You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुरेश रैना : आयपीएल सोडून माघारी येण्यामागचं कारण काय?
दुबईत होणारी आयपीएल स्पर्धा सोडून भारतात परतलेला क्रिकेपटू सुरेश रैना सध्या चर्चेत आहे. स्पर्धा न खेळताच माघारी येण्याचं कारण काय, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
आयपीएलमध्ये रैना ज्या टीमकडून खेळायचा त्या चेन्नई सुपर किंग्जने रैना खासगी कारणांमुळे परतल्याचं सांगितलं आहे, तसंच रैना यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे.
रैना आयपीएलसाठी दुबईत असताना इकडे पंजाबमध्ये त्याच्या आत्याच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला केला. हल्ल्यात आत्याच्या पतीचा मृत्यू झाला तर आत्या आणि त्यांची मुलं गंभीर जखमी झाली.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
सुरेश रैनाने नुकतंच मौन सोडून याबाबतचा खुलासा केला आहे. रैनाने सांगितल्याप्रमाणे हल्ल्यात जखमी झालेल्या त्यांच्या एका आतेभावाचाही सोमवारी (31 ऑगस्ट) उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आत्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे.
सुरेश रैनाने पंजाब पोलिसांवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
यासंदर्भात रैनाने केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे, "पंजाबमध्ये माझ्या कुटुंबीयांसोबत जे घडलं ते भयंकरच्याही पलीकडचं होतं. माझ्या मामांची हत्या करण्यात आली. माझी आत्या आणि माझे आतेभाऊ गंभीर जखमी झाले आहेत. गेले काही दिवस मृत्यूशी झूंज देत असलेल्या माझ्या एका आतेभावाचाही काल रात्री मृत्यू झाला. माझ्या आत्याची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहे आणि त्या लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहे."
रैना पुढे लिहितो, "त्या रात्री काय घडलं आणि कुणी केलं, हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही. माझी पंजाब पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. कमीत कमी आम्हाला एवढं तरी कळायला हवं की हे केलं कुणी? ते गुन्हेगार सुटता कामा नये."
रैनाने ट्वीटमध्ये पंजाबचं मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनाही टॅग केलं आहे. मात्र, रैना याने आयपीएल सोडून येण्यामागच्या कारणाचा उल्लेख या ट्वीटमध्ये केलेला नाही.
सुरेश रैनाच्या आत्या पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये राहतात. 19 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला चढवला होता. हल्ल्यात दरोडेखोरांनी रैनाच्या आत्या आणि मामांवर धारदार शस्त्राने वार केले. त्यातच मामांवर मृत्यू झाला, तर आत्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि आयपीएल वाद
सुरेश रैनाने 15 ऑगस्ट रोजी महेंद्र सिंह धोनीसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं म्हटलं होतं. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य आहे, तर टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे.
सुरेश रैनाने भारतासाठी 18 टेस्ट मॅच आणि 226 वनडे मॅच खेळल्या आहेत. शिवाय 78 टी-20 सामनेही खेळले आहेत. 226 वन डे सामन्यांमध्ये रैनाने 5 शतकांच्या मदतीने 5615 रन काढलेत. टी-20 क्रिकेटमध्ये रैनाने 1605 रन्स काढले आहेत, तर 18 टेस्ट सामन्यांमध्ये त्याचा स्कोअर आहे 768 रन्स.
सुरेश रैनाला कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचा जवळचा मानलं जातं. रैनाने निवृत्तीची घोषणा करताना केलेल्या पोस्टवरूनही याचा अंदाज येतो. 15 ऑगस्ट रोजी धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही तासातच सुरेश रैनानेदेखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं म्हटलं होतं.
रैनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "धोनी, तुझ्यासोबत खेळण्याचा अनुभव उत्तम होता. या प्रवासात मीसुद्धा अत्यंत अभिमानाने तुझ्यासोबत होतो. थँक्यू इंडिया. जय हिंद."
यानंतर रैना चेन्नई सुपर किंग्जसोबत आयपीएलसाठी तो दुबईला गेला. दुबईत टीमची प्रॅक्टिस सुरू आहे. टीमची प्रॅक्टिस सुरू असतानाच अचानक चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने ट्वीटवरून माहिती दिली की, सुरेश रैना खाजगी कारणांमुळे भारतात परतणार आहे आणि यावर्षी आयपीएल खेळणार नाही.
याच दरम्यान दुबईमध्ये अनेक खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्याही बातम्या आल्या. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक आयोग म्हणजेच बीसीसीआयनेही स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेले 13 जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळल्याचं सांगितलं होतं. या 13 जणांमध्ये 2 खेळाडूंचाही समावेश आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार कोव्हिड पॉझिटिव्ह आढळलेले सर्व जण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आजाराची कुठलीही लक्षणं नाहीत. शिवाय, त्यांना टीमच्या इतर सदस्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. आयपीएल मेडिकल टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
मात्र, इतर बातम्यांमध्ये म्हटलं आहे की, चेन्नई सुपर किंग्जचे कमीत कमी 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात एका भारतीय क्रिकेटरचाही समावेश आहे. मात्र, हा खेळाडू कोण, त्याची माहिती देण्यात आलेली नाही.
याच दरम्यान सुरेश रैनाच्या नातेवाईकांबाबतीत असा प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं. काही मीडिया संस्थांनी दुबईत हॉटेल रुमवरून सुरेश रैनाचा वाद झाल्याचंही वृत्त दिलं होतं. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज कायम सुरेश रैना सोबत असल्याचं टीमचे मालक एन. श्रीनिवासन यांनी म्हटलं होतं.
श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे की, सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिलेलं योगदान उत्तम होतं आणि या काळात टीम त्यांच्यासोबत आहे. सुरेश रैनाने चेन्नई संघाकडून आयपीएलमध्ये 189 सामन्यांमध्ये 5368 रन्स केले आहेत. यात एक शतक आणि 38 अर्धशतकांचाही समावेश आहे. या सामन्यांमध्ये सुरेश रैनाचा स्ट्राईक रेट 137.14 इतका होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)