कोरोना : एका अभिनव प्रयोगामुळे या लहान शहरातून कोव्हिड-19 हद्दपार झाला

उसाच्या शेतांनी वेढलेलं सेराना हे ब्राझीलमधील छोटेखानी शहर जागाच्या नकाशावर चटकन दृष्टीसही पडणारं नाही.

पण एका अभिनव प्रयोगाचे निष्कर्ष जाहीर झाले आणि त्यातून या शहरातील कोव्हिडसंबंधित मृत्यू जवळपास थांबल्याचं समोर आलं. यानंतर मात्र सेरानाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हा प्रयोग होण्यापूर्वी ब्राझीलमधील कोव्हिडचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये सेरानाचा समावेश होत होता. तिथल्या पाच टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

आता मात्र या शहराला 'आरोग्याचं मरूवन' संबोधलं जातं आहे.असं तिथे नक्की काय घडलं?

मोठ्या प्रमाणात लसीकरण

या शहरातील प्रौढांपैकी 75 टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आल्यावर कोव्हिडशी संबंधित मृत्यूंचा दर 95 टक्क्यांनी खाली आला. 'प्रोजेक्ट एस' या नावाने हा प्रयोग चालवण्यात आला.

शिवाय, यानंतर रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या 86 टक्क्यांनी खाली आली आणि लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची संख्या 80 टक्क्यांनी खाली आली, असं हा प्रयोग राबवणाऱ्या इन्स्टिट्यूटो बुतान्तान या संस्थेने सांगितलं.

या संदर्भातील एक महत्त्वाचा तपशील: बुतान्तान या संस्थेने चीनची सिनोव्हॅक कोरोना-व्हॅक ही लस वापरली. ब्राझीलमधील आधीच्या अभ्यासांनुसार ही लस जेमतेम 50 टक्क्यांहून अधिक गुणकारक असल्याचं दिसून आलं होतं.

"लसीकरण हा केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामूहिक आरोग्यावरील उपाय आहे, हा मुद्दा यातून पुन्हा ठसला," असं बुतान्तानचे वैद्यकीय संशोधन संचालक रिकार्डो पलासिओस म्हणाले.

शहरातील सर्व प्रौढांपैकी 75 टक्के लोकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट गाठणं कळीचं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यावर लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले या दोन्ही प्रकारच्या लोकांमधील रुग्णांची संख्या खाली आली, असं पलासिओस म्हणाले.

"संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करायच्या आधीच आपण या साथीवर नियंत्रण मिळवू शकतो, हा यातील सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष होता."

'रोगप्रतिकारक पट्टा'

साओ पाओलो या ब्राझीलमधील सर्वांत मोठ्या शहरापासून गाडीने चार तासांच्या अंतरावर असणाऱ्या सेरानामध्ये हा प्रयोग फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान पार पडला.

पंचेचाळीस हजार लोकसंख्येचं हे शहर चार भागांमध्ये विभागण्यात आलं, आणि त्यानुसार विषाणूला थोपवण्यासाठी लसीकरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, यातील तीन भागांमधील म्हणजे एकूण शहरातील 18 वर्षांवरील लोकसंख्येच्या सुमारे 75 टक्के लोकांना सिनोव्हॅक लशीच्या दोन मात्रा मिळाल्यानंतर हे उद्दिष्ट गाठलं गेलं.

इतर प्रदेशांमध्ये कोव्हिडबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही सेराना शहराचं संरक्षण शक्य झालं, हासुद्धा एक महत्त्वाचा निष्कर्ष होता, असं पलासिओस म्हणाले.

सेरानामधील जवळपास एक चतुर्थांश रहिवासी जवळच्या अधिक मोठ्या रिबेराओ प्रेतो या शहरात कामाला जातात. रिबेराओ प्रेतोची लोकसंख्या सात लाख आहे.

परंतु, रिबेराओ प्रेतो आणि इथल्या इतर शहरांमधील कोव्हिड-19च्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाही सेरानामधील रुग्णसंख्या कमी राहिली.

