IPL 2021: पाकिस्तानविरोधात खेळण्याऐवजी IPL ला प्राधान्य, मॅचही गेली अन् सीरिज

दक्षिण अफ्रिकेच्या पाच खेळाडूंनी देशाकडून खेळण्याऐवजी आयपीएलला प्राधान्य दिलं. चांगले खेळाडू मॅचमध्ये नसल्यामुळे त्यांना मॅच गमावावी लागली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या पाच क्रिकेटपटूंनी आयपीएलला प्राधान्य दिल्यामुळे दोनच दिवसात त्यांना एक सामना आणि एक मालिका गमावावी लागल्याचे सूर उमटत आहेत.

ते पाच जण कोण? दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार क्विंटन डी कॉक, आपल्या भेदक बॉलिंगसाठी ओळखले जाणारे कागिसो रबाडा-अँनरिक नॉर्किया ही जोडगोळी, आशियाई उपखंडात किलर मिलर नावाने प्रसिद्ध डेव्हिड मिलर, धोनीचा विश्वासू बॉलर लुंगी एन्गिडी.

पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेतला पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने थरारक विजय मिळवला. तिसरा सामनाही असाच रंगणार असं चित्र होतं. मात्र दुसऱ्या वनडेनंतर पाहुणे घरी आलेले असताना आफ्रिकेचे पाच खेळाडू चार्टर्ड विमानाने भारताच्या दिशेने आयपीएल मोहिमेसाठी निघाले.

बुधवारी मालिकेतली तिसरी वनडे झाली. पाकिस्तानने आफ्रिकेच्या अनुनभवी संघाला हरवत मालिका जिंकली. तिसऱ्या वनडेत पाकिस्तानवर विजय मिळवत मालिका जिंकण्याची संधी आफ्रिकेसमोर होती. मात्र पाच महत्त्वाच्या खेळाडूंनी भारतासाठी प्रयाण केल्याने आफ्रिकेच्या संघातली जान निघून गेली. नव्या खेळाडूंनी संघर्ष केला पण तो पुरेसा ठरला नाही.

12 एप्रिलचा दिवस. दक्षिण आफ्रिकेतलं जोहान्सबर्गचं मैदान. दक्षिण आफ्रिकेने 341 धावांचा डोंगर उभारला. डोंगराएवढं लक्ष्य पाकिस्तान पेलणार का? पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं.

एकामागोमाएक सहकारी बाद होत असतानाही फखरने खेळपट्टीवर ठाण मांडला आणि वनडेतल्या धावांचा पाठलाग करतानाच्या सर्वोत्तम खेळीची नोंद केली. फखरने 193 धावांची मॅरेथॉन खेळी केली. द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना फखर बाद झाला आणि पाकिस्तानने सामना गमावला फक्त 17 धावांनी.

विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी केली. पहिली वनडे पाकिस्तानने जिंकली होती. तिसरी वनडे निर्णायक होणार हे स्वाभाविक. पण दुसऱ्या वनडेनंतर जे झालं त्याने मालिकेतला जीव निघून गेला.

तिसऱ्या वनडेत पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना 320 धावा केल्या. फखर झमानने सलग दुसरं शतक झळकावलं. कर्णधार बाबर आझमने 82चेंडूत 94 रन्सची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 292 रन्सची मजल मारली. पाकिस्तानने ही वनडे 28 धावांनी जिंकली. आफ्रिकेचा संघ सर्वशक्तीनिशी खेळत असता तर कदाचित या सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं.

बाबरला मॅन ऑफ द मॅच तर फखर झमानला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

गंमत म्हणजे आता या दोन देशांदरम्यान चार ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे ट्वेन्टी-20 विशेषज्ञ खेळाडू त्यावेळी भारतात आयपीएलचे सामने खेळत असतील.

भारतवारीवर आलेले आफ्रिकेचे पाचजण बायो-बबलमध्येच होते. एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायोबबलमध्ये थेट आल्यास क्वारंटीन व्हावं लागत नाही. तसं व्हावं म्हणून सगळ्या फ्रँचाइजींनी मिळून या पाचजणांसाठी चार्टर्ड म्हणजे खास विमानाची सोय केली. जोहान्सबर्गहून हे विमान मुंबईत दाखल झालं.

क्विंटन मुंबई इंडियन्सचा भाग आहे तर मिलर राजस्थान रॉयल्सचा. रबाडा आणि नॉर्किया दिल्ली संघात आहेत तर लुंगी एन्गिडी चेन्नईसाठी खेळतो.

आशियाई संघांना दक्षिण आफ्रिकेत जिंकणं अवघड मानलं जातं. चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळणाऱ्या, भन्नाट वेगाने बॉलिंग करणारे बॉलर्स, त्यांना फिल्डर्सची मिळणारी तोलामोलाची साथ यामुळे आशियाई उपखंडातल्या संघांना आफ्रिकेत जुळवून घेताना वेळ लागतो.

पाच प्रमुख खेळाडू गमावल्याने आफ्रिकेचा संघ कमकुवत झाला. पाकिस्तानने याचा फायदा उठवत वनडे मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेत एकापेक्षा अधिक वनडे मालिका जिंकणारा पाकिस्तान हा केवळ दुसरा संघ आहे.

क्विंटन डी कॉक (123), डेव्हिड मिलर (134), कागिसो रबाडा (77), अँनरिक नॉर्किया (9), लुंगी एन्गिडी (28) वनडेंचा अनुभव आहे. दक्षिण आफ्रिकेने हा अनुभव गमावला.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पैशासाठी दुसऱ्या देशात जाऊन खेळतात का?

दक्षिण आफ्रिकेतल्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे तसंच सामाजिक कारणांमुळे असंख्य खेळाडू कोलपॅक कराराचा आधार घेऊन इंग्लंडमध्ये जातात. काही खेळाडू न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात जाऊन खेळतात.

आयपीएलच्या निमित्ताने दीड महिन्यात वर्षभराची पुंजी मिळवण्याची संधी या खेळाडूंकडे असते. या संधीसाठी देशासाठी खेळणं बाजूला ठेवण्यात आलं. क्रिकेट साऊथ आफ्रिकेची परवानगी असल्यानेच हे पाच जण भारतात येऊ शकले.

या पाचजणांचं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातलं मानधन-

-कागिसो रबाडा (4 कोटी 20लाख)

-क्विंटन डी कॉक (2कोटी 80 लाख)

-अँनरिक नॉर्किया (89 लाख)

-डेव्हिड मिलर (75 लाख)

-लुंगी एन्गिडी (50 लाख)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)