर्मनीच्या हॉकीपटूंनी रफ हॉकी खेळायला सुरुवात केली. त्यांच्या गोलकीपरची स्टीक ध्यानचंद यांच्या तोंडावर एवढ्या जोरात लागली की, त्यांचा दात तुटला," असं दारा यांनी नंतर लिहिलं होतं.
"उपचारानंतर ध्यानचंद मैदानात आले. त्यानंतर त्यांनी संघातील सदस्यांना म्हटलं की, आता गोल करायचा नाही. फक्त चेंडूवर नियंत्रण कसं मिळवायचं असतं, ते जर्मनीच्या खेळाडूंना दाखवून देऊ."
"त्यानंतर ध्यानचंद वारंवार चेंडू जर्मनीच्या डीमध्ये घेऊन जायचे आणि पुन्हा चेंडू बॅक पास करायचे. नेमकं काय होत आहे, हेच जर्मनीच्या हॉकीपटुंना समजत नव्हतं."
भारताने जर्मनीचा 8-1 नं पराभव केला आणि त्यात तीन गोल ध्यानचंद यांनी केले होते.
"बर्लिन दीर्घ काळासाठी भारतीय संघाला विसरू शकणार नाही. भारतीय टीमनं ते स्केटिंग रिंगवर धावत असावेत, अशी हॉकी खेळली. त्यांच्या स्टीक वर्कनं जर्मनीच्या टीमला संभ्रमात टाकलं," असं मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्रानं म्हटलं होतं.
ध्यानचंद ड्रिबलिंग करायचे?
ध्यानचंद यांचे पुत्र आणि 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या अशोक कुमार यांनीही एक किस्सा सांगितला. त्यांचा संघ म्युनिकमध्ये सराव करत होता. त्यावेळी एक ज्येष्ठ व्यक्ती व्हील चेअरवर बसून येत होते.
त्यांनी टीममध्ये अशोक कुमार कोण आहे, असं विचारलं.
मला त्यांच्याकडे नेण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मला मिठी मारली आणि अत्यंत भावनिक होत मोडक्या इंग्रजीत ते माझ्याशी बोलू लागले. तुमचे वडील महान खेळाडू होते. त्यांच्या हातात 1936 च्या वृत्तपत्राची पिवळी झालेली कात्रणं होती. त्यात माझ्या वडिलांचं कौतुक करण्यात आलेलं होतं.
ऑलिम्पिकपटू नंदी सिंह यांनी बीबीसी बरोबर बोलताना म्हटलं होतं की, ध्यानचंद खूप ड्रिबलिंग करायचे, असा गैरसमज लोकांमध्ये होता.
पण खरं तर ते ड्रिबलिंग करतच नव्हते. ते चेंडू स्वतःकडे ठेवतच नव्हते. त्यांच्याकडे चेंडू येताच ते संघातील इतर खेळाडूंना पास करायचे.
भारतात परतल्यानंतर ध्यानचंद यांच्याबरोबर एक मजेशीर घटना घडली.
अभिनेते पृथ्वीराज कपूर ध्यानचंद यांचे फॅन होते.
एकदा मुंबईत होत असलेल्या एका सामन्यात ते त्यांच्याबरोबर प्रसिद्ध गायक कुंदन लाल सेहगल यांना घेऊन आले होते.
के. एल. सेहगल यांच्याकडून 14 गाणी ऐकली
हाफ टाईमपर्यंत एकही गोल होऊ शकला नव्हता. सेहगल म्हणाले की, आम्ही तुम्हा दोन्ही भावांचं खूप नाव ऐकलं आहे.
मला आश्चर्य वाटत आहे की, अर्धा वेळ संपला तरी तुमच्यापैकी कोणीही एकही गोल करू शकलं नाही.
त्यावर रूप सिंह यांनी सेहगल यांना विचारलं की, आम्ही जेवढे गोल करू, तेवढी गाणी तुम्ही आम्हाला ऐकवाल का?
सेहगल यांनी होकार दिला. मग काय दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही भावांनी मिळून 12 गोल केले.
पण सामना संपण्यापूर्वी सेहगल मैदानातून निघून गेले होते.
दुसऱ्या दिवशी सेहगल यांनी स्टुडिओत येण्यासाठी ध्यानचंद यांना कार पाठवली.
पण ध्यानचंद तिथं पोहोचले तेव्हा सेहगल म्हणाले की, त्यांचा गाण्याचा मूड निघून गेला आहे.
सेहगल यांनी विनाकारण वेळ वाया घालवला म्हणून ध्यानचंद अत्यंत निराश झाले.
पण दुसऱ्या दिवशी सेहगल स्वतःच्या कारमध्ये त्यांचा संघ थांबला होता त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या सर्वांसाठी 14 गाणी गायली. त्याशिवाय प्रत्येक खेळाडूला त्यांना एक-एक घड्याळ भेट दिली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)