शिखर धवन : श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी धवनकडे कर्णधारपद; मराठमोळ्या ऋतुराजला संधी

श्रीलंकेच्या छोटेखानी दौऱ्यासाठी शिखर धवनकडे पर्यायी भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

प्रमुख खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचवेळी पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेत तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 खेळणार आहे.

या संघाचं नेतृत्व अनुभवी शिखर धवनकडे अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणेच धवनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शिखरने याआधी आयपीएल स्पर्धेत तसंच दिल्ली संघाचं नेतृत्व केलं आहे. शिखरने 34 कसोटी, 142वनडे आणि 65 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.

या संघाचं प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांच्याकडे असेल अशी चर्चा होती मात्र बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात फक्त संघ आणि दौऱ्याचा कार्यक्रम यांचा उल्लेख आहे. राहुल द्रविड सध्या बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. त्यांनी याआधी भारत अ आणि भारताच्या युवा (U19) संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे.

इंग्लंडमध्ये मुख्य भारतीय संघाचा भाग नसलेले मात्र भारतासाठी खेळलेल्या खेळाडूंचा अनुभव या संघासाठी मोलाचा आहे. धवन आणि भुवनेश्वर यांच्यासह मनीष पांडे, कृणाल आणि हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर हे भारतासाठी खेळले आहेत.

पृथ्वी शॉचं संघात पुनरागमन झालं आहे. पृथ्वीने 5 टेस्ट आणि 3 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

देवदत्त पड्डीकल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया यांची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.

देवदत्तने सातत्याने सगळ्या प्रकारात धावांची टांकसाळ उघडली आहे. महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या ऋतुराजने आपल्या खणखणीत बॅटिंगच्या जोरावर निवडसमितीला प्रभावित केलं आहे. नितीश राणा गेली अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत आहे. वरुण चक्रवर्तीची याआधीही भारतीय संघासाठी निवड झाली होती. मात्र दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकल्याने त्याची संधी हुकली होती.

पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा चेतन सकारियाला मोठी संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिरकीपटू म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्या गौतमलाही संधी देण्यात आली आहे.

राखीव खेळाडू म्हणून इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साईकिशोर, सिमरजीत सिंग यांना संधी मिळाली आहे.

श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम

  • 13 जुलै- पहिली वनडे-कोलंबो
  • 16 जुलै-दुसरी वनडे-कोलंबो
  • 18 जुलै- तिसरी वनडे-कोलंबो
  • 21 जुलै- पहिली ट्वेन्टी20- कोलंबो
  • 23 जुलै-दुसरी ट्वेन्टी-20 कोलंबो
  • 25 जुलै-तिसरी ट्वेन्टी-20 कोलंबो

पर्यायी संघ

भारताचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर महिन्याभरासाठी जाणार आहे आणि त्याच काळात श्रीलंका दौरा देखील होणार आहे. म्हणून भारताने पर्यायी संघ तयार केला असून हा संघ भारताचे श्रीलंकेत प्रतिनिधित्व करणार आहे. या संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे आलं आहे.

गेले काही वर्ष विराट कोहली सर्व प्रकारात भारताचा कर्णधार आहे. कसोटीत अजिंक्य रहाणे उपकर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने संघाची धुरा सांभाळली होती.

वनडे आणि ट्वेन्टी-२० प्रकारात रोहित शर्मा कोहलीच्या अनुपस्थितीत सूत्रं सांभाळतो. मात्र आता तिघेही इंग्लंड दौऱ्याचा भाग असल्याने टीम इंडियाला नवा कर्णधार मिळणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस सिद्ध केल्यास सहभागी)

स्टँडबाय-अभिमन्यू इश्वरन, अवेश खान, प्रसिध कृष्णा, अर्झान नागवासवाला

इंग्लंड दौरा

18 ते 22 जून- भारत वि. न्यूझीलंड, साऊटॅम्प्टन, फायनल

4 ते 8 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड- नॉटिंगहॅम, पहिली कसोटी

12 ते 16 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड- लॉर्ड्स, दुसरी कसोटी

25 ते 29 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-लीड्स, तिसरी कसोटी

2 ते 6 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-ओव्हल, चौथी कसोटी

10 ते 14 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-मँचेस्टर, पाचवी कसोटी

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)