You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा नवीन 'लांब्डा' व्हेरियंट काय आहे?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोना व्हायरसच्या 'डेल्टा व्हेरियंट'मुळे जगभरात लाखो लोक संक्रमित झाले. त्यातच सातत्याने म्युटेट होत असलेल्या या व्हायरसने आपलं रूप पुन्हा बदललंय.
संशोधकांनी कोव्हिड-19 च्या या नव्या रूपाला 'लांब्डा' व्हेरियंट असं नाव दिलंय. हा व्हेरियंट आत्तापर्यंत जगभरातील 25 देशांमध्ये आढळून आलाय.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात 'लांब्डा' व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने याला 'व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट' या कॅटेगरीमध्ये ठेवलंय. कोरोनाव्हायरसचा 'लांब्डा' व्हेरियंट काय आहे? हा नवीन व्हेरियंट झपाट्याने पसरणारा आहे का? हा व्हेरियंट किती धोकादायक आहे? हे आम्ही जाणून घेतलं.
कुठे सापडला 'लांब्डा' व्हेरियंट?
सर्वात पहिल्यांदा कोव्हिड-19 चा हा नवीन 'लांब्डा' व्हेरियंट दक्षिण अमेरिकेतील 'पेरू' या देशात आढळून आला.
डिसेंबर 2020 मध्ये, 'लांब्डा' व्हेरियंटबाबत संशोधकांना पहिल्यांदा माहिती मिळाली होती. त्यानंतर हा व्हेरियंट दक्षिण अमेरिकेसह, यूरोप आणि जगभरातील इतर देशांमध्ये पसरला.
14 जून 2021 ला, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 'लांब्डा' व्हेरियंटला 'व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट', म्हणजे, काळजीपूर्वक लक्ष देण्यासारखा, या क्षेणीत ठेवलं.
सध्या कोरोनाव्हायरसचे चार नवीन व्हेरियंट जागतिक आरोग्य संघटनेच्या 'व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट', या कॅटेगरीमध्ये आहेत.
पेरूसोबतच दक्षिण अमेरिकेतील चिली, इक्वेडोर आणि अर्जेंटीनामध्ये लांब्डा व्हेरियंट जास्त आढळून आलाय.
'लांब्डा' व्हेरियंट धोकादायक आहे?
संशोधकांच्या माहितीनुसार, पेरूमधील 82 टक्के कोरोनाग्रस्तांच्या नमुन्यांमध्ये हा व्हेरियंट आढळून आलाय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लांब्डा व्हेरियंटमध्ये, व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये सात म्युटेशन झाल्याचं आढळून आलंय.
त्यामुळे, कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटप्रमाणे, 'लांब्डा' व्हेरियंट झपाट्याने पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं संशोधकांचं मत आहे. मात्र, यावर अजूनही अभ्यास झालेला नाही.
'लांब्डा' व्हेरियंटबाबत बोलताना निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणाले, " 'लांब्डा' व्हेरियंटचा लोकांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास सुरू आहे."
चिलीतील संशोधकांनी लांब्डा व्हेरियंट झपाट्याने पसरणारा आहे का? यावर संशोधन केलंय. संशोधकांच्या माहितीनुसार, लांब्डा व्हेरियंट अधिक तीव्रतेने पसरणारा आणि रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे.
शास्त्रीय भाषेत संशोधकांनी 'लांब्डा' व्हेरियंट ला 'C.37' असं नाव दिलं आहे.
डॉ. पॉल पुढे म्हणाले, "लांब्डा' व्हेरियंट झपाट्याने पसरणारा असल्याचा सध्या तरी ठोस पुरावा नाही. यामुळे, होणारा आजार, गंभीर स्वरूपाचा होतो का, याबाबतही ठोस माहिती नाही."
लांब्डा व्हेरियंटचा कोव्हिडविरोधी लशीवर परिणाम होतो?
डॉ. पॉल सांगतात, "कोव्हिडविरोधी लशींवर याचा परिणाम होतो का नाही, याबाबतही ठोस माहिती उपलब्ध नाही."
न्यूज एजेंसी ANI बोलताना, इन्स्टिट्युट ऑफ लिव्हर एंड बिलिएरी सायन्सेसचे संचालक डॉ. एस.के.सरिन सांगतात, "डेल्टाप्लस व्हेरियंट जास्त संख्यने नसला तरी, आढळून आलाय. डेल्टा धोकादायक आहे. पण, आता लांब्डा काळजीचं कारण आहे."
भारतात हा व्हेरियंट आढळून आला नसला तरीयेऊ शकतो, असं डॉ. सरिन पुढे सांगतात.
भारतात 'लांब्डा' व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही
जगभरातील 25 देशात 'लांब्डा' व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले असले. तरी भारतात या व्हेरियंटची कोणालाही लागण झालेली नाही.
डॉ. पॉल पुढे म्हणाले, "भारतात 'लांब्डा' व्हेरियंट अजूनही आढळून आलेला नाही. कोरोनाव्हायरसचे व्हेरियंट शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येतंय. त्यामुळे, हा व्हेरियंट भारतात आला. तर, नक्कीच याबाबत माहिती मिळेल."
पेरूमध्ये, 'लांब्डा' व्हेरियंट जास्त आढळून आलाय, तर युरोपातील काही देशांमध्ये हा व्हेरियंट पसरला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार व्हायरस म्युटेट होत असल्याने, कोरोनाव्हायरसच्या बदललेल्या रूपाकडे लक्ष दिलं पाहिजे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल सांगतात, "जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट म्हणून घोषित केलेला हा सातवा व्हायरस आहे."
लांब्डा व्हेरियंटचा भारताला धोका किती?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भारतात 'डेल्टा' व्हेरियंटमुळे पसरलेल्या दुसऱ्या लाटेत काही राज्यांमध्ये स्थिती गंभीर बनली आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता लांब्डा व्हेरियंट काळजीचं कारण नक्कीच आहे.
इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स एंड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजीचे (IGIB) संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणतात की, 'लांब्डा' व्हेरियंट अजून भारतात आढळून आलेला नाही. मात्र, आम्ही यावर लक्ष ठेऊन आहोत.
युकेच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात लांब्डा व्हेरियंटने संक्रमित सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, सरकारने लांब्डा व्हेरियंटला, तपासाधीन या श्रेणीमध्ये ठेवलंय.
अजून तरी लांब्डा व्हेरियंटमुळे गंभीर आजार होतो किंवा लशींचा यावर काही परिणाम होत नाही, याचा पुरावा मिळालेला नाही.
युरोपातील यूके, जर्मनी, फ्रान्स, इटली या देशात लांब्डा व्हेरियंट आढळून आलाय. यादेशातून भारतात मोठ्या संख्येने प्रवासी येतात. त्यामुळे, काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)