IPL 2021: आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई कोणाची?

सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असं इंडियन प्रीमिअर लीगचं वर्णन केलं जातं. जगभरातील खेळाडूंना आपलं गुणकौशल्य सादर करण्यासाठी तसंच बक्कळ पैसा मिळवण्यासाठीचं व्यासपीठ म्हणजे आयपीएल ही स्पर्धा. स्पर्धेद्वारे मिळणाऱ्या पैशाने अनेकांचं आयुष्य बदलून गेलं आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊया.

1.विराट कोहली-17 कोटी

टीम इंडियाचा कर्णधार आणि रनमशीन. कोहलीच्या नावावर एक अद्भुत विक्रम आहे. आयपीएल स्पर्धेसाठी वेळोवेळी लिलाव झाले. कोहलीचं नाव एकदाही लिलावात समोर आलेलं नाही. पहिल्यावहिल्या आयपीएलआधी U19 वर्ल्डकप संघातील खेळाडूंना निवडण्याची संधी संघांना देण्यात आली.

दिल्लीने प्रदीप संगवानची तर बेंगळुरूने कोहलीची निवड केली. तेव्हापासून कोहली बेंगळुरू संघाकडेच आहे. अफलातून अशा कामगिरीमुळे बेंगळुरूने कोहलीला आपल्या ताफ्यात राखलं आहे. कोहली आणि आरसीबी हे समानार्थी शब्द वाटावेत असं हे द्वैत.

मात्र कर्णधार कोहली बेंगळुरूला अद्यापही जेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्सचा विक्रम नावावर असणाऱ्या कोहलीची प्रति हंगाम कमाई 17 कोटी एवढी आहे.

2. ख्रिस मॉरिस-16.25 कोटी

कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम लांबणीवर गेला होता. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दुबई इथे सामने खेळवण्यात आले. या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघाचा ख्रिस मॉरिस भाग होता. उपयुक्त फटकेबाजी करू शकणारा बॉलर अशी मॉरिसची ओळख. बेंगळुरूने संघरचना बदलायचं ठरवलं आणि मॉरिसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

पस्तिशी, स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर, उल्लेखनीय असा फॉर्म नाही असं सगळं असतानाही लिलावात राजस्थान रॉयल्सने मॉरिससाठी पाऊण तिजोरी खर्च करून टाकली. राजस्थानने तब्बल 16.25 कोटी रुपयांची प्रचंड रक्कम मोजून मॉरिसला संघात घेतलं.

मॉरिसला मिळालेली रक्कम ही त्याच्यासह क्रिकेटविश्वातील अनेकांना धक्का देणारी होती. लिलावात एका विदेशी खेळाडूला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. या प्रचंड मानधनासह मॉरिसवर या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करण्याचं दडपण आहे.

3. पॅट कमिन्स- 15.50 कोटी

टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारांमध्ये बॅट्समनवर हुकूमत गाजवणारा फास्ट बॉलर अशी पॅट कमिन्सची ओळख आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने सढळहस्ते तिजोरी रिकामी करत कमिन्ससाठी 15.50 कोटी रुपये मोजले होते. कमिन्सचा फॉर्म कोलकातासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

4. महेंद्रसिंग धोनी- 15 कोटी

भारतीय संघाला दोन विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार. विश्वचषक, आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान, चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल जेतेपदं अशा सर्वच आघाड्यांवर अग्रणी असा महेंद्रसिंग धोनी स्पर्धेच्या मानबिंदूंपैकी एक आहे. जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये त्याची नोंद होते.

यंदाचा हंगाम 39 वर्षीय धोनीसाठी शेवटचा असू शकतो. गेल्या हंगामात चेन्नईला लौकिकाला साजेशा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. या हंगामात दणका उडवून देण्याचा धोनीसेनेचा मानस आहे. धोनीला या हंगामासाठी 15 कोटी रुपये मानधन मिळेल.

5. ऋषभ पंत- 15 कोटी

दुबईत झालेला हंगाम ते 9 एप्रिलपासून सुरू होणारा हंगाम- या पाच महिन्यांमध्ये ऋषभचं आयुष्य पालटून गेलं आहे. भारतीय वनडे तसंच ट्वेन्टी-20 संघातून ऋषभला डच्चू देण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या टेस्टसाठी अनुभवी वृद्धिमान साहाला पसंती देण्यात आली. अडलेड टेस्टमध्ये भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या टेस्टसाठी ऋषभला संधी देण्यात आली. तिथून ऋषभने मागे वळून पाहिलं नाही.

सिडनी टेस्टमध्ये अशक्य वाटणारा विजय प्रत्यक्षात साकारण्यासाठी ऋषभने 97रन्सची अदुभत खेळी केली. ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऋषभने ही कसर भरून काढली आणि नाबाद 91 रन्सच्या बळावर भारतीय संघाला थरारक विजय मिळवून दिला. मायदेशी परतल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेत ऋषभची बॅट तळपत राहिली.

नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. 23व्या वर्षी ऋषभ यंदाच्या हंगामातला सगळ्यात युवा कर्णधार असणार आहे. ऋषभचं मानधन आहे 15 कोटी.

