सलमान, शाहरुख, आमिर यांच्यात सर्वाधिक 'संघर्ष' कुणी केला?

- Author, मधु पाल
- Role, बीबीसी
शाहरुख, सलमान आणि आमिर - बॉलिवूडच्या या तीन सुपरस्टार्समध्ये कोणकोणत्या गोष्टी समान आहेत?
तिघंही खान आहेत. तिघांचंही जन्मवर्ष एकच (1965) आहे.
एवढेच नव्हे तर तिघंही तीन दशकांहून अधिक काळापासून प्रेक्षकांच्या ह्दयावर राज्य करत आहेत.
या तिघांनी सिनेसृष्टीत आपली ओळख बनवायला सुरुवात केली तो काळ होता आधुनिकीकरण, राम मंदिर आणि आर्थिक संकटांचा.
तरीही तिन्ही खान बॉलीवूडमध्ये संघर्ष करत आपलं नाव कमवण्यात यशस्वी झाले, याचा उल्लेख ज्येष्ठ पत्रकार कावेरी बमजई यांनी आपलं नवं पुस्तक 'द थ्री खान्स: अँड द इमरजंस ऑफ न्यू इंडिया' यात केला आहे.
आधुनिकता, संस्कार आणि अर्थव्यवस्थेसोबत पुढे वाटचाल
ज्येष्ठ पत्रकार कावेरी बमजई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला एक गोष्ट खूप मनोरंजक वाटली ती म्हणजे 1988 साली तिघंही आपल्या करिअरची सुरुवात करत होते. त्यावेळी आपल्याकडे सर्वकाही एकच असायचं. एक चॅनेल, एक टीव्ही, एक टेलिफोन, एकेरी पडदा. या तिघांच्या करिअरमध्ये जसे बदल होत गेले तसा भारतसुद्धा बदलला."

फोटो स्रोत, Westland Non-fiction
"'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'मैंने प्यार किया' आणि 'कयामत से कयामत तक' हे सिनेमे पाहिल्यानंतर लक्षात येतं की यात तिघांनी एक समर्पित प्रेमी, पती आणि मुलगा अशा भूमिका साकारल्या. पडद्यावर मध्यमवर्गाची मूल्य सुद्धा ताकदीने दाखवण्यात आली."
'विजय'ची जागा जेव्हा 'राज' आणि 'प्रेम'ने घेतली
यापूर्वीचे सिनेमांमध्ये ग्रामीण भागातील समस्या, समाजातील अन्यायाचा सूड आणि गरीबी असायची. पण बदलत्या काळानुसार 'साथी हात बढाना', 'दिल मांगे मोअर' अशा सिनेमांची नांदी सुरू झाली. पूर्वीसारखं काही राहिलं नाही, सर्वकाही बदलत होतं.
कावेरी बमजई सांगतात, "90 च्या दशकात लोकांना खाद्यपदार्थ, सुंदर कपडे आणि जग फिरण्याची इच्छा होती. लोक स्वीझरलँड जाण्याची स्वप्न पहायचे. यांच्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षक आपली स्वप्न पूर्ण करत होते."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
"जगभरात बाजारपेठा खुल्या होऊ लागल्या, आयटी उद्योग मोठा झाला, कॉल सेंटरचा काळ आला आणि सिनेमांमध्ये 'विजय'च्या कॅरेक्टरची जागा 'प्रेम' आणि 'राज'ने घेतली. आम्ही आनंदात होतो. शहरीकरण होत होतं. लोक एका जागेवरुन दुसरीकडे जात होते,"
"सिनेमांमधून गाव आणि गरीबी गायब होऊ लागली. 80 च्या दशकांत पडद्यावर जी आक्रमकता दिसायची ती कमी झाली होती. 'बाजीगर', 'अंजाम' किंवा 'डर' यांसारख्या सिनेमांमध्ये राग, रोष दिसला तरी तो वैयक्तिक असायचा. सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर नव्हता,"
हिरो गिटार पकडायचा तर हिरोईन घोड्यावर स्वार
80 दशकाच्या उत्तरार्धात लोकप्रिय हिंदी सिनेमा व्हीसीआरपासून लांब जात होता. तिन्ही खान आले आणि त्यांनी कौटुंबिक प्रेक्षकांना सिनेमागृहात पुन्हा खेचून आणलं.
