You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: चेतेश्वर पुजाराचं सात वर्षांनंतर पुनरागमन, दोन नवे कर्णधार, पंजाब संघाचं नवं नाव
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा चौदावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या हंगामात काय वेगळं असणार आहे?
1.चेतेश्वर पुजारा परतणार
भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा आयपीएल स्पर्धेत मात्र उपेक्षित ठरतो. प्रत्येक बॉलवर चौकार-षटकार लगावेत अशी अपेक्षा असणाऱ्या फॉरमॅटमध्ये संयमी खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराला स्थान मिळत नव्हतं. तब्बल सात वर्षांनंतर पुजाराचं या स्पर्धेत पुनरागमन होतं आहे.
पुजारा 30 सामने खेळला असून त्याच्या नावावर 390 रन्स आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. पुजारा कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळला आहे. लिलावात चेन्नई सुपर किंग्सने पुजाराला ताफ्यात समाविष्ट करताच उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
चेन्नई संघाच्या सरावादरम्यान पुजारा पल्लेदार षटकार लगावत असतानाचं चित्र काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं.
2.अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. अर्जुनसाठी 20 लाख रुपये ही बेस प्राईस लिलावात ठेवण्यात आली होती. त्याच किंमतीला मुंबई इंडियन्सने अर्जुनला आपल्या संघात घेतलं. 2020 हंगामात अर्जुन मुंबई इंडियन्स संघाचा नेट बॉलर होता.
मुंबईतल्या वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धेत तो खेळला आहे. भारतीय संघाच्या सरावादरम्यान नेट्समध्ये दिसला आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या U19 संघातही त्याने स्थान पटकावलं होतं.
डावखुरा फास्ट बॉलर असणारा उंचपुरा अर्जुन स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. तो उपयुक्त बॅटिंगही करतो.
अर्जुनने भारतीय U19 आणि मुंबई U19 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघात अर्जुनचं पदार्पण झालं.
हरयाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने एक विकेट मिळवली. त्याच्या तीन ओव्हर्समध्ये 34 रन्स कुटण्यात आल्या. पुद्दुचेरीविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने 33 रन्सच्या मोबदल्यात एक विकेट पटकावली.
मुंबई U19 संघातर्फे खेळताना 2017-18 हंगामात कूचबिहार करंडक स्पर्धेत 19 विकेट्स पटकावल्या होत्या. 2017 मध्ये बडोदा इथे झालेल्या जयंत लेले निमंत्रितांच्या स्पर्धेत अर्जुनने चांगली कामगिरी केली होती.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या इनडोअर अकादमीत सरावाची संधी अर्जुनला मिळाली आहे. इंग्लंड संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचे बॅट्समन सराव करत होते. अर्जुनच्या बुंध्यात पडलेल्या यॉर्करवर इंग्लंडचा बॅट्समन आणि विकेटकीपर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त होता होता वाचला.
अर्जुनच्या वेगाने आणि अचूकतेने बेअरस्टोसह इंग्लंड संघातील खेळाडू प्रभावित झाले होते. गेल्या वर्षी लॉर्ड्स इथे भारतीय महिला क्रिकेट संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली होती.
भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यानिमित्ताने मुंबईत असतो तेव्हा अर्जुन नेट बॉलर म्हणून सरावादरम्यान दिसतो.
3. ऋषभ पंत, संजू सॅमसन नवे कर्णधार
यंदाच्या हंगामात दोन नवे कर्णधार या स्पर्धेला पाहायला मिळणार आहेत. राजस्थान रॉयल्सने गेल्या वर्षी अजिंक्य रहाणेला संघातून डच्चू देत स्टीव्हन स्मिथला कर्णधार केलं. स्मिथची कामगिरी लौकिकाला साजेशी न झाल्याने यंदाच्या हंगामासाठी राजस्थानने संजू सॅमसमनकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
26वर्षीय संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेत 107 मॅचेस खेळल्या असून, त्याच्या नावावर 2584 रन्स आहेत. 133.74चा स्ट्राईकरेट हे संजूच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. आयपीएल स्पर्धेत संजूच्या नावावर दोन शतकं आहेत.
