You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2023 : गाशा गुंडाळलेले संघ तुम्हाला माहिती आहेत का?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
IPL स्पर्धेचा सोळावा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या बारा वर्षात काही संघ आयपीएलच्या पटावर आले आणि बादही झाले. अशाच निकाली निघालेल्या संघांचा घेतलेला आढावा.
1. डेक्कन चार्जर्स (2008, 2009, 2010, 2011, 2012)
डेक्कन क्रोनिकल या कंपनीने 10 कोटी 70 लाख रुपयांमध्ये दहा वर्षांसाठी संघाची मालकी मिळवली होती. व्हीव्हीएस लक्ष्मण, अॅडम गिलख्रिस्ट, अँड्यू सायमंड्स, हर्षेल गिब्स, शाहिदी आफ्रिदी, चामिंडा वास असे एकापेक्षा एक सरस प्लेयर डेक्कनच्या ताफ्यात होते.
सध्याचा टीम इंडियाचा हुकमी एक्का आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडे होता. डेक्कनसाठी खेळताना रोहितने हॅटट्रिकही घेतली होती.
आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सचा संघ गुणतालिकेत तळाशी होता. मात्र दुसऱ्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या हंगामात डेक्कन चार्जर्सनी जेतेपदावर नाव कोरलं. 2009 हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता डेक्कनचा आरपी सिंग.
2010मध्ये त्यांनी बाद फेरी गाठली पण त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 2011 मध्ये डेक्कनचं नेतृत्व कुमार संगकाराकडे सोपवण्यात आलं. यावर्षी डेक्कनचा संघ सातव्या स्थानावर राहिला. 2012 मध्ये डेक्कनची आणखी घसरण झाली. ते आठव्या स्थानी होते.
2012 हंगामानंतर, आर्थिक गोष्टी योग्यपणे न हाताळल्याप्रकरणी बीसीसीआयने डेक्कन चार्जर्स संघाला निकाली काढलं. हैदराबाद शहराला सनरायझर्स हैदराबाद हा नवा संघ मिळाला.
सन टीव्हीने मालकी मिळवत नव्याने संघबांधणी केली. चार्जर्स संघाची मैदानावरची इनिंग्ज संपुष्टात आली पण कोर्टातली लढाई सुरू झाली.
डेक्कन क्रोनिकलला बीसीसीआयला राष्ट्रीयीकृत बँकेकडून 100 कोटी रुपयांची हमी मिळवून देण्यात अपयश आलं होतं. दरम्यान बेकायदेशीर पद्धतीने बरखास्त केल्याचा दावा करत डेक्कन क्रोनिकल कंपनीने बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केली.
हे प्रकरण वाढत जाणार हे लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने एका लवादाची स्थापना केली. बीसीसीआय आणि डेक्कन चार्जर्स यांच्यापैकी कोणाची बाजू बरोबर याचा निर्णय लवादावर सोपवण्यात आला. आठ वर्षांनंतर 17 जुलै 2020 रोजी लवादाने निर्णय दिला. डेक्कन चार्जर्स संघ निकाली काढताना बीसीसीआयची चूक झाली.
त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून बीसीसीआयने डेक्कन क्रोनिकल कंपनीला 4800 कोटी रुपये द्यावेत असं लवादाने महिनाभरापूर्वी सांगितलं.
2. कोची टस्कर्स केरळा (2011)
फुटबॉलसाठी प्रसिद्ध केरळच्या भूमीला या टीमच्या निमित्ताने आयपीएलमध्ये स्थान मिळालं. 2011 मध्ये स्पर्धेचा परीघ वाढवण्यात आला. कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कर्न्झोटियमने 1533 कोटी रुपये खर्चून या संघाची मालकी मिळवली. कन्झोर्टियमधील सुंदोपसुंदी सुरुवातीपासूनच दिसत होती.
केरळच्या संघाच्या सहमालकांमध्ये रवींद्र आणि शैलेंद्र गायकवाड या मराठी द्वयीचा समावेश होता. खासदार आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर हेही संघाचे सहमालक होते.
टीमचं नाव इंडी कमांडोज केरळा असं ठेवण्यात आलं पण नंतर बदलून कोची टस्कर्स केरळा असं करण्यात आलं. केशरी आणि जांभळ्या रंगाची या संघाची जर्सी होती. कोचीचं जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि मध्य प्रदेशातील इंदूर इथलं होळकर क्रिकेट स्टेडियम या संघाचे होम ग्राऊंड होते.
कलात्मक बॅटिंगसाठी प्रसिद्ध महेला जयवर्धने कोचीचा कॅप्टन होता. व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन, ब्रेंडन मॅकक्युलम, ब्रॅड हॉज, रवींद्र जडेजा असे प्लेयर्स कोचीकडे होते. पहिल्या हंगामात कोची संघ गुणतालिकेत दहा संघांमध्ये आठव्या स्थानी होता.
वार्षिक फ्रँचाइज रकमेच्या दहा टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून जमा करावी लागते. वारंवार सांगूनही कोचीने ही रक्कम न भरल्याने बीसीसीआयने कोची संघावर कारवाई केली आणि त्यांना स्पर्धेबाहेर केलं. अवघा एक हंगाम खेळून कोची संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
कोची संघातील खेळाडूंना लिलावात सामील करून घेण्यात आलं, जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ नये. संघ बरखास्त केल्याप्रकरणी कोची संघाचं व्यवस्थापनाने बीसीसीआयविरोधात न्यायालयात धाव घेतली.
