IPL 2023 : ट्वेंटी-20 क्रिकेटचा शोध कोणी लावला?

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

ट्वेन्टी-20 लीगचं पेव आता जगभर फुटलं आहे. पण हा फॉरमॅट कोणी शोधून काढला?

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 साली जिंकलेला ट्वेन्टी-20 वर्ल्डकप आणि त्यानंतर वर्षभरात सुरू झालेली इंडियन प्रीमिअर लीग ही स्पर्धा यामुळे ट्वेन्टी-20 हा चटपटीत प्रकार भारतीय चाहत्यांनी आपलासा केला. पण टेस्ट आणि वनडे हे पारंपरिक प्रकार असताना ट्वेन्टी-20 प्रकार कोणी शोधून काढला? काही अंदाज तुमचा? ट्वेन्टी-20 प्रकाराचा जनक आहे स्टुअर्ट रॉबर्टसन.

दरवर्षी आयपीएल होतं, मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल होते. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेकठिकाणी लीग सुरू झाल्या आहेत. खेळाडूंना पैसा कमावण्याचं, गुणकौशल्य सिद्ध करण्याचं, प्रसिद्धीचं एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.

मात्र ज्या माणसाने हा फॉरमॅट शोधून काढला तो माणूस प्रसिद्धीपासून दूर आहे. कोटीच्या कोटी उड्डाणांपासून तो लांब असतो. हे नाव तुम्ही फार ऐकलं नसेल. हे गृहस्थ कोण असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. क्रिकेटला नवा आयाम देणाऱ्या या गृहस्थांची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

2000च्या आसपास म्हणजे वायटूकेचा प्रश्न सुटल्यानंतरच्या काळात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला चिंता भेडसावत होती. टेस्ट आणि वनडे मॅचेसची घटती लोकप्रियता. मैदानावर येणारे प्रेक्षक कमी कमी होत चालले होते. यामुळे बोर्डाला आर्थिकदृष्ट्या नुकसानाला सामोरं जावं लागत होतं.

हा डोलारा कोसळू नये म्हणून काय करता येईल याकरता बोर्डाने स्टुअर्ट रॉबर्टसन यांच्यावर जबाबदारी सोपवली. रॉबर्टसन तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मार्केटिंग मॅनेजर म्हूणून काम करत होते. प्रेक्षकसंख्येत 17 टक्क्यांनी घट होणं ऐतिहासिक नव्हतं पण विचार करायला भाग पाडणारं होतं.

लोक टेस्ट आणि वनडे मॅचेसला येईनासे का झालेत हे समजून घेण्यासाठी रॉबर्टसन यांनी महत्वाकांक्षी मार्केट रिसर्च सर्व्हे करायचा ठरवला. 250,000 युरो इतकी प्रचंड रक्कम खर्चून हा सर्व्हे करण्यात आला. इंग्लंडमधल्या विविध सामाजिक स्तरांमध्ये हा सर्व्हे घेण्यात आला. नानाविध गोष्टी या सर्व्हेतून समोर आल्या.

कोणी म्हणालं, टेस्ट मॅच पाच दिवस चालते. पाच दिवस रोज आठ तास कोण बघत बसणार? काही म्हणाले आम्हाला तिकीट परवडत नाही. काहींनी सांगितलं मॅचचं ठिकाण दूर पडतं. तरुण पोरं म्हणाली हा सीनियर सिटिझनसाठीचा खेळ आहे. आमच्या कामाच्या वेळी मॅच असते. काम सोडून मॅचला कसं येणार? अनेकांनी सांगितलं की मॅच बघण्यासाठी तुम्ही संबंधित क्लबचा, जिमखान्याचं मेंबर असणं अपेक्षित आहे. आम्ही मेंबर नाही, आम्ही कशी मॅच बघणार?

महिलांनी सांगितलं की मॅचच्या वेळी मुलांना कुठे ठेवणार? त्यांच्या विरंगुळ्यासाठी ग्राऊंडवर काहीच नसतं. काहीजण म्हणाले मॅच ही ग्रुपने बघण्याची गोष्ट आहे. पाच दिवस, आठ तास किंवा वनडे असेल तर अख्खा दिवस सगळ्यांना शक्य होत नाही. एकट्याने मॅचला जायला बोअर होतं. मार्केट रिसर्च सर्व्हेतून असे असंख्य प्रतिसाद आले. काही सकारात्मक, काही नकारात्मक, काही व्यवहार्य.

रॉबर्टसन यांच्या हे लक्षात आलं की प्रेक्षकांचं आयुष्य बदललं आहे. वेगवान झालं आहे. थोड्या काळात आटोपेल आणि निर्णयही लागेल असं प्रॉडक्ट तयार करणं आवश्यक आहे.

एखादं कुटुंब पिकनिकला किंवा सिनेमा पाहायला गेलं तर तीन तास बाहेर असतं. त्या तीन तासात त्यांचं मनोरंजन होतं, मजा येते. त्या तीन तासात ती गोष्ट अनुभवून संपलेली असते. क्रिकेटची मॅचही तीन तासात आटपून तिचा निर्णय हाती आला तर... मॅचचा वेळ कमी करायचा तर ओव्हर्सची संख्या कमी करायला हवी. तीन तासात मॅच संपायला हवी असेल तर 20-20 ओव्हर्सची इनिंग्ज करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं.

जेणेकरून ही मॅच संध्याकाळच्या सत्रात असेल. लोक नोकरी-व्यवसाय करून मॅचला येऊ शकतील. त्यांच्या घरचेही येऊ शकतील. मॅचच्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था असेल. लहान मुलांना खेळण्यासाठी काही गोष्टी असतील. मैदानावर डीजे असेल.

