You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन गडकरींची इंधनाचा खर्च 20 टक्क्यांनी कमी करणाऱ्या गाड्यांचं उत्पादन करण्याची सूचना #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'इंधनाचा खर्च कमी करणाऱ्या फ्लेक्स फ्युअलच्या गाड्या तयार करा' - नितीन गडकरी
देशात इंधनाचा खर्च 30 ते 40 टक्क्यांनी वाढला आहे. यावर तोडगा म्हणून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना इंधनाचा खर्च 20 टक्क्यांनी कमी करणाऱ्या गाड्यांचे उत्पादन करण्यास सांगितलं आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
नितीन गडकरी यांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी फ्लेक्स फ्युअलवर चालणाऱ्या गाड्या कशा तयार करता येतील याकडे लक्ष द्या असे निर्देश दिले आहेत.
फ्लेक्स फ्युअल गाड्यांमधील इंजिन एकापेक्षा अधिक इंधनावर गाडी चालवू शकतं. ही गाडी पेट्रोल आणि इथेनॉल दोन्ही इंधनांवर चालू शकते. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर बाजारात येतील यादृष्टीने कामाला लागा अशी सूचना त्यांनी केली आहे.
देशात इथेनॉलची किंमत 60-70 रुपये आहे. मागणीनुसार उत्पादन वाढले तर किंमती आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांचा इंधनांवरील खर्च कमी होईल असंही नितीन गडकरी म्हणाले होते.
2. आरक्षणाचे अधिकार राज्यांना देऊन केंद्राने काय साध्य केलं? - अशोक चव्हाण
केंद्र सरकारने आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारला देऊन काय साध्य केलं? असा प्रश्न मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
आरक्षणासाठी केवळ राज्यांना अधिकार देऊन उपयोग नाही तर 50 टक्क्यांची अट शिथिल करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्यांना दिल्याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार नसल्याचं अशोक चव्हाण म्हणणं आहे. त्यासाठी 50 टक्क्यांची अट शिथिल करा अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.
यासंदर्भात मात्र केंद्राने कोणताही निर्णय घेतला नाही. मोदी सरकारला फक्त वेळकाढूपणा करायचा आहे का? अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
8 जून 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आता राज्यातील भाजपने आरक्षणासाठीची 50 टक्क्यांची अट शिथिल करण्याचा आग्रह केंद्रातील भाजप सरकारकडे करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
3. 'मागच्या दाराने टक्केवारी घ्यायची हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे धंदे आहेत' - आशिष शेलार
महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही अटी न ठेवता अदानींकडे विमानतळ हस्तांतरित करण्याचा ठराव केला. ठराव करायचे आणि मागच्या दाराने भेटून टक्केवारी घ्यायची हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धंदे आहेत, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाजप सरकारनेच दिले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राज ठाकरेंच्या भेटीचे कारण विचारले असता त्यांनी भाजप मनसेसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
राज्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो पूर असो वा कोरोना आरोग्य संकट लोकांचे जीव वाचवण्यापेक्षा मृतांचे आकडे जाहीर करणारं सरकार राज्यात आहे असंही ते म्हणाले.
कोरोना काळात आकडे लपवण्यात आले आणि कोकणात रेड अलर्ट असूनही नागरिकांचे प्राण कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत असा आरोपही शेलार यांनी केला आहे.
4. लोकल प्रवास सुरू करण्यासाठी मनसेची उच्च न्यायालयात याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत रेल्वे लोकल सेवा सुरू करावी या मागणीसाठी उच्च न्यायलयाकडे दाद मागितली आहे. रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत असून त्यांना नोकरी सोडावी लागत आहे असा दावा मनसेने केला आहे. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
ज्या नागरिकांनी दोन लशी घेतल्या आहेत त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी अशी याचिका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अखिल चित्रे यांनी दाखल केली आहे.
सध्या रेल्वे बंद असून केवळ सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. परंतु सरकारने सर्व कंपन्या, आस्थापने सुरू केल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
रेल्वे नसल्याने अनेक जण अनधिकृतपणे प्रवास करत आहेत असा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.
5. म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी दसऱ्याला
म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी दसऱ्याला काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
या लॉटरीत पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत 6500 घरं, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत 2 हजार घरं आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. कोरोना काळात म्हाडाची लॉटरी प्रलंबित होती. साधारण दोन वर्षांनंतर म्हाडाने लॉटरीची घोषणा केली आहे.
ही घरं ठाणे, वर्तकनगर, मीरारोड, कल्याण, वडवली, गोथेघर, विरार बोळींज नाका याठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एकूण 9 हजार घरं असून निम्न आणि मध्यमवर्गीयांसाठी असणार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)