You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: रवीचंद्रन अश्विन आयपीएलमधून बाहेर पडणार #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा.
1. रवीचंद्रन अश्विन यंदाच्या आयपीएलमधून काही काळ विश्रांती घेणार
भारताचा अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अश्विनने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मी आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून काही काळ विश्रांती घेत आहे. माझे कुटुंबीय आणि नातलग कोव्हिडविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी त्यांच्याबरोबर असावं असं मला वाटतं. गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळायला परतेन. धन्यवाद.
अशा पद्धतीने यंदाच्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा अश्विन पहिलाच भारतीय खेळाडू आहे. अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळतो. यंदाच्या हंगामात अश्विनने पाच सामने खेळले आहेत.
चेन्नई सुपर किंग्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि आता दिल्ली कॅपिटल्स असा अश्विनचा आयपीएल प्रवास झाला आहे. आयपीएल स्पर्धेत अश्विनच्या नावावर 159 मॅचेसमध्ये 139 विकेट्स आहेत. त्याच्या नावावर 419 रन्सही आहेत.
अश्विनने दोन हंगामात किंग्ज इलेव्हन संघाचं नेतृत्वही केलं आहे. 2020 हंगामापूर्वी दिल्ली संघाने 7 कोटी 60 लाख रुपये खर्चून अश्विनला ताफ्यात समाविष्ट केलं. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. यंदाच्या हंगामात दिल्लीने आतापर्यंत मॅचमध्ये सामन्यात विजय मिळवला आहे.
देशात दररोज लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची भर पडत असताना आयपीएल स्पर्धा सुरू ठेवावी का यावरून चर्चेला सुरुवात झाली होती. बायोबबल पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सला खेळाडूंच्या माघारी जाण्याचा फटका बसला आहे. शस्त्रक्रियेमुळे जोफ्रा आर्चरने यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं. हाताला झालेल्या दुखापतीमुळे अष्टपैलू बेन स्टोक्स हंगामाबाहेर गेला. वैयक्तिक कारणास्तव फास्ट बॉलर अँड्यू टायने माघार घेतली तर बायोबबलमध्ये राहण्याचा थकवा हे कारण देत लायम लिव्हिंगस्टोनने माघार घेतली होती.
2. सौदी अरेबियाकडून भारताला ऑक्सिजनची मदत
भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली आहे. सौदी अरेबियाकडून भारताला 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पाठवण्यात येणार आहे. अदानी समूह आणि लिंड कंपनी यांच्या सहकार्यातून ही मदत केली जाणार आहे. 'झी24 तास'ने ही बातमी दिली आहे.
देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण आढळत असून, अनेकांना ऑक्सिजन आवश्यक आहे. दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांमध्ये ऑक्सिजनची सर्वाधिक गरज आहे. देशाच्या विविध भागातून या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो आहे.
भारताची ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पाठवण्यासंदर्भात अदानी समूह आणि लिंड कंपनी यांच्यात झालेल्या सहकार्याचा भारतीय दूतावासाला अभिमान आहे.
मदत, पाठिंबा आणि सहकार्याबद्दल सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाचे आभार असं ट्वीट रियाधमधल्या भारतीय दूतावासाने केलं आहे.
3. भाजप हा सगळ्यांत मोठा खोटारडा पक्ष - सचिन सावंत
'भाजप हा जगातील सर्वांत मोठा खोटारडा पक्ष आहे. केंद्र सरकारने 10 ऑक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही. प्रकल्पाचे कार्यान्वयन करण्यासाठी एजन्सी मोदी सरकारनेच ठरवली. 5 एप्रिल 2021 नंतर मशीन पुरवत आहेत. सिंधुदुर्गाला अजून दिली नाही' असा पलटवार सावंत यांनी केला. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी दिला होता. पण सरकारने एकही प्लांट उभारला नाही, हे पैसे राज्य सरकारने गायब केले, असा गंभीर आरोप भाजपने केला होता.
केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या एजन्सीचे इंजिनिअर इन्स्टॉलेशन करत आहेत. असे असतानाही पत्रकार परिषद घेऊन खोटारडे आरोप भाजप करत आहे. देशात घोषित केलेल्या 162 ऑक्सिजन प्रकल्पांपैकी केवळ 33 झाले असे केंद्र म्हणत आहे. आता 551 नवीन जाहीर केले. ते चालू होणार केव्हा हे मोदीजीच जाणे' असा टोलाही सावंत यांनी लगावला.
सत्तेच्या हव्यासापोटी भाजप अत्यंत खालच्या थराला गेला आहे. भाजप पक्ष जाणीवपूर्वक असे खोटे आरोप करत आहे', अशी टीकाही सावंत यांनी केली.
4. आदित्य ठाकरेंनी राज्यात मोफत लसीकरणाचे ट्वीट केलं डिलिट
महाराष्ट्र सरकार कधी मोफत लसीकरणाची घोषणा करणार असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणाच करून टाकली. मात्र थोड्याच वेळात आदित्य यांनी हे ट्वीट डिलिट केलं. 'झी न्यूज'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
"राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे," असा खुलासा आदित्य यांनी केला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.
"लसीकरणाचे अधिकृत धोरण समितीद्वारे घोषित केले जाईल आणि समाजातील सर्व घटकांसाठी योग्य धोरणाच्या शिफारशीची आपण प्रतीक्षा केली पाहिजे. झालेल्या गोंधळासाठी मी दिलगीर व्यक्त करतो," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
देशभरात वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान येत्या 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस दिली जाणार आहे.
केंद्रानं याआधीच स्पष्ट सांगितलं आहे की, 18 ते 45 या वयोगटातील लोकांनी सरकार व्हॅक्सिन पुरवणार नाही. ही लस त्यांना स्वतःच खरेदी करावी लागेल किंवा मग राज्यांना ही लस विकत घ्यावी लागेल.
5. तिहार तुरुंगात असलेला उमर खालिद कोरोना पॉझिटिव्ह
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद याला कोरोनाची लागण झाली आहे. तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी ही माहिती दिली.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उमर खालीदला तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी त्याला दिल्ली हिंसाचारप्रकरणी अटक झाली होती, तेव्हापासून तो तिहार तुरुंगात आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
तिहार तुरुंगातील कैद्यांपैकी सध्या 227 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तुरुंग अधीक्षक, तुरुंगातील दोन डॉक्टरांसह 60 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिहार तुरुंगात 20,000 कैदी आहेत. यापार्श्वभूमीवर तिहार प्रशासनानं कैदी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भेटी देखील रद्द केल्या आहेत.
दिल्लीत खजुरी खास भागात फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी उमर खालीदला अटक झाली होती. सत्र न्यायालयानं खालीदला 15 एप्रिल रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याला अद्याप दिल्ली दंगलीशी संबंधित युएपीए प्रकरणात जामीन मंजूर होणं बाकी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)