6. रोहित शर्मा-15 कोटी

आयपीएल स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी कर्णधार. मुंबई इंडियन्स संघाने रोहितच्याच नेतृत्वात पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहितने मुंबई इंडियन्ससाठी खोऱ्याने रन्स केल्या आहेत. अनुभवी आणि युवा खेळाडू तसंच विदेशी खेळाडू यांची मोट बांधण्याचं काम रोहितनं सुरेख पद्धतीने केलं आहे. रोहितचं मानधन आहे 15 कोटी

7. कायले जेमिसन-15 कोटी

आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूला एवढी रक्कम मिळणं अविश्सनीय आहे. न्यूझीलंडचा उंचपुरा फास्ट बॉलर, आक्रमक बॅट्समन आणि चपळ फिल्डर अशा तिन्ही आघाड्यांवर गेल्या दीड वर्षात दमदार कामगिरी करणारा कायले जेमिसन.

जेमिसन आतापर्यंतच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारतात खेळलेला नाही. मात्र तरीही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्याच्या गुणकौशल्यांवर विश्वास ठेवत त्याच्यासाठी 15 कोटी रुपयांची बोली लावली. या प्रचंड रकमेला जागत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी जेमिसनच्या खांद्यावर असेल.

8. ग्लेन मॅक्सवेल-14.25 कोटी

आपल्या बॅटच्या बळावर एकहाती मॅच फिरवू शकणारा मात्र कामगिरीत सातत्याचा अभाव असणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल. दुबईत झालेल्या हंगामात मॅक्सवेलला पंजाबसाठी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेल संपूर्ण स्पर्धेत एकही षटकार लगावू शकला नाही.

हंगामात अपयशी ठरल्याने पंजाबने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. लिलावात मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी फ्रँचाइजींमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर बेंगळुरू संघाने तब्बल 14.25कोटी रुपये खर्चत मॅक्सवेलला ताफ्यात समाविष्ट केलं.

9. झाय रिचर्डसन-14 कोटी

ऑस्ट्रेलियाचा तरुण तडफदार फास्ट बॉलर. पंजाब किंग्ज म्हणजेच पूर्वीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबला दर्जेदार बॉलर्सची आवश्यकता होती. विराट कोहलीसारख्या कसलेल्या बॅट्समनला बाद करण्यात यशस्वी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचर्डसनसाठी पंजाबने तब्बल 14 कोटी रुपये मोजले आहेत.

झायने 2 टेस्ट, 13 वनडे आणि 14 ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारतात खेळण्याचा अल्प अनुभव झायच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली झाली आहे. पंजाबला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

10. डेव्हिड वॉर्नर, बेन स्टोक्स आणि सुनीन नरिन- 12.50 कोटी

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरिन या तिघांचंही मानधन प्रत्येकी 12.25 आहे. वॉर्नरकडे सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद आणि सलामीवीर अशा दोन्ही भूमिका आहेत. बेन स्टोक्स हा राजस्थान रॉयल्स संघाला संतुलित करणारा घटक आहे.

बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर योगदान देणारा खेळाडू आहे. सुनील नरिन कोलकाताचं अस्त्र आहे. त्याच्या चार ओव्हर्समध्ये रन वसूल करणं अवघड असतं. गेल्या काही हंगामात सलामीला बॅटिंगला येऊन प्रतिस्पर्धी बॉलर्सची लय बिघडवण्याचं कामही तो करतो.

11. लोकेश राहुल, सुरेश रैना, एबी डीव्हिलियर्स, हार्दिक पंड्या, मनीष पांडे- 11 कोटी

सलामीवीर, कर्णधार आणि विकेटकीपर अशा तिहेरी भूमिका राहुल पंजाबसाठी पार पाडतो. आक्रमक मात्र त्याचवेळी नजाकत असलेली बॅटिंग राहुलचं वैशिष्ट्य आहे. एक अतिरिक्त बॅट्समन किंवा बॉलरला सामावून घेण्यासाठी राहुल कीपिंगही करतो. कर्णधारपदाची धुराही सांभाळतो.

360 डिग्री अशी बिरुदावली पटकावलेला एबी डीव्हिलियर्स हा आधुनिक क्रिकेटच्या मानबिंदूंपैकी एक. आयपीएल स्पर्धेचा ब्रँड प्रस्थापित करून लोकप्रिय करण्यात एबीचा सिंहाचा वाटा आहे. विदेशी खेळाडू असूनही भारतात प्रचंड लोकप्रिय असा हा खेळाडू. स्पर्धेत अनेक अदुभुत विक्रम एबीच्या नावावर आहेत.

मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये तुफान फटकेबाजी, भागीदारी फोडण्यात माहीर आणि उत्तम फिल्डर या गुणवैशिष्ट्यांमुळे हार्दिक मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग आहे.

आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावांची टांकसाळ उघडणारा खेळाडू अशी सुरेश रैनाची ओळख आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा आधारस्तंभ. चेन्नईच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू.

आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणजे मनीष पांडे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा महत्त्वाचा बॅट्समन. आपल्या फिल्डिंगच्या बळावर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघात स्थान पटकावू शकेल असा भन्नाट फिल्डर. गेल्या काही वर्षात फिनिशर म्हणून पांडेने स्वत:ला तयार केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)