महाराष्ट्र लॉकडाऊन: ब्रेक द चेन अंतर्गत राज्य उघडलं, मग पुणे का नाही?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

ब्रेक द चेन अंतर्गत सोमवारी (2 ऑगस्ट) राज्यातील 11 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमधील निर्बंधात सुट देण्यात आली आहे.

मुंबईत दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट चार टक्क्यांच्या खाली असतानाही पुण्याला यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले असून पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत आहेत.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये लेवल तीनचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.

पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असतानाही पुण्यात निर्बंध कायम ठेवल्याने पुण्यातील व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. पुण्यातील विविध भागांमध्ये व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर घंटानाद केला.

'टास्कफोर्स मुख्यमंत्री आणि जनतेला घाबरवत आहे'

"टास्कफोर्स, मुख्यमंत्री आणि जनतेला घाबरवत आहे. एसीमध्ये बसून हे निर्णय घेत आहेत ते कधी आमच्या दुकानांमध्ये आले नाहीत परिस्थिती पाहायला," अशा शब्दांमध्ये पुणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सरकारच्या निर्णयावर रोष व्यक्त केला.

रांका म्हणाले, "सरकारने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. सकाळच्या वेळेत नागरिक खरेदीसाठी येत नाहीत. आम्हाला सकाळी 10 ते 8 या वेळेत व्यवसाय करू द्यावा. 4 वाजता दुकाने बंद होत असल्याने नोकरदार वर्गाला खरेदीला बाहेर पडता येत नाही.

"आमचा व्यवसाय कमी झाला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणे अवघड झाले आहे. पुण्याची रुग्णसंख्या कमी झालेली असताना व्यापाऱ्यांना सुट मिळणे आवश्यक आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी आठपर्यंत परवानगी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता," रांका सांगतात.

सकाळी 7 ते दुपारी 4 ही वेळ व्यावसायासाठी योग्य नसल्याने व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लहानमुलांच्या खेळण्यांचा व्यवसाय असलेले अनिल शहा हे लक्ष्मी रस्त्यावर त्यांच्या दुकानासमोर घंटानाद करत होते.

दुकानांच्या वेळांबाबत शहा म्हणाले, "आमचा व्यवसाय हा शनिवारी-रविवारी 50 टक्क्यांपेक्षा अधिक होतो. त्यावेळी सर्व बंद ठेवायला सांगतात. दररोज चार नंतर खऱ्या व्यवसायाला सुरुवात होते, तेव्हाच सगळं बंद केलं जातं. परंतु हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात त्यांना नियम लावले जात नाहीत. सकाळी 11 पर्यंत लोक खरेदीला येत नाहीत. दुपारी 12 नंतर ट्रॅफिकमुळे लोक बाजारपेठांमध्ये लोक येत नाहीत. आणि लगेच चारला दुकान बंद करावं लागतं."

मंगळवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत पुण्याला या निर्बंधांमधून सूट मिळाली नाहीतर उद्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत दुकाने सुरु ठेवणार असल्याचेही पुणे व्यापारी असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

आकडे काय सांगतात?

पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट गेले काही आठवडे हा पाच टक्क्यांच्या खाली आहे. शहरात जरी कोरोना नियंत्रणात असला तरी पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये रुग्णांची टक्केवारी अधिक आहे.

पुणे शहराचा 2 ऑगस्टला पॉझिटिव्हिटी रेट हा 1.97 टक्के होता. या दिवशी पिंपरी चिंचवडचा 2.53 टक्के तर पुणे ग्रामीणचा 5.96 टक्के इतका होता.

1 ऑगस्टला पुणे शहराचा 3.86 टक्के, पिंपरी चिंचवडचा 3.80 तर ग्रामीणचा 6.07 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. गेल्या आठवड्यात 25 जुलै रोजी पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 3.57 टक्के पिंपरी चिंचवडचा 4.31 टक्के तर ग्रामीणचा 6.80 टक्के इतका होता.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असला तरी पुणे ग्रामीणमध्ये तो 6 टक्क्यांच्या वरच असलेला पाहायला मिळतोय.

पुणे शहरात कामाच्या निमित्त अनेक लोक पुण्याच्या ग्रामीण भागातून येत असल्याने संसर्ग वाढण्याची देखील शक्यता आहे.

महापौरांची नाराजी

पुणे शहराला निर्बंधांमधून सुट मिळावी यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या कोरोना आढावा बैठकीत वारंवार मागणी केली होती. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकता दाखवली होती. परंतु सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आदेशात निर्बंधांमध्ये पुणे शहराला सुट न मिळाल्याने मोहोळ यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली.

मोहोळ त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात, "मुंबईला एक आणि पुण्याला वेगळा न्याय का? पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी 4 टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत रहावे."

चारची वेळ आठपर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

30 जुलैला पुण्यातील मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना निर्बंधांबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी चारची वेळ आठपर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे पवार म्हणाले होते.

निर्बंधाबाबत बोलताना पवार म्हणाले होते की, "जिथं पॉझिटिव्हचं प्रमाण एखादा टक्का राहिलं आहे तिथे निर्बंध शिथिल होतील. मागच्या मिटींगमध्ये चारची वेळ आठपर्यंत ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शनिवारी सुद्धा सुट द्यावी अशी चर्चा झाली."

ग्रामीण भागाबाबत ते म्हणाले, ''ग्रामीण भागात मास्क वापरला जात नाही. राज्यात अनेक ठिकाणी हे दिसून आले. तिथल्या प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. तसेच नागरिकांनी देखील सुरक्षेची खबरदारी घ्यायला हवी.''

पुण्याला सुट देण्याबाबत चर्चा

30 जुलैलाच पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यलयात पुण्याच्या कोरोनाबाबतची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली.

त्यावेळी पुणे जिल्हा जरी लेव्हल 3 मध्ये असला तरी पुण्याला काही शिथिलता देता येईल का याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. तसेच याबाबतचा निर्णय एक दोन दिवसात होईल असेही ते त्यावेळी म्हणाले होते.

परिस्थिती सुधारली तर निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येईल

राज्य मंत्री मंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुण्याच्या निर्बंधांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, "मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे पुण्याचे व्यापारी म्हणत आहेत ते योग्य नाही. राज्यातील 11 जिल्हे ज्यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट अधिक आहे त्यात कुठलेही बदल करण्यात आले नाहीत.

"मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असल्याने दुकानांना 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशीच परिस्थिती या 11 जिल्ह्यांमध्ये झाली तर तिथे देखील शिथिलता देण्यात येईल. निर्बंध हे लोकांचे जीव वाचविण्यासाठी तसेच तिसरी लाट रोखण्यासाठी आहेत. परिस्थिती सुधारली तर निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)