कावेरी बमजई म्हणाल्या, "'हुकूमत' आणि 'तेजाब' यांसारख्या सिनेमांच्या काळातही 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया' आणि 'दीवाना' सिनेमांमधून प्रेक्षकांनी आमिर खानची क्यूट हिरोची प्रतिमा स्वीकारली."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
आमिर खानने 'पापा कहते है बडा नाम करेगा' हे पडद्यावर नवीन पीढीला डोळ्यासमोर ठेऊन साकारलं. ही पिढी वय झालेले धर्मेंद्र किंवा पडद्यावर आक्रमक असणाऱ्या अनिल कपूर सोबत स्वत:ला जोडत नव्हती."
बदल घडवण्यासाठी म्हणजे जसं कावेरी बमजई सांगतात, "हिरोने हातात गिटार घेत आणि हिरोईन घोड्यावर स्वार होऊन आपली भूमिका साकारत आहे. ती जुही चावला होती जी आमिर खानला एका वेगळ्या प्रकारे ओळखू शकत होती."
शाहरुख खानने जोखीम घेतली आणि बनला पॉस्टर बॉय
कावेरी बमजई यांनी आपल्या 30 वर्षांच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये शाहरुख, आमिर आणि सलमान यांचे काम जवळून पाहिले.
तिघांपैकी कोणत्या खानचा प्रवास सर्वाधिक खडतर होता? याविषयी बोलताना कावेरी सांगतात, "सगळ्यात मोठं आव्हान शाहरुख खान समोर होतं. अनेक नवीन कलाकार इंडस्ट्रीमध्ये आले. पण शाहरुख पहिला होता जो बाहेरुन आला."

फोटो स्रोत, ANI
अमिताभ बच्चनसुद्धा कोलकात्याहून आले होते. पण इंदिरा गांधी यांच्या मुलाचे मित्र असल्याने त्यांचं एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना अशापद्धतीने ओळखलं जायचं. पण शाहरुख खानचं इंडस्ट्रीमध्ये कोणीही नव्हतं. केवळ आपल्या टॅलेंटच्या जोरावर शाहरुखने प्रवेश केला."
"सुरुवात टीव्हीपासून केली पण निश्चय करुन बाहेर पडले आणि मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. सलमान आणि आमिर ज्या सिनेमांना नकार द्यायचे शाहरुख ते सिनेमे करायचा. 'बाजीगर' सिनेमासाठी आधी सलमान खानला विचारण्यात आलं होतं. पण त्याने नकार दिला,"
"'डर' सिनेमाची ऑफर आधी आमिर खानकडे होती. त्यांने नकार दिल्याने हा सिनेमा शाहरुखकडे आला. शाहरुख खानने आपल्या आयुष्यात जोखीम घेतली."
"शाहरुख खानला बॉलीवूडच्या पंजाबी हिंदू क्लबची साथ मिळाली, यश चोप्रा, यश जोहर, आदित्य चोप्रा आणि नंतर करण जोहर यांच्यामुळे शाहरुख पोस्टर बॉय बनला."
चुका आणि फ्लॉप सिनेमे
सलमान आणि आमिरच्या दीर्घ प्रवासाबद्दल कावेरी सांगतात, "आमिर आणि सलमान दोघंही सिनेसृष्टीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातले आहेत. पण तरीही त्यांच्यासाठीही फिल्मी करिअर सोपं नव्हतं."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
"आमिर खानचे वडील हिंदी सिनेसृष्टीत कधीही यशस्वी नव्हते आणि सलीम खान यांनी लेखक म्हणून खूप नाव कमावलं. पण आपल्याकडे लेखकांना तेवढा दर्जा मिळाला नाही जेवढा त्यांचा हक्क आहे."
"त्यामुळे पहिला सिनेमा मिळवण्यासाठी दोघांनाही हात-पाय मारावे लागले. तिघांनीही पहिला यशस्वी सिनेमा दिल्यानंतर खूप चुका केल्या आणि सिनेमे फ्लॉप ठरले."
मीडियाच्या टीकेमुळे नाराज
'द थ्री खान्स: अँड द इमर्जंस ऑफ न्यू इंडिया' या पुस्तकाच्या कव्हरपेज संदर्भात सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेविषयी कावेरी सांगतात, "मला प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत आहे. आमिरचा 'लगान' सिनेमातला फोटो, सलमानचा 'दबंग' आणि शाहरुखचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मधला फोटो का निवडला?"
