जहांगीर : करीना कपूर -सैफनं दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं, ज्यामुळे ते पुन्हा ट्रोल झाले?

करिना कपूर- सैफ अली खान

फोटो स्रोत, INSTAGRAM/KAREENA KAPOOR

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, मुंबईहून

अभिनेते सैफ अली खान आणि करीना कपूर एका नव्या वादात अडकलेत. यावेळी वाद सिनेमाचा नाही तर मुलाच्या नावावरून आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात करीना कपूरने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या दुसऱ्या मुलाचं नाव 'जेह' आहे असं वाटत होतं.

नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या 'करीना कपूर खान - प्रेग्नंसी बायबल' या पुस्तकात 'जेह'चं पूर्ण नाव समोर आल्याचं काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. चित्रपट निर्माते करण जोहरसोबत करीना कपूरने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून या पुस्तकाचं प्रकाशन केलं.

करिनाच्या या पुस्तकात तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'जहांगीर' असल्याचा उल्लेख असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. स्वतः करीना कपूर किंवा सैफ अली खान यापैकी कुणीच याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. जहांगीरचा अर्थ होतो जगावर राज्य करणारा. हा फारसी भाषेतला शब्द आहे.

बीबीसीने करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांच्याशी फोनवरून बातचीत केली. ते म्हणाले, "आम्ही त्याला घरी 'जेह' म्हणतो. जहांगिर नाव आहे की नाही याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. बाळाचे आई-वडील काही दिवसात स्वतःच खुलासा करतील."

तैमूर

फोटो स्रोत, INSTA/KAREENA

फोटो कॅप्शन, तैमूर आपल्या लहान भावासोबत

सैफ आणि करीनाने आपल्या पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवलं त्यावेळीदेखील बराच वाद झाला होता आणि आता दुसऱ्या बाळाच्या नावावरूनही वाद सुरू झाला आहे.

सोशल मीडियावर आलेल्या काही प्रतिक्रियांमध्ये ज्या जहांगीरच्या आदेशावरून शीख गुरू अर्जन देव यांची हत्या करण्यात आली त्या जहांगीरच नाव आपल्या मुलाला का दिलं, असा सवाल करण्यात आला आहे.

याच लेखात पुढे आम्ही तुम्हाला जहांगीर आणि अर्जन देव यांच्यात काय घडलं होतं, याची संपूर्ण कहाणीही सांगणार आहोत.

करिनाच्या पुस्तकाचा विषय काय?

'करीना कपूर खान - प्रेग्नंसी बायबल' या पुस्तकात करीनाने आपल्या दोन्ही मुलांच्या जन्माचा अनुभव कथन केला आहे.

पुस्तकाच्या शेवटच्या काही पानांमध्ये करीनाने आपल्या दोन्ही मुलांचे काही फोटोही दिलेत. मात्र, सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या फोटोंप्रमाणेच पुस्तकातल्या फोटोंमध्येही लहान मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.

करिना कपूर- सैफ अली खान

फोटो स्रोत, INSTAGRAM/KAREENA KAPOOR

करीना कपूरने याआधीही एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे - 'द स्टाईल डायरी ऑफ बॉलीवुड दिवा'.

पाच महिन्यांची गर्भवती असताना करीनाने आमीर खान सोबत 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाचं शूटिंग केल्याची माहितीही या पुस्तकात आहे.

करीनाने म्हटलं आहे, "तैमूरच्या वेळी वेळ आरामात गेला. मात्र, कोरोना काळात सारखी भीती वाटायची. मला कोव्हिडची लागण तर होणार नाही ना, अशी भीती वाटायची. माझ्या मुलाला काही होऊ नये, असं वाटायचं. अनेक विचार यायचे. मात्र, माझ्या कुटुंबाने मला सांभाळून घेतलं. मी त्यांची ऋणी आहे."

करण जोहरशी साधलला संवाद

पुस्तक प्रकाशनाच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये करीनाने तिचा मित्र करण जोहरशी अनेक विषयांवर गप्पा मारल्या.

करीनाने सांगितलं, "10 वर्षांपूर्वी मी लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळी सगळे मला म्हणायचे की माझं करिअर संपेल, मला काही मिळणार नाही. पण, मी हेच म्हणेन की आज सिनेमा बदलतोय."

ती पुढे सांगते, "आता लग्न झालेल्या अभिनेत्रींनाही काम मिळतं. मी आजच्या काळात काम करते, याचा मला आनंद आहे. आज दीपिका आणि विद्या बालन सारख्या अभिनेत्री लग्न करून संसारही सांभाळतात आणि सिनेमांमध्येही उत्तम काम करतात."

वयाने बऱ्याच मोठ्या आणि आधीच एक लग्न झालेल्या पुरुषाशी लग्न, मुलाचं नाव तैमूर ठेवणं, या सगळ्या गोष्टींवरून करीना कपूरला टीकेचा सामना करावा लागला होता.

त्यावर करीना म्हणते, "माझ्याविषयी सांगायचं तर मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मला वाटतं ऐकावे जनाचे करावे मनाचे. आतापर्यंत मी असंच करत आले आहे आणि यापुढेही तेच करणार जे मला करायचं असेल. मी सगळ्यांना हेच सांगेन की कुणाचीही भीती बाळगू नका."