आता हे सगळं कागदावर फारच रंजक वाटत असलं तरी बोर्ड पदाधिकाऱ्यांना हे पटणं आवश्यक होतं. टेस्ट आणि वनडेची प्रेक्षकसंख्या घटत चालली आहे हे बोर्डाच्या लक्षात आलंच होतं पण पारंपरिक गोष्टींना एकदम बाजूला कसं सारणार? हा प्रश्न होताच.

ट्वेन्टी-20 फॉरमॅटचा निर्णय मतदानासाठी आला. एमसीसी अर्थात मेरलीबोन क्रिकेट क्लब ही संस्था क्रिकेटचे नियम तयार करते. त्यांना हे काही फारसं पटलं नव्हतं. पारंपरिक विचारसरणीच्या लोकांना हे गिमिक असल्यासारखं वाटलं.

ट्वेन्टी-20 प्रकारामुळे खेळाचं पावित्र्य हरपेल असं काहींना वाटलं. काहींचा ट्वेन्टी-20 प्रकाराला विरोध नव्हता पण निर्णय घेण्याची घाई होतेय असं काहींना वाटलं. बाजूचे-विरोधातले असे तट होते. रॉबर्टसन यांनी क्रिकेटच्या मूलभूत ढाच्यात कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

खेळाचे नियम बदलणार नाहीत. ओव्हर्स कमी होतील, त्या अनुषंगाने जे बदल करावे लागतील ते होतील पण खेळाचा गाभा कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रेक्षकांना मैदानात आणायचं असेल तर कधी ना कधी हे पाऊल उचवावं लागेल हेही त्यांनी आवर्जून मांडलं.

आपण कदाचित मुहुर्तमेढ रोवू, जग आपल्याला फॉलो करेल. दुसरं कोणीतरी करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण हा धाडसी पण व्यवहार्य निर्णय घ्यावा असं निवेदन रॉबर्टसन यांनी केलं. काऊंटी मेंबर्सच्या अनेक शंकांना उत्तरं दिली. चर्चा झाली.

अखेर मतदानाचा निर्णय ट्वेन्टी-20च्या बाजूने 11-7 असा लागला. निसटता विजय होता पण तेवढं पुरेसं होतं.

त्यावेळी ट्वेन्टी-20 असं बारसं झालं नव्हतं. कार्निव्हलसदृश या फॉरमॅटची ओळख पत्रकारांना करून देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी या फॉरमॅटबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं. 'ट्वेन्टी-20' हे नाव त्यातून जन्माला आलं.

50 ओव्हर्सच्या स्पर्धेच्या जागी ट्वेन्टी-20 स्पर्धा आयोजित करण्यात आली. क्रिकेटेनमेंटची ही मात्रा चपखल लागू ठरली. 2003 मध्ये इंग्लंडमध्ये हॅम्पशायर आणि ससेक्स या दोन टीममध्ये पहिली ट्वेन्टी-20 मॅच झाली.

संध्याकाळी साडेसहा-सातला मॅच सुरू होऊन दहा साडेदहापर्यंत संपू लागली. मॅचच्या ठिकाणी मैदानात स्विमिंग पूल, कराओके, बाऊन्सिंग कॅसल, डीजे असं जत्रेसारखं वातावरण दिसू लागलं. तिकीट सर्वसामान्य माणसाला परवडेल असं होतं. ट्वेन्टी-20 हिट ठरलं.

मिडलसेक्स आणि सरे या टीममधल्या ट्वेन्टी-20 मॅचला 27,000 माणसं होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची आर्थिक घसरण थांबली. तरुण मंडळी स्टेडियममध्ये येऊन मॅच पाहायला लागली. खेळाडूंनाही हे पसंत पडू लागलं.

हे सगळं जगभरातील क्रिकेट बोर्डांचे पदाधिकारी पाहत होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वेन्टी-20 प्रकार अमलात आणल्यावर अवघ्या सहा महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच ऑकलंड इथे झाली.

इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-20 मॅचेसना उधाण आलं. अति झालं आणि हसू आलं त्यातला प्रकार झाला. यशस्वी ठरतंय म्हणून आम्ही वाहवत गेलो अशी प्रांजळ कबुली रॉबर्टसन यांनी दिली आहे.

ट्वेन्टी-20 प्रारुप डोमेस्टिक पातळीवर खपणीय ठरतं, मात्र आंतरराष्ट्रीय संघांमधल्या ट्वेन्टी-20 मॅचेस तेवढ्या लोकप्रिय होत नाहीत याचं कारण लोक त्या प्लेयर्सना सतत पाहत असतात. त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं. डोमेस्टिक ट्वेन्टी-20 स्पर्धा ते प्रेक्षकांना देतात म्हणून त्या लोकप्रिय आहेत असं रॉबर्टसन यांना वाटतं.

ट्वेन्टी-20 प्रमाण मानून जगभरात असंख्य ठिकाणी लीग सुरू झाल्या आहेत. झटपट पैसे कमावण्याचं माध्यम म्हणून खेळाडू त्याकडे पाहतात. मात्र ट्वेन्टी-20चा जनक कोटीच्या कोटी भराऱ्यांपासून दूर आहे. मी यातून फार पैसे कमवू शकलो नाही मात्र खेळाला नवा आयाम देऊ शकलो याचं समाधान आहे असं रॉबर्टसन यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.

अतिरेक झाला तर ट्वेन्टी-20चं नुकसान होऊ शकतं असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)