"हे सिनेमे यांच्या करिअरचे टर्निंग पॉईंट समजले जातात. हे सिनेमे करण्यापूर्वी तिघांकडून खूप चुका झाल्या. पण या चुकांना विसरुन, त्यातून शिकवण घेत ते पुढे जात राहिले. सलमान मीडियावर नाराज असल्याचा उल्लेखही माझ्या पुस्तकात आहे."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
"सलमानला कायम वाटत आलं आहे की मीडिया त्यांना पसंत करत नाही. सर्वाधिक टीका केली जाते. सलमानने आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप चुका केल्या,"
"फुटपाथवर झोपलेल्या लोकांचे प्रकरण, त्यानंतर हरणाला मारल्याचे प्रकरण. पण एवढी गंभीर टीका होऊन सुद्धा सलमानच्या चाहत्यांनी त्याला खूप प्रेम दिलं."
आता तो काळ नव्हता जिथे खान आडनाव बदलण्याची गरज भासेल
समाजाची विचारसरणी बदलत होती. त्यामुळे या तिघांनाही आपलं खान नाव बदलण्याची आवश्यकता भासली नाही.
कावेरी सांगतात, "आता तो काळ नव्हता जिथे आडनाव बदलण्याची गरज भासेल. पण जर तुम्ही खान आहात तर धर्म तुमचा सगळ्यात मोठा फॅक्टर असेल."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
"आजकाल राजकारणात तुमची ओळख हा महत्त्वाचा पैलू बनला आहे. त्यात धर्म, जात आणि लिंग या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत. पण हे तिघंही यापासून लांब राहिले. आमिरची पत्नी हिंदू होती, शाहरुखची पत्नी हिंदू आहे. दोघांनीही धर्म अत्यंत सुंदर पद्धतीने निभावला,"
शाहरुख आणि आमिरप्रमाणेच सलमानचे चाहते सुद्धा हिंदू-मुस्लीम दोन्ही आहेत. शिक्षित, यशस्वी आणि नोकरवर्ग जे कदाचित जास्त यशस्वी नसतील पण सगळ्यांनीच यांच्या कामाचे कौतुक केले."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
कावेरी यांच्यानुसार, "तिघंही सामान्य माणसाला सिंगल स्क्रिन सिनेमागृहातून मल्टिप्लेक्स सिनेमागृहापर्यंत आणण्यात यशस्वी झाले. यांच्या करिअरमध्येच सिल्हर ज्युबिली आणि गोल्डन ज्युबिली ही संकल्पना संपुष्टात आली."
'शोले'नंतर संगीत
लोकप्रीय ट्रेडतज्ज्ञ आमोद मेहरा यांच्यानुसार, "या तिघांच्या यशाचं श्रेय त्यांनी सिनेमांमध्ये निवडलेल्या संगीताला सुद्धा जातं. ज्या काळात सगळे अक्शन हिरोच्या भूमिकांना प्राधान्य देत होते त्याकाळात हे तिघं रोमँटिक हिरोच्या भूमिकेसह पडद्यावर आले आणि यांची साथ दिली संगीताने. यांच्या सिनेमातील गाणी एवढी लोकप्रिय होती की प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणायची. रोमँटिक सिनेमे तरुणांच्या मनावर राज्य करू लागले आणि त्यांनीही तरुण पीढीलाच टार्गेट केलं."
काहीतरी नवीन करावं लागेल
ओटीटी माध्यमांमुळे आगामी काळ या कलाकारांसाठी आव्हानात्मक असेल, याविषयी अमोद मेहरा सांगतात, "आमिरने स्वत:ला वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी तयार केलं आहे.
जसं आपण 'दंगल'मध्ये पाहिलं. अशा कहाण्या घेऊन ते येत राहतील. आता सलमान आणि शाहरुख खान यांना अक्शन आणि रोमँटिक सिनेमा सोडून काहीतरी नावीन्यपूर्ण करावं लागेल नाहीतर त्यांच्यासाठी कठीण काळ येऊ शकतो."

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial
कावेरी सांगतात, "ओटीटी असो वा इतर कोणतंही माध्यम या कलाकारांची यशस्वी कारकीर्द यापुढेही कायम राहिल. सिनेमागृह सुरू झाल्यानंतर पुन्हा त्यांची चलती दिसून येईल. पण आता त्यांना आधीच्या तुलनेत काहीतरी नवीन आणि वेगळं करावं लागेल. प्रेक्षकांसोबत यांची साथ 30 वर्षांची आहे. ती एवढ्या लवकर आणि सहज संपणार नाही. केवळ नावीन्य आणण्याची गरज आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








