You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना 'बूस्टर डोस' घ्यावा लागेल का?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस गरजेचा आहे का? असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.
कोरोना व्हायरसचे म्युटेट होणारे नवीन व्हेरियंट पाहता, देशभरातील तज्ज्ञांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असल्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॅा. शशांक जोशी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बूस्टर डोसबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. यावर सद्यस्थितीत भाष्य करणं योग्य होणार नाही."
तर केंद्राने राज्यसभेत तज्ज्ञांच्या समितीने बूस्टर डोसबाबत अद्याप कोणतीही शिफारश केलेली नाही, अशी माहिती दिलीये.
लशीचा बूस्टर डोस म्हणजे काय? याची गरज आहे का? हा डोस कोणाला घेण्याची गरज आहे? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बूस्टर डोस म्हणजे काय?
सामान्यतः लशीचा एक किंवा डोस दिले जातात.
तज्ज्ञ म्हणतात, लशीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या डोसला 'बूस्टर डोस' असं म्हटलं जातं.
आता सामान्यांना प्रश्न पडेल की, बूस्टर डोस म्हणून देण्यात येणारी लस, आम्ही आधी घेतलेल्या कंपनीची असेल का पूर्णत नवीन? याबाबत आम्ही लसीकरण आणि पब्लिक पॉलिसीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांच्याशी संपर्क केला.
ते म्हणतात, "बूस्टर डोस म्हणजे काही वेगळी लस देण्यात येत नाही. शक्यतो एखाद्या व्यक्तीने याआधी जी लस घेतली असेल, तीच लस दिली जाते."
"पण कोरोनाविरोधात विविध लशी उपलब्ध असल्याने, दुसर्या कंपनीचा बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही."
लशीमुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाविरोधात लढण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लसीकरणतज्ज्ञ म्हणतात, आजाराविरोधात लढण्यासाठी गरजेच्या अन्टीबॉडीजची संख्या वाढवण्यासाठी, बूस्टर डोस महत्त्वाचा असतो.
कोरोनाविरोधात बूस्टर डोसची गरज का आहे?
जगभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी विविध लशी निर्माण करण्यात आल्या आहेत. या लशी म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 च्या नवीन व्हेरियंटविरोधात प्रभावी आहेत का? यावर लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून संशोधन सुरू आहे.
डॉ. लहारिया पुढे सांगतात, "कोरोना संसर्गानंतर आणि कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अन्टीबॉडीज नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ रहातात, असे पुरावे संशोधनात मिळाले आहेत."
लशीचा डोस घेतल्यानंतर कालांतराने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बूस्टर डोसची गरज भासू शकते, असा तर्क लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून दिला जातोय.
"शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॅाडीज आणि आजारापासून मिळणारी सुरक्षा यांचा थेट संबंध स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे, याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे," असं ते पुढे म्हणाले.
कोरोना व्हायरस दिवसेंदिवस आपलं रूप बदलतोय. जगभरात थैमान घालणारा डेल्टा व्हेरियंट, डेल्टा प्लस, लांब्डा, कप्पा असे अनेक व्हेरियंट तयार झालेत.
त्यामुळे कोरोनाविरोधात बूस्टर डोसची गरज असल्याची चर्चा सुरू झाली.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS) संचालक डॅा. रणदिप गुलेरिया सांगतात, "आपल्या सर्वांना माहिती आहे की, कालांतराने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बूस्टर डोसची गरज आहे."
"जगभरात कोरोनाव्हायरसचे विविध व्हेरियंट आढळून येत आहेत. कोरोना व्हायरसच्या या व्हेरियंटविरोधात सुरक्षा मिळण्यासाठी, बूस्टर डोसची गरज आहे," ते पुढे म्हणाले.
लसीकरणामुळे जास्तीत-जास्त लोकांच्या शरीरात अन्टीबॅाडीज तयार होऊन हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत होईल.
मुंबईच्या एस. एल. रहेजा रुग्णालयाच्या क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. संजीथ शशीधरन सांगतात, "शरीरातील अन्टीबॉडीज कमी झाल्या, तर हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) कमी होईल. ज्यामुळे, लोकांना संसर्ग होण्याची शक्यता वाढेल."
केव्हा घ्यावा लागेल बूस्टर डोस?
