कोव्हिड : केरळमध्ये झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचं गूढ काय आहे?

    • Author, सौतिक बिस्वास, विकास पांडे
    • Role, बीबीसी न्यूज

भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्ये देशातल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम, नियमांचं पालन असं सगळं असतानाही केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे याचा बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास आणि विकास पांडे यांनी घेतलेला आढावा.

जानेवारी 2020 मध्ये केरळमध्ये भारताचा पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. चीनमधल्या वुहान इथे शिकत असलेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. देशातल्या कोरोना संसर्गाची ती सुरुवात होती.

केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि ते हॉटस्पॉट बनलं. मार्च 2020 पर्यंत देशातल्या अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती.

टेस्ट-ट्रेस-आयसोलेट या त्रिसुत्रीला प्रमाण मानत केरळने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोरोना वाढीला आळा घेतला. कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याचं चित्र केरळने देशाने दाखवलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केरळने विषाणूला रोखण्यात यश मिळवलं. कोरोना मृत्यूदरही कमी होता.

पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढलं. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना वाढीला आळा घातल्याचं चित्र असताना केरळमध्ये मात्र कोरोना शमण्याची चिन्हं नाहीत.

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केरळमध्ये केवळ तीन टक्के लोकसंख्या राहते परंतु कोरोना रुग्णांच्या बाबतीत हेच प्रमाण व्यस्त आहे. देशातल्या कोरोना रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत.

कोरोना विषाणूची पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून विषाणूची लोकांना संक्रमित करण्याची क्षमता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. सोप्या शब्दात कोरोनाच्या एका विषाणूने एकापेक्षा जास्त माणसांना संक्रमित केलं आहे.

याचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली झपाट्याने वाढ. हे रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अन्य काही उपाय करणं आवश्यक आहे.

कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांचं प्रमाण दर महिन्याला 10 टक्के एवढं आहे. केरळ राज्यात आतापर्यंत 3.4 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 16,837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भीतीदायक वाटणारे हे आकडे खरी कहाणी उघड करून सांगत नाहीत असं संसर्गतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या होत आहेत. देशात प्रति दशलक्ष कोरोना चाचणीचं जेवढं प्रमाण आहे त्याहून दुप्पट प्रमाणात केरळमध्ये चाचण्या होत असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात राहिला आहे.

केरळमध्ये दर दोनपैकी एका व्यक्तीला झालेला संसर्ग टिपला जात आहे. अन्य राज्यांमध्ये तीस व्यक्तींपैकी एका व्यक्तीला झालेला संसर्ग टिपला जातो. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जातात.

अतिशय कार्यक्षम पद्धतीने चाचण्या केल्या जातात. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर ट्रेसिंगच्या माध्यमातून त्याच्या जवळच्या माणसांचा शोध घेतला जातो.

टेस्टिंगही योग्य पद्धतीने केंद्रित केलं जातं असं डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं. देशातल्या अव्वल व्हायरोलॉजिस्टमध्ये डॉ. कांग यांचं नाव घेतलं जातं.

केरळमध्ये अँटीबॉडी चाचण्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. केरळमधल्या सहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींपैकी 43 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. अन्य देशात हे प्रमाण 68 टक्के आहे.

अनेकांच्या मते, केरळने कोरोना संसर्गासाठी आवश्यक उपाययोजना केली आहे.

केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झालेली नाही. केरळचा कोरोना मृत्यू दर हा देशाच्या अंदाजे मृत्यूदराच्या प्रमाणापेक्षा तीन टक्क्यांनी कमी आहे. कोरोना रुग्णांची नोंद न होण्याचं प्रमाण केरळमध्ये सगळ्यात कमी आहे.

केरळच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 38 टक्क्यांपैकी सत्तर टक्के लोकांना ज्यांचं वय 45 पेक्षा अधिक आहे त्यांना लशीचा किमान पहिला डोस मिळाला आहे.