इन्स्टिट्यूटो बुतान्तानच्या म्हणण्यानुसार, "स्थानिक संसर्गात घट होण्यासोबतच प्रवाशांमुळेही रुग्णसंख्येत विशेष काही वाढ झाली नाही.

"'प्रोजेक्ट एस'मुळे सेरानात रोगप्रतिकारक पट्टा तयार झाला- विषाणूविरोधातील या सामूहिक प्रतिबंधकामुळे इथल्या संसर्गात प्रचंड कपात झाली."

'आशेचा किरण'

कोव्हिड साथीचा आजार सुरू झाल्यापासून ब्राझीलमध्ये सुमारे 4,70,000 लोकांनी या साथीत प्राण गमावले आहेत आणि अजून तरी ब्राझीलवासीय या संकटातून बाहेर पडण्याची चिन्हं दिसलेली नाहीत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सानारो यांनी टाळेबंदी उपयोगी नसल्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. शिवाय, स्थानिक सरकारांनी साथीला आळा घालण्यासाठी योजलेल्या उपायांनाही त्यांचा विरोध आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये पीफिझर लशीच्या सात कोटी मात्र खरेदी करण्याचे प्रस्ताव तीन वेळा समोर येऊनही केंद्रीय सरकारने ते नाकारले, असं संसदीय चौकशीतून समोर आलं.

सिनोव्हाक लशीवरील अंतिम प्रक्रिया इन्स्टिट्यूटो बुतान्तान इथे होते. या संस्थेने अलीकडेच चार कोटी 70 लाख मात्रा पुरवल्या असून भविष्यातही उत्पादन सुरू ठेवायची संस्थेची योजना आहे.

परंतु, गेल्याकाळात बोल्सेनारो यांनी आणि त्यांचे माजी परराष्ट्र मंत्री अर्नेस्टो अराउजो यांनी चीनविरोधात केलेली शेरेबाजी द्विराष्ट्रीय संबंधांना बाधक ठरली असून स्थानिक लसनिर्मितीलाही त्याचा फटका बसला आहे, असं टीकाकार म्हणतात.

एएफपीच्या आकडेवारीनुसार सिनोव्हॅक लस 22 देशांमध्ये वापरली जाते आहे, आणि जागतिक आरोग्य संघटनेने 1 जून रोजी या लशीला तातडीची मान्यता दिली आहे.

या मान्यतेनंतर ही लस अधिक व्यापक प्रमाणात वितरित होऊ शकेल आणि संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स या लसवितरण योजनेअंतर्गत तिची खरेदीही करता येईल.

चीनच्या सिनोफार्म या कंपनीने तयार केलेल्या एका लशीला आधी तातडीची मान्यता मिळाली आहे. चीन हा कोव्हिड लशीच्या मात्रांचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

"ही लस सुरक्षित, परिणमकारक, कार्यक्षम आणि सर्वोच्च गुणवत्तेची आहे. आजार वाढण्याला आळा घालण्यासोबतच संसर्ग झालेल्यांमधील आजाराची गुंतागुंत कमी करणं आणि मृत्यू कमी करणं यासाठीसुद्धा ही लस उपयुक्त आहे," असं बुतान्तानचे संचालक दिमास कोव्हास म्हणाले.

प्रोजेक्ट एससारखाच प्रयोग बोतुकातू (लोकसंख्या- 1,48,000) या ब्राझीलमधील शहरातसुद्धा केला जातो आहे. तिथे ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका लशीचा वापर होत असून, रिओमधील फिओक्रूझ इन्स्टिट्यूटकडून या लशीची अंतिम निर्मिती केली जाते आहे.

लसीकरणाची चिंतातुर वाट पाहणाऱ्या ब्राझीलवासियांना या प्रयोगामुळे 'आशेचा किरण' दिसल्याचं पलासिओस म्हणाले.

"लसीसोबत आपलं जगणं पूर्ववत करण्याची लोकांची इच्छा पूर्ण करणं आम्हाला शक्य झालं," असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)