राजस्थान रॉयल्सने 2008 या पहिल्या हंगामात जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही.
याआधीच्या हंगामांमध्ये शेन वॉर्न, शेन वॉटसन, राहुल द्रविड, स्टीव्हन स्मिथ, अजिंक्य रहाणे यांनी राजस्थानच्या कर्णधारपदाची धुरा वाहिली आहे.
बेन स्टोक्स, जोस बटलर, ख्रिस मॉरिस, जोफ्रा आर्चर, डेव्हिड मिलर यासारख्या अनुभवी खेळाडूंबरोबर युवा भारतीय खेळाडूंची मोट बांधणे हे संजूपुढचं आव्हान असेल.
दुसरीकडे आयपीएलच्या 13व्या हंगामानंतर भन्नाट फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकणार नसल्याने ऋषभकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 23वर्षीय ऋषभ हा यंदाच्या हंगामातला सगळ्यात युवा कर्णधार असणार आहे.
गेल्या पाच महिन्यात ऋषभने बॅटिंग आणि कीपिंग अशा दोन्ही आघाड्या गाजवल्या आहेत. श्रेयस कर्णधार असताना ऋषभ उपकर्णधार होता. याआधी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ऋषभने दिल्लीचं कर्णधारपद भूषवलं आहे.
ऋषभ दिल्ली कॅपिटल्स संघाचा तेरावा कर्णधार असणार आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, जेम्स होप्स, महेला जयवर्धने, रॉस टेलर, डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन, जेपी ड्युमिनी, झहीर खान, करुण नायर, श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचं कर्णधारपद भूषवलं आहे. आता 23व्या वर्षी ऋषभकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे.
कर्णधारपदासाठी रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, स्टीव्हन स्मिथ, शिखर धवन यांची नावं चर्चेत होती. मात्र वय आणि भविष्यकालीन योजनांचा विचार करून दिल्ली संघव्यवस्थापनाने ऋषभच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने फायनलपर्यंत धडक मारली होती.
4. सर्व मॅचेस न्यूट्रल ठिकाणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाच्या हंगामाचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. बेंगळुरू, अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता या ठिकाणी मॅचेस होणार आहेत. प्रत्येक संघ हंगामात फक्त तीनवेळा प्रवास करणार आहे. आयपीएलच्या मूळ रचनेनुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर 7 आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर 7 मॅचेस खेळतो.
घरच्या मैदानावर खेळपट्टीची, वातावरणाची माहिती असल्याने फायदा होतो. मात्र कोरोनामुळे सर्व ठिकाणी सामने खेळवणं शक्य नसल्याने सगळ्या मॅचेस न्यूट्रल अर्थात तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. कोणत्याही संघाला विनाकारण फायदा मिळू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहेत.
5. मुंबईसह महाराष्ट्राची पताका
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ बलाढ्य समजला जातो. साहजिक मुंबईचे असंख्य खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. यंदाचा हंगामही त्याला अपवाद नाही. मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघात आहेत.
रोहितच्याच नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्फराझ खान पंजाब किंग्सकडून खेळतोय तर यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. शार्दूल ठाकूर चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य भाग आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खोऱ्याने धावा करणारा पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर आहे.
महाराष्ट्रातर्फे खेळणारा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघातला नवा तारा आहे. गेल्या वर्षी कोरोना झाल्यामुळे ऋतुराजला प्रदीर्घ काळ खेळता आलं नव्हतं. मात्र कोरोनामुक्त झाल्यांतर ऋतुराजने आपल्या कौशल्याची चुणूक सादर केली होती.
त्याचा सहकारी राहुल त्रिपाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून तर दर्शन नालकांडे पंजाब किंग्स संघात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव उंचावणारा केदार जाधव या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसेल.
टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर उमेश यादव दिल्ली कॅपिटल्स संघात परतला आहे.
