You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र लॉकडाऊन : 'या' 25 जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार- राजेश टोपे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (29 जुलै) कोव्हिड टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.
टोपे यांनी म्हटलं, "कोरोना रुग्णांची राज्याची जी सरासरी आहे, त्यापेक्षा कमी सरासरी असणाऱ्या 25 जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे शिथील करण्याचं निश्चित झालेलं आहे. राज्यातील लेव्हल तीनच्या निर्बंधात वीकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार- रविवार बंद होता.
त्याऐवजी शनिवारी 4 वाजेपर्यंत सुरू, फक्त रविवारी बंद, असा पर्याय समोर आला आहे. शॉप, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्याऐवजी ते 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्याची सकारात्मक चर्चा झाली आहे."
बाकीच्या 11 जिल्ह्यांना लेव्हल-3 मध्येच ठेवण्यात येईल. यात पश्चिम महाराष्ट्रातील 5, कोकणातील 4, मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर हे 11 जिल्हे असतील.
महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर हे 4 जिल्हे, पश्चिम मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर अशा एकूण 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहे
महाराष्ट्रात सध्या लागू असलेले लॉकडाऊनचे निर्बंध 31 जुलै रोजी संपणार आहेत.
राज्यात सध्या विकेंड लॉकडाऊन लागू असून सोमवार ते शुक्रवारपर्यंत केवळ दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आहे. या वेळेत वाढ करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकलबद्दल काय म्हणाले आरोग्यमंत्री?
"काही जणांचं म्हणणं होतं ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहे त्यांना परवानगी द्यावी. पण, मग तेवढी तपासणीची यंत्रणा आहे का हे पाहावं लागेल.
याविषयी रेल्वे प्राधिकरणाशी आणखी चर्चा करून यासंदर्भातला निर्णय घेतला आहे," असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
अकरा जिल्ह्यांत निर्बंध शिथील होणार नाहीत?
कोव्हिड टास्क फोर्सच्या बैठकीपूर्वी एक दिवस आधी राज्याचे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याबाबत संकेत दिले होते.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्याचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला आहे. राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अत्यंत कमी आहे.
त्याठिकाणी आठवड्यातील 6 दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली जाऊ शकते. त्यानंतर दर रविवारी सर्व दुकाने आणि आस्थापना बंद राहतील, असा नियम केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
या सर्वांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या टास्क फोर्स बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतरच निर्बंध शिथील करावेत किंवा नाही, याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.
लशींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना सर्व प्रकारच्या निर्बंधातून सूट मिळावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. त्याबाबत काय करायचं याचा निर्णय पुढील दोन-तीन दिवसांत घेण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं होतं.
राज्यातील संसर्गाचं प्रमाण घटलं
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरससंदर्भात आकडेवारीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने 28 जुलै रोजी एक अहवाल प्रकाशित केला आहे.
यामध्ये राज्यातील कोरोना संसर्गात लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात 27 जुलै रोजी 82 हजार 082 सक्रिय रुग्ण होते. गेल्या 15 जूनपासून सक्रिय रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सद्यस्थितीत पुण्यात 15 हजार 344, ठाण्यात 9 हजार 510, कोल्हापुरात 8 हजार 749, सांगलीत 8 हजार 348 तर सातारा येथे 7 हजार 271 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 27 जुलै रोजी 1 लाख 78 हजार 496 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 6 हजार 258 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
सध्या राज्याचा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर 0.11 इतका असून सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, बीड, रायगड आणि पुणे जिल्ह्यांची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
या जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांत पुराचा फटकाही बसला होता. इथं नागरिकांच्या पुनर्वसानाचं कामही अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार या 9 जिल्ह्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)