You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिम्पिक : कमलप्रीत कौर पदक जिंकून रचू शकते इतिहास
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, भारतीय भाषा
भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौर ती कमाल करून दाखवण्याची शक्यता आहे, जी स्वतंत्र भारताच्या इतिहास कोणतीही महिला खेळाडू करू शकली नाही. ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदक मिळवण्याची कमाल.
कमलप्रीत कौरनं चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत डिस्कस थ्रोच्या (थाळीफेक) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कमलप्रीत कौरची अंतिम फेरी आज (2 ऑगस्ट) होणार आहे.
अॅथलेटिक्समध्ये भारताला पदक मिळावं, ही ऑलिम्पिक शर्यतीत पदकाच्या जवळ पोहोचलेल्या मिल्खा सिंग यांची शेवटपर्यंत हीच इच्छा होती.
ऑलिम्पिकमध्ये थाळीफेकच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर कमलप्रीत कौरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण हेही तितकंच खरं आहे, याआधी अनेकांना तिचं नाव आणि खेळही माहिती नव्हता.
ऑलिम्पिकपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखातीत जेव्हा कमलप्रीतला खेळाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा तिनं सांगितलं, "मी राष्ट्रीय पातळीवर पदकं मिळवायला सुरुवात केली, तेव्हा सगळे जण कौतुक करायला लागले. पण, कौतुक करून झालं की ते विचारायचे की डिस्क थ्रो नेमकं काय असतं? ते कसं खेळतात?"
पण, प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कमलप्रीत कौरनं गेल्या दोन-तीन वर्षांपासून कठोर मेहनत घेत ऑलम्पिकपर्यंत मजल मारली आहे.
पंजाबच्या एका गावातून सुरू झाला प्रवास
कमलप्रीत पंजाबच्या मुख्तसर साहब जिल्ह्यातल्या एका छोटाशा गावातून येते. जेव्हा तिनं खेळायला सुरुवात केली, तेव्हा गावात खेळाच्या काही विशेष सुविधा नव्हत्या.
विचारत विचारत एकदा ती बादल गावच्या स्पोर्ट्स सेंटरवर पोहोचली आणि तिथून मग खेळाला सुरुवात केली. चांगल्या शरीरयष्टीच्या कमलप्रीतनं डिस्कसमध्ये खेळायला सुरुवात केली आणि यश मिळवायला सुरुवात केली.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये गावात योग्यप्रकारे मार्गदर्शन मिळालं असतं तर टोकियो नाही, तर रियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार राहिले असते, असं कमलप्रीत यांना वाटतं.
पण, याच्याही आधी कमलप्रीतला एका आव्हानाचा सामना करावा लागला. आजही गावखेड्यात मुलींना खेळायला पाठवायचं म्हटलं, तर त्याविषयी संकोच बाळगला जातो.
कमलप्रीत सांगते, "गावात जसं वातावरण होतं त्याप्रमाणे मुलीनं थोडफार शिकावं आणि मग लग्न करावं, असं आई-वडिलांना वाटायचं. पण, मी मात्र माझ्या मतावर ठाम राहिले आणि कुटुंबालाही समजवण्यात यशस्वी ठरले."
कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कमलप्रीतला एकप्रकारची ताकद मिळाली. तसंच कमलप्रीत यांनी जो निर्णय घेतला, त्यावर ती खरी उतरली.
2019मध्ये तिनं डिस्कस थ्रोमध्ये अनेक वर्षं जुना विक्रम मोडीत काढला.
टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?
शेतीमुळे कमलप्रीतचे आई-वडील तिच्यासोबत जाऊ शकत नसायचे. शिवाय प्रवासासाठी विमानाचे तिकीटही काढू शकत नसायचे. पण, पुढे जाण्यासाठी कमलप्रीतची हिम्मत मात्र खूप जास्त होती.
यंदा तिनं फेडरेशन कप स्पर्धेत 65.06 मीटर अंतर थाळी फेकली. त्यानंतर काही दिवसांनी 66.59 मीटर थाळी फेकली. 65 मीटर अंतर पार करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी सराव तर करायचे, पण खेळाचे इतर पैलू जसं की डाएट किंवा खानपान याविषयी काही अंदाज नसल्याचं ती सांगते.
बीबीसीला तिनं सांगितलं होतं, "गावात तर भाजीपोळी खाणं यालाच चांगला आहार असं समजलं जायचं. पण नंतर मार्गदर्शन मिळालं आणि न्यूट्रिशनचा अर्थ समजला. त्यानंतर मग मी डायटवर लक्ष द्यायला सुरुवात केली."
गेल्या 2 वर्षांत कमलप्रीतनं आपल्या कामगिरीत सातत्यानं सुधारणा केली आहे आणि ती आता ऑलिम्पिकमध्ये दिसून येत आहे.
क्रिकेटचीही आवड
कमलप्रीतला अनेक खेळ आवडतात. यात क्रिकेटचाही समावेश आहे. तिला क्रिकेटर बनायची इच्छा आहे. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा क्रिकेटमध्ये नशीब आजमावयाची तिची इच्छा आहे.
पण सध्या तरी तिचं लक्ष डिस्कर थ्रो आणि ऑलिम्पिक पदकावरच आहे.
कमलप्रीत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं करत होती, तेव्हा तिचे वडील शेतात काम करत होते. कारण शेतीचं काम काही थांबू शकत नव्हतं.
कुटुंबीय आता कमलप्रीतची आतुरतेनं वाट पाहत आहेत. कमलप्रीतला पदक मिळावं अशी त्यांची इच्छा आहेच, पण आपली मुलगी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणं हेही कमलप्रीतच्या कुटुंबीयांसाठी एखाद्या पदकाहून कमी नाहीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)