करीना आणि सैफ यांनी 6 सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

जहांगीरविषयी

मुघल बादशाह जहांगीरने भारतावर 1605 ते 1627 पर्यंत राज्य केलं.

जहांगीर अकबराचा पुत्र होता आणि आग्र्यात ताजमहालसारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू बनवणाऱ्या शाहजहानचे वडील होते.

तुम्ही मुघल-ए-आझम सिनेमा बघितला असेल किंवा इतिहास वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल की अकबराला मूल होत नव्हतं.

अकबराने संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यावर नवस केला होता की, "तुम्ही मला एक मुलगा दिला तर मी आग्रा ते अजमेर पायी येऊन दर्गावर माथा टेकेन."

जहांगीर

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर अकबर मोईनुद्दीन चिश्तीचे शिष्य आणि पीर सलीम चिश्तीकडे जाऊ लागले. पुढे अकबराला मुलगा झाला. त्याचं नाव सलीम ठेवण्यात आलं. पुढे जग त्या मुलाला जहांगीरच्या नावाने ओळखू लागलं.

गुरू अर्जन देव आणि जहांगीर

सीख गुरू अर्जन देवने जहांगीरचा बंडखोर मुलगा खुसरोला मदत केली होती आणि याचा जहांगीरला राग होता.

प्रसिद्ध इतिहासकार मुनी लाल यांनी जहांगीरवर पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "रागाने लाल झालेल्या जहांगीर अर्जन देवला म्हणाले, 'तुम्ही संत आहात आणि एक पवित्र व्यक्ती आहात. तुमच्याससाठी गरीब-श्रीमंत सगळे सारखे आहेत. तुम्ही माझा शत्रू खुसरोला पैसे का दिले?'

यावर गुरू म्हणाले, 'मी त्याला पैसे दिले कारण तो प्रवासावर निघाला होता. तो तुमचा विरोधक होता म्हणून पैसे दिले नाही. मी त्याला पैसे दिले नसते तर सगळ्यांनी मला झिडकारलं असतं. तुमच्या भीतीमुळे मी पैसे दिले नाही, असं म्हणाले असते. मी या जगात गुरू नानकचा शिष्य म्हणवून घ्यायला पात्र ठरलो नसतो.'"

ते पुढे लिहितात, "गुरू नानकचा उल्लेख येताच जहांगीर संतापले. त्यांनी गुरू अर्जन देव यांना 2 लाख रुपयांचा दंड सुनावला आणि त्यांना 'गुरू ग्रंथसाहिब'मधल्या हिंदू आणि मुस्लिमांच्या भावना दुखावणारा भाग वगळण्यास सांगितलं."

यावर गुरू अर्जन देवांनी उत्तर दिलं, "माझ्याकडे असलेला पैसा गरिबांचा आहे. तुम्ही पैसे मागितले तर मी ते सगळे पैसे देऊ शकतो. पण, दंड म्हणून एकही पैसा देणार नाही. कारण दंड ढोंगी आणि ऐहिक लोकांवर लावतात. साधू-संतांवर नव्हे."

"जहांगीरने यावर काहीच उत्तर दिलं नाही. ते दरबारातून उठून निघून गेले. दोन दिवसांनंतर गुरू अर्जन देव यांना अटक करून कोठडीत डांबण्यात आलं. तीन दिवसांनंतर त्यांना रावी किनारी नेऊन त्यांना ठार करण्यात आलं."

जहांगीर शासक म्हणून कसे होते?

जाणकारांच्या मते जहांगीरचं सैन्य मोहिमांपेक्षा कला आणि जीवनातील ऐहिक सुख-चैनींचा आनंद घेण्यात त्यांना अधिक रस होता.

जहांगीर

फोटो स्रोत, Getty Images

स्त्री आणि मद्याचेही ते शौकीन होते.

'तुजुक-ए-जहांगिरी' हे जहांगीरचं आत्मचरित्र आहे. यात ते लिहितात की ते एका दिवसात 20 ग्लास मद्य प्यायचे. 14 दिवसा आणि 6 रात्री. पुढे त्यांनी मद्यपान कमी केलं आणि दिवसभरात 6 ग्लास मद्यपान करायचे.

बाबरनंतर जहांगीर यांनीच आत्मकथा लिहिली आहे.

'An Intimate Portrait of a great Mughal Jahangir' हे पुस्तक लिहिणाऱ्या पार्वती शर्मा सांगतात, "त्यांनी स्वतः सांगितलं आहे की, 18 वर्षांचे असताना ते एकदा शिकारीला गेले होते. त्यांना थकवा जाणवत होता. त्यावेळी कुणीतरी म्हणालं की थोडं मद्य घ्या, थकवा दूर होईल. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मद्याला स्पर्श केला आणि त्यांना ती आवडली. पुढे ते रोजच मद्यपान करू लागले. जहांगीरच्या दोन्ही भावांनाही दारुचं व्यसन जडलं आणि त्यांचा मृत्यूही दारूनेच झाला."

अकबर आणि जहांगीर यांचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते. जहांगीरने अकबरचे जवळचे मित्र आणि अकबराचं चरित्र लिहिणारे अबुल फझल यांना ते दख्खनहून आग्र्याला येत असताना ओरछाचे राजे बीर सिंह देव यांच्या मदतीने ठार केलं होतं. या घटनेनंतर या पिता-पुत्रांच्या संबंधात अधिकच कटुता आली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)