याचा अर्थ केरळमध्ये चांगल्या पद्धतीने कोरोना चाचण्या घेत आहे, रुग्णसंख्येबाबत ते प्रामाणिक आहेत आणि लसीकरणाचा वेग उत्तम आहे. रुग्णालयांमध्ये गर्दी झालेली नाही.

केरळचा लसीकरणाचा वेग पाहता, कोरोनाच्या पुढच्या लाटा निर्माण झाल्यास त्या दुसऱ्या लाटेएवढ्या विनाशकारी नसतील असं डॉ. रिजो एम जॉन या आरोग्य अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं.

मात्र संसर्गतज्ज्ञांच्या मते केरळने कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी केलेली उपाययोजना हे सम्यक चित्र नव्हे.

बहुतांश लोकसंख्येला अजूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. आता केरळमध्ये तेच होतं आहे असं डॉ. गौतम मेनन यांनी सांगितलं. ते डिसीज मॉडेलिंग एक्सपर्ट आहेत.

मृत्यूदर कमी आहे मात्र संसर्ग होऊ देणं धोक्याचं आहे असं प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहीद जमील यांनी सांगितलं.

लाँग कोव्हिडचा धोका संभवतोच.यामध्ये कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही रुग्णांना त्रास जाणवतो. हा त्रास प्रदीर्घ काळ होतो. कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी दर तिसऱ्या रुग्णाला लाँग कोव्हिडचा त्रास होण्याचं प्रमाण काळजीत टाकणारं आहे.

केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं असं डॉ. स्वप्नील पारीख यांना वाटतं. ते फिजिशिअन आहेत. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे. व्हायरल लोड क्षमता या व्हेरिएंटमध्ये जास्त असते.

हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणं कठीण होऊन जातं असं डॉ. पारीख सांगतात.

रुग्णालयात भरती करण्यात आल्याने तसंच मृत्यूमुळे कोरोना झाल्याचं आधी समजतं. परंतु त्यामुळे कोरोनाचं प्रमाण कमी आहे असं मी मानणार नाही असं डॉ. पारीख सांगतात. सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढणं हे काळजीत टाकणारं आहे असं ते सांगतात.

कोरोनाचा मुक्काम प्रदीर्घ काळ झाल्याने या विषाणूच अनेक प्रकार, उपप्रकार तयार होऊ शकतात असं प्राध्यापक मेनन यांना वाटतं. नव्या प्रकारामुळे अधिक घातक, धोकादायक व्हेरिएंट समोर येऊ शकतात.

हे व्हेरिएंट लसीकरण न झालेल्या आणि कोरोना संसर्गही न झालेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

केरळने लॉकडाऊन लागू करताना ते कौशल्यपूर्ण पद्धतीने लागू करायला हवेत असं अनेकांना वाटतं. केरळने सणांसाठी परवानगी दिली आहे. यामुळे लोकांची गर्दी जमू शकते. यामुळे कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढू शकतं.

केंद्रीभूत पद्धतीने कोरोना चाचण्या, जिनोम सिक्वेन्सिंग यासंदर्भात ग्रॅन्युलर डेटा अधिक प्रमाणात उपलब्ध व्हायला हवा असं व्हायरोलॉजिस्ट्सना वाटतं.

संसर्गाचं प्रमाण वाढतं आहे हे समजून घेण्यासाठी तसंच नव्या व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी ही आकडेवारी उपयोगी ठरेल.

साथीच्या या रोगातून आपण एक गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे अपवादाने सिद्ध होणाऱ्या गोष्टींसंदर्भात सावधानता बाळगायला हवी असं डॉ. मुराद बॅनर्जी सांगतात.

लंडनमधल्या मिडलसेक्स विद्यापीठात ते गणितज्ञ आहेत. कोरोनाचा ते सखोल अभ्यास करत आहेत. केरळ अपवाद ठरणार नाही हे आता जणू सिद्धच झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)