2015 मध्ये न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायाधीश लाहोटी यांनी बीसीसीआयने कोची संघाच्या मालक कंपनीला नुकसानभरपाई म्हणून 550 कोटी रुपये द्यावेत असा आदेश दिला.
3. पुणे वॉरियर्स (2011, 2012, 2013)
कोचीच्या बरोबरीने 2011 मध्ये पुण्याला आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळालं. सुब्रतो रॉय यांच्या सहारा ग्रुप स्पोर्ट्स लिमिटेड कंपनीने या संघाची मालकी मिळवली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरचं गहुंजे इथलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड या संघाचं होम ग्राऊंड होतं. मात्र हे स्टेडियम तयार होण्यापूर्वी पुण्याने आपल्या मॅचेस नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवल्या.
सहाराने आपल्या संघासाठी साडी अर्थात पारंपरिक वेशातील चीअरलीडर्स सादर केल्या.
पुण्याने युवराज सिंगकडे नेतृत्व सोपवलं. मात्र पहिल्या हंगामानंतर युवराजला कॅन्सर असल्याचं सिद्ध झालं. 2012 मध्ये युवराज खेळू शकला नाही. पुढच्या हंगामात त्याने पुनरागमन केलं. कोलकाता संघाने दादा अर्थात सौरव गांगुलीला बाजूला केल्यानंतर पुण्याने त्याला आपलं म्हटलं.
सौरव गांगुलीनेही पुण्याचं नेतृत्व केलं. 2013 मध्ये गांगुलीने निवृत्ती जाहीर केल्याने अँजेलो मॅथ्यूजकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. पुण्याकडे रॉबिन उथप्पा, जेसी रायडर, ग्रॅमी स्मिथ, जेरोम टेलर, स्टीव्हन स्मिथ, मार्लन सॅम्युअल्स, ल्यूक राईट असे अनेक चांगले प्लेयर्स होते.
मायकेल क्लार्कने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पुण्याचं नुकसान झालं. 2012 हंगामापूर्वी बीसीसीआयबरोबरच्या आर्थिक वादामुळे पुणे संघ खेळणार नसल्याचं सहाराने स्पष्ट केलं. फ्रँचाइज शुल्क आणि युवराज सिंगऐवजी बदली खेळाडू ही वादाची कारणं होती.
हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने सहारा कंपनीला ठराविक रक्कम देण्याचं मान्य केलं आणि वाद मिटला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा यांच्यातला वाद न्यायालयात गेला होता.
2011 हंगामात पुण्याची कामगिरी सुमार झाली आणि त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पुढच्या वर्षी घसरून ते तळाच्या स्थानी राहिले. 2013 मध्ये थोडं सुधारून त्यांनी आठवं स्थान मिळवलं.
हंगामातली शेवटची मॅच खेळल्यानंतर सहाराने बीसीसीआयविरुद्धच्या वादामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं.
4. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (2016, 2017)
मॅच फिक्सिंग आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. चेन्नईच्या जागी पुण्याला संघ देण्यात आला. आरपी-संजीव गोएंका ग्रुपने
टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी चेन्नईहून पुण्याच्या संघात दाखल झाला. चेन्नईचाच कोच स्टीफन फ्लेमिंग पुण्याचा कोच झाला. स्टीव्हन स्मिथचा पुणेरी पगडीतला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.
धोनीसह फॅफ डू प्लेसिस, रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन असे मातब्बर खेळाडू पुण्याच्या ताफ्यात होते. धोनीच्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा संघाला झाला. 2016 मध्ये कामगिरीत सातत्य नसल्याने पुण्याच्या या संघाला बाद फेरी गाठता आली नाही.
पुढच्या वर्षी त्यांनी ऑलराऊंडर बेन स्टोक्सला संघात घेतलं. स्टीव्हन स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यावरून वादही झाला. मात्र पुण्याने सातत्यपूर्ण खेळ करत फायनल गाठली. फायनलला मुंबई इंडियन्सने त्यांना एका धावेने नमवलं. बंदीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर चेन्नईचं पुनरागमन होणार असल्याने रनरअप असूनही पुणे संघाचा प्रवास तिथेच थांबला.
5. गुजरात लायन्स (2016, 2017)
मॅच फिक्सिंग आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. राजस्थान रॉयल्सची जागा गुजरात लायन्सने घेतली. यानिमित्ताने राजकोटला आयपीएलच्या मॅचेस होऊ लागल्या. इंटेक्स टेक्नॉलॉजी कंपनीने या संघाची मालकी मिळवली.
सुरेश रैनाकडे संघाचं नेतृत्व होतं. रैनासह ब्रेंडन मॅकक्युलम, आरोन फिंच, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, प्रवीण कुमार, धवल कुलकर्णी, अँड्यू टाय असे उत्तम खेळाडू गुजरातकडे होते.
पहिल्याच हंगामात त्यांनी बाद फेरी गाठली. मात्र फर्स्ट क्वालिफायर आणि सेकंड क्वालिफायर अशा दोन्ही मॅचमध्ये गुजरातच्या पदरी पराभवच आला.
दुसऱ्या हंगामात गुजराततर्फे खेळणाऱ्या अँड्यू टायने हॅट्ट्रिक घेतली. सुरेश रैनाने भरपूर रन्स करूनही गुजरातला गुणतालिकेत सातव्या स्थानी समाधान मानावं लागलं.
बंदीच्या कारवाईनंतर राजस्थान रॉयल्सचं पुनरागमन होणार असल्याने गुजरात लायन्सचा प्रवास दोन हंगामांसह थांबला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)