You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : कोव्हिड झाल्यानंतर काही लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका का आहे?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचं आढळून आलंय. भारतात कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका का आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वात जास्त भारताला बसत आहे. संसर्ग क्षमता जास्त असलेल्या डबल म्युटेशनमुळे रुग्णसंख्या प्रचंड वाढली.
एकीकडे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत आहे, दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, तरीही काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
याचं कारण ऑक्सफर्ड जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या 50 टक्के रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचं आढळून आलंय.
भारतातही डॉक्टरांनी अशी प्रकरणं पाहिली आहेत. मुंबईतील मसिना रुग्णालयाचे डॉ. झैनुल्लाबेदीन हमदुले म्हणतात, "कोरोना संसर्गानंतर अनेक रुग्णांना हृदयाचा त्रास सुरू होतो."
त्यामुळे, कोरोना संसर्गानंतर हार्ट अटॅक येण्याचा धोका आहे का? हृदयाला इजा होते म्हणजे काय? याबाबत बीबीसीनं तज्ज्ञांशी बातचीत करून जाणून घेतलं.
कोरोनामुक्त झाल्यानंतर हार्ट अटॅकची कारणं काय?
महाराष्ट्रात वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे यांना कोरोनामुक्त झाल्यानंतर हार्ट अटॅक आला. माजी मंत्री संजय देवतळेंचा रुग्णालयात हार्ट अटॅकनेच मृत्यू झाला. अशी बरीच प्रकरणं गेल्या काही दिवसात, विशेषत: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसून येत आहेत.
डॉ. राजीव भागवत मुंबईच्या नानावटी-मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी विभागाचे सिनिअर कन्सल्टंट आहेत. कोव्हिडमुक्त झाल्यानंतर हार्ट अटॅकची विविध कारणं असल्याचं ते सांगतात.
"सामान्यत: आढळून येणारं कारण म्हणजे, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणं. याला वैद्यकीय भाषेत थ्रॉम्बॉसिस (Thrombosis) म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना सूज (Inflammation) येते. वैद्यकीय भाषेच याचं नाव आहे मायोकार्डायटीस (Myocarditis) आहे," असं डॉ. भागवत सांगतात.
नागपूरचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अनुज सारडा सांगतात, "कोव्हिड संसर्गात शरीरावर मोठा ताण पडतो. हे देखील हार्ट अटॅक येण्याचं एक कारण आहे."
रक्ताची गाठ तयार होते म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरोनासंसर्गात शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रणालीत (Coagulation System) बिघाड होतो.
डॉ. सारडा म्हणतात, "कोरोनासंसर्गात रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होण्याचं प्रमाण वाढतं."
रक्ताची गाठ तयार होण्याचा धोका कमी व्हावा. यासाठी रुग्णांना रक्त पातळ करणारी इंजेक्शन द्यावी लागतात.
व्हॉकार्ट रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. नईम हसनफट्टा म्हणतात, "मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग झालेल्यांना रक्त पातळ करण्याची औषध दिली जातात. कोव्हिड रुग्णांच्या उपचारांमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे."
काही रुग्णांना डिस्चार्जनंतरही डॉक्टर ही औषध घेण्याची सूचना देतात.
"हार्ट अटॅक आलेल्या सामान्य आणि कोरोना रुग्णांची तुलना केली, तर कोरोनाग्रस्तांमध्ये शरीरात रक्ताची गाठ तयार होण्याचं प्रमाण जास्त आढळून आलंय," असं डॉ. सारडा पुढे सांगतात.
कोरोना रुग्णांमध्ये रक्ताची गाठ तयार होणं हे सर्वात धोक्याचं आहे. रुग्णांच्या मृत्यूचं कारण हेच आहे, असं डॉ. हसनफट्टा म्हणतात.
हृदयाच्या स्नायूंना सूज येण्याचं कारण?
कोव्हिडमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज का येते, यावर बोलताना डॉ. अनुज म्हणतात, "हृदयाच्या स्नायूंमध्ये विषाणू थेट प्रवेश करतो. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते."
तज्ज्ञ सांगतात, व्हायरसमुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. मसिना रुग्णालयाचे डॉ. हमदुले म्हणतात, "हृदय योग्य पद्धतीने पंपिंग करू शकत नाही. फुफ्फुस, हात, पाय, मेंदू यांच्यात अचानक गाठ तयार होते"
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
हृदयाच्या स्नायूंना इजा झाली किंवा सूज आली तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हे सांगताना डॉ. राजीव भागवत तीन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करतात -
- हृदयाचे ठोके अनियमित पडतात. याला वैद्यकीय भाषेत fatal Arrhythmia म्हणतात.
- हृदयाच्या खालच्या कप्प्यात धडधड सुरू होते.
- हृदयाच्या ठोक्यांचा ताल बदलतो. हृदय खूप जास्त वेगाने धडधड करू लागतं.
कोरोनासंसर्गात हार्ट अटॅकमुळे मृत्यूचं प्रमाण किती?
तज्ज्ञ सांगतात, कोरोनासंसर्गाच्या काळात लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळालंय.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. नईम हसनफट्टा म्हणतात, "कोव्हिड संसर्गात हृदयात निर्माण होणारी गुंतागुंत मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. 30 ते 50 टक्के लोकांच्या मृत्यूचं कारण हेच आहे."
कोरोनामुक्त झाल्यानंतर हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने तुमच्याकडे रुग्ण आलेत का? यावर ते म्हणतात, "गेल्या काही दिवसात हार्ट अटॅक, हृदयाच्या स्नायूंना इजा, फफ्फुसात रक्ताची गाठ किंवा रक्तवाहिनीत गाठ झालेले रुग्ण पाहिले आहेत, ही गुंतागुंत कोरोनामुळे निर्माण होत आहे."
कोरोनामुळे निर्माण झालेली गुंतागुंत पहाणारे डॉ. हसनफट्टा एकटे नाहीत. नानावटी रुग्णालयाच्या डॉ. भागवत यांनीदेखील अशा रुग्णांवर उपचार केले आहेत.
"कोरोनासंसर्गाच्या सुरूवातीपासून अनेकांवर उपचार केले आहेत. यातील काहींना कोव्हिडनंतर त्रास झाला. भारतात कोरोनारुग्णांच्या संख्येप्रमाणेच हृदयविकाराच्या घटना वाढताना दिसत आहेत," असं डॉ. राजीव पुढे सांगतात.
तर "कोरोनासंसर्गानंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. पण, कोरोना संसर्गातही गुंतागुंत होण्याची शक्यता असते. कोरोनानंतर अनेकांना हृदयाचा त्रास सुरू होतो," असं डॉ. हमदुले म्हणतात.
हृदयाचे आजार असलेल्यांनी काय काळजी घ्यावी?
तज्ज्ञ सांगतात, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. या रुग्णांना कोव्हिडमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते.
डॉ. भागवत सांगतात, "हृदयरोग असलेल्यांनी महामारीच्या काळात जास्त काळजी घेतली पाहिजे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू ठेवले पाहिजेत. लॉंग कोव्हिडचा त्रास महिन्यांनंतरही होत असेल. तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी."
डॉ. हमदुले सांगतात, "हृदयरोग आणि कोरोना असलेल्या रुग्णांवर पहिल्या 15 दिवसात औषधांनी उपचार केले पाहिजेत."
ही आहेत हार्ट अटॅकची लक्षणं -
- श्वास घेण्यास त्रास
- खूप थकवा येणं
- हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणं
- अचानक खूप वजन कमी होणं
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)