देवेंद्र फडणवीस: कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यासंबंधी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

कोरोना चाचण्या सातत्यानं नियंत्रित केल्या जात असल्यानं परिस्थिती विदारक होत चालली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देशातील सात राज्यांमध्येच कोरोनाचे 70 टक्के रुग्ण आहेत. त्यातील केवळ तीन राज्यांमध्ये 43 टक्के रुग्ण आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहेत, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

एकूण मृत्यू संख्येच्या 38 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात होत असल्याचंही फडणवीसांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, प्रत्येक दिवशी प्रतिदशलक्ष चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे सरासरीपेक्षाही राज्याचा संसर्गाचा दर अधिक आहे.

ज्या राज्यांमध्ये प्रतिदशलक्ष चाचण्यांचा दर महाराष्ट्रात अधिक आहे, त्या राज्यांची यादीही फडणवीस यांनी आपल्या पत्रात दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 8,08,306 एवढी झाली आहे.

राज्यात मंगळवारी, 1 सप्टेंबरला कोरोनाची लागण झालेले 15,765 नवीन रुग्ण आढळले, तर 10,978 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात मंगळवारी 331 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

सध्या राज्यात 1 लाख 98 हजार 523 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 24 हजार 903 वर पोहोचला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)