Tokyo Olympic: महिला हॉकी टीमने केवळ सामनाच नाही तर मनंसुद्धा जिंकली

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, बीबीसी

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी (1 ऑगस्ट) ब्रिटनचा 3-1 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला तेव्हा भारतात चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. पण हा आनंद सोमवारी(2 ऑगस्ट) महिला हॉकी संघाने द्विगुणित केला.

भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा 1-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.

गुरजित कौरने 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि सामन्यातला एकमेव गोल मारला. कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वाअंतर्गत संघाने शार्ड मोरिनचे प्रशिक्षण योग्य दिशेने जात असल्याचं दाखवून दिलं.

गट सामन्यात नेदरलँड्सकडून 1-5 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर संपूर्ण भारतीय संघाला खडसावणारे हेच प्रशिक्षक होते. मात्र, त्यानंतरही भारतीय संघाला जर्मनीकडून 0-2 आणि पुन्हा ग्रेट ब्रिटनशी 1-4 ने पराभव पत्कारावा लागला होता.

तेव्हा वाटत होते की, टोकियोतील भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी आता संपुष्टात आली. पण तसं घडलं नाही. कारण आयर्लंडसोबत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने त्यांचा 1-0 ने पराभव केला आणि निर्णायक पूल सामन्यात जपानचा 4-3 असा पराभव केला.

या अटीतटीच्या सामन्यात वंदना कटारियाने तीन गोल मारत हॅटट्रिक केली आणि इतिहास रचला. ऑलिंपिकमध्ये हॅटट्रिक करणारी ती पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली.

भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दबावाखाली दिसला नाही. त्यांचा डिफेंस भक्कम होता ज्याला सात पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघ तोडू शकला नाही. यापूर्वी भारतीय पुरुष संघाने 1962 च्या मेक्सिको ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि 1980 च्या मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ मैदानात कोसळला आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दृश्य सर्वांनी पाहिलं. दुसरीकडे भारतीय महिला खेळाडू उत्साहात एकमेकांना मिठी मारत एकमेकींचं अभिनंदन करत होत्या.

टेलिव्हिजनवर हा सामना पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींचे डोळे सुद्धा पानावले. भारतीय महिला हॉकी संघाकडून अशा विलक्षण खेळाची कोणालाही अपेक्षा नव्हती.

सामन्यानंतर विजयी गोल करणाऱ्या गुरजित कौरने सांगितले की, संपूर्ण संघाने जबरदस्त तयारी केली होती. उपांत्य फेरीत पोहचण्याविषयी ती म्हणाली, 1980 नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याचा मला अभिमान आहे. लोकांच्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत आणि संपूर्ण कोचिंग स्टाफने कठोर परिश्रम केले आहेत.

भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रभावी विजयानंतर बीबीसीने माजी महिला प्रशिक्षक एबी सुबय्या यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, याची कल्पना केली नव्हती. अव्वल मानला जाणारा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला हॉकी खेळाडू केवळ उत्साहाने खेळल्या नाहीत तर त्यांचा पराभव केला.

हा सामना दीर्घकाळ लक्षात ठेवला जाईल कारण तो परिपूर्ण होता. हवामान बदलाचाही परिणाम दिसला कारण प्रचंड उकाडा होता आणि ऑस्ट्रेलिया संघाला याची सवय नाही. संघाचा बचाव भक्कम होता यामुळे त्यांचे सर्व सात पेनल्टी कॉर्नर वाया गेले. हा सामना भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ सामन्यांपैकी एक होता.

गेल्या काही वर्षांत न्यूझीलंड, बेल्जियम आणि अर्जेंटिनासह इतर देशांमध्ये खेळण्याच्या भारतीय महिला संघाच्या फायद्याबद्दल सुबय्या म्हणतात की, याचे संपूर्ण श्रेय हॉकी इंडियाला जाते.

पुरुष आणि महिला संघांना इतकी संधी देण्यात येते की तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये संघ कोसळतो पण आता ती परिस्थिती नाही. आता आरोग्याच्यादृष्टीने भारतीय संघ युरोपियन संघांपेक्षा चांगला खेळत आहे, जे अत्यंत कौतुकास्पद आहे. हॉकी इंडियाने संघाला परदेशी प्रशिक्षकापासून ते सर्व सुविधा पुरवल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक चांगला खेळ खेळला असं सांगू शकत नाही असंही त्या म्हणाल्या. हा सामना सर्वांनी एकत्रितपणे चांगला खेळला.

ऑस्ट्रेलिया संघाचे यांनी चालू दिले नाही. जशी संधी मिळाली तसा स्कोअर केला. डिफेंस केलं. गोलकिपरपासून ते फुल बॅक आणि फॉर्वर्ड्सपर्यंत सगळ्यांनी उत्तम कामगिरी केली. ट्रॅकलिंग सुद्धा उत्तम केले. लेफ्ट आऊट आणि राईट आऊट सुद्धा आवश्यकतेनुसार खेळले.

महिला संघाने आज केलेल्या कामगिरीनंतर सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ कोणत्याही पदकास ते पात्र आहेत. मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी जपानविरुद्धच्या सामन्यात प्रशिक्षक शार्ड मरिन यांनी तीन गोल म्हणून त्यांना अधिक गोल दिल्याचं म्हटलं होतं. कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकायचे होते आणि ते जिंकले.

खेळपट्टीचे तापमान 35 अंशांपेक्षा जास्त होते आणि दमटही होते. कामगिरीत सातत्य आवश्यक आहे. उपांत्यपूर्व फेरीत एक नवीन सुरुवात आहे. पूल सामन्यांच्या कामगिरीला महत्त्व राहत नाही. तिथे वेगळ्या रणनीतीची आवश्यकता असते आणि भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध वेगळा खेळ केला. आक्रमक हॉकी खेळून त्यांना हरवले.

महत्त्वाचे म्हणजे या विजयानंतरही भारतीय महिला हॉकी संघासाठी पुढील मार्ग सोपा नाही. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना अर्जेंटिनाशी होणार असून त्यांनी जर्मनीवर 3-0 अशी एकतर्फी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

अर्जेंटिना सध्या जगातील दोन नंबरचा संघ आहे. 2000 सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये त्यांनी रौप्य, 2004 च्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये कांस्य, 2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य आणि 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)