भारतात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत देशभरात 87 कोटी लोकांना लशीचा डोस देण्यात आलाय.
डॉ गुलेरिया पुढे म्हणाले, "बूस्टर डोस या वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला लागण्याची शक्यता आहे."
पण कोरोनाविरोधी लशीचे दोन्ही डोस मिळालेल्यांनाच बूस्टर डोस दिला जाईल. डॅा शशीधरन सांगतात, "सद्यस्थितीत बूस्टर डोसची गरज आहे का? याचा ठोस पुरावा नाही. याची केव्हा गरज पडेल याची अजून माहिती नाही."
जगभरात दोन वेगवेगळ्या लशींचा डोस मिक्स करून, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते का? यावर संशोधन करण्यात आलंय.
"जगभरात लशींचा मिक्स डोस देऊन तपासणी होतेय. त्यामुळे, बूस्टर शॅाट दुसर्या लशीचा दिला जाऊ शकतो," असं डॅा चंद्रकांत लहारिया म्हणाले.
बूस्टर डोसचा फायदा काय?
बूस्टर डोसचा सामान्यांना फायदा काय? आम्ही संसर्गजन्यआजारतज्ज्ञ डॅा हेमलता अरोरा यांच्याकडून जाणून घेतलं.
त्या म्हणतात, "बूस्टर डोसमुळे कोरोनाच्या रि-इन्फेक्शनपासून, म्हणजे पुन्हा संसर्ग होण्यापासून अतिरिक्त सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे."
"लशीच्या बूस्टर डोसमुळे, कोरोनाव्हायरस विरोधातील रोगप्रतिकारशक्ती जास्त काळासाठी निर्माण होऊ शकते. त्यामुळे, येणाऱ्या काळात कोरोनासंसर्ग पसरण्यावर नियंत्रण मिळवता येईल," असं त्या पुढे म्हणाल्या.
बूस्टर डोसमुळे, किती फायदा होऊ शकेल याबाबत अद्याप संशोधन होणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांच मत आहे.
डॉ. शशीधरन पुढे सांगतात, "कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढवणं, यामागचं उद्दिष्ट आहे. जेणेकरून संसर्गाविरोधात लोकांना सुरक्षा मिळेल."
तज्ज्ञ सांगतात, वयोवृद्ध व्यक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना संसर्ग होऊ नये म्हणून बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे.
भारतात बूस्टर डोस देण्यात येणार आहे?
भारत सरकार लोकांना कोव्हिड लशीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करतंय का? हा प्रश्न राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विचारण्यात आला.
राज्यसभेत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या, "सद्य स्थितीत बूस्टर डोस देण्याबाबत सरकारला तज्ज्ञांकडून कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही."
भारतात केंद्र सरकारला लसीकरणाबाबत सल्ला देण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही कमिटी कोरोनाविरोधी लशीचे शास्त्रीय पुराव्यांवर अभ्यास करतेय, अशी माहिती डॅा भारती पवार यांनी दिली.
कोरोनाविरोधी लशी काही महिन्यांपूर्वी निर्माण करण्यात आल्यात. यापासून किती सुरक्षा मिळते, यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.
"भारताने बूस्टर डोसबाबत निश्चित आराखडा तयार केलेला नाही. बूस्टर डोस बाजारात उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी लागेल," असं डॅा शशीधरन म्हणाले.
जगभरातील कोणत्या देशात देण्यात येतोय बूस्टर शॅाट?
यूके सरकारच्या माहितीनुसार, सप्टेंबरपासून लोकांना बूस्टर शॅाट देण्यास सुरूवात केली जाणार आहे. टाईम्स ऑफ इस्राईलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, इस्राईल सरकारने 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना बूस्टर डोस देण्यास सुरूवात केलीये.
जर्मनी आणि फ्रान्समध्येही लोकांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.
बूस्टर डोसबाबत जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका?
कोरोनाविरोधी लसीकरणाबाबत काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारसी जाहीर केल्या होत्या.
WHO च्या माहितीनुसार, लशीचे डोन डोस घेतल्यानंतर आणखी एका डोसची गरज लागेल, हे दर्शवणारा ठोस पुरावा नाही.
त्याच लशीच्या बूस्टर डोसची किंवा दुसर्या लशीच्या बूस्टर डोसची गरज केव्हा भासेल याबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)