6.किंग्ज इलेव्हन पंजाबचं झालं पंजाब किंग्ज
तेरा हंगामांमध्ये एकदाही जेतेपद पटकावू न शकणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संघाचं नाव पंजाब किंग्ज असं असणार आहे.
प्रीती झिंटा आणि नेस वाडिया मालक असलेल्या या संघाला जेतेपदाने दूर ठेवलं आहे. पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत 12 खेळाडूंना कर्णधार म्हणून संधी दिली. मात्र भारतीय किंवा विदेशी कोणत्याही कर्णधाराला जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. नशीब बदलावं यासाठी संघाचं नाव बदललं आहे.
7. मैदानावरील अंपायरकडून सॉफ्ट सिग्नल नाही
थर्ड अंपायरकडे निर्णय दिला असताना मैदानावरील पंचांनी नेमका काय निर्णय दिला आहे, या गोष्टीला जास्त महत्व दिले जायचे. पण आता आयपीएलमध्ये तसे होणार नाही. कारण यावर्षी आयपीएलमध्ये मैदानातील पंच जे सॉफ्ट सिग्नल द्यायचे, त्याचे महत्व जास्त राहणार नाही आणि थर्ड अंपायरला आपला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. बऱ्याचदा मैदानावरील अंपायर्सनी सॉफ्ट सिग्नल म्हणून एखाद्या खेळाडूला बाद दिले तर थर्ड अंपायरला त्याला महत्व द्यावे लागायचे. त्यामुळे काही प्रमाणात निर्णयांवर परिणाम होत असे पण यंदाच्या हंगामात तसं होणार नाही. मैदानातील अंपायर्स सॉफ्ट सिग्नल देतील, पण थर्ड अंपायरने योग्य चाचपणी करून आपला निर्णय द्यायला आहे, त्यामध्ये सॉफ्ट सिग्नलचे महत्व आता जास्त राहणार नाही
8. 90 मिनिटात इनिंग संपवणं बंधनकारक
आयपीएलचे सामने हे उशिरापर्यंत चालतात, अशीही ओरड सुरु होती. या गोष्टीला लगाम घालण्यासाठी प्रत्येक संघाने 20 ओव्हर 90 मिनिटांमध्येच संपवायची आहेत, असा नवीन नियम तयार करण्यात आला आहे. जर हा नियम मोडीत काढला तर संघातील कर्णधारासह खेळाडूंना दंड होऊ शकतो. त्याचबरोबर ही गोष्ट दोनवेळा घडली तर संघाच्या कर्णधारावर कडक कारवाई होऊ शकते आणि कदाचित कर्णधाराला काही सामन्यांमध्ये खेळताही येऊ शकणार नाही.
9. सुपर ओव्हर तासाभरात
मॅच टाय झाल्यास पुढच्या तासाभरात सुपर ओव्हरद्वारे निर्णय घेण्यात यावा. तासाभरात निर्णय होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल.
10. शॉर्ट रनचा निर्णय थर्ड अंपायरकडे
शॉर्ट रनबाबतचा निर्णय मैदानावरील अंपायर घेत असतात. मात्र, यंदाच्या हंगामात थर्ड अंपायर यासंदर्भात निर्णय देतील.
थर्ड अंपायरला जर वाटले की मैदानावरील अंपायर्सनी शॉर्ट रनबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे, तर थर्ड अंपायर मैदानावरील पंचांचा निर्णय बदलू शकतात. याबरोबरच नो-बॉलबाबतचा निर्णय देखील थर्ड अंपायर बदलू शकतात.
11. कोण दिसणार नाही?
गेल्या हंगामानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी शेन वॉटसन आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने ते यंदाच्या हंगामात दिसणार नाहीत. वॉटसन चेन्नई सुपर किंग्सचा तर मलिंगा मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग होता. मुंबईकर तुषार देशपांडे, सिद्धेश लाड, निखिल नाईक यांच्यासह नेपाळचा संदीप लमाचीने यंदा खेळताना दिसणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, जोश फिलीप, डेल स्टेन, श्रेयस अय्यर यंदाच्या हंगामात खेळताना दिसणार नाहीत. बायो बबलमध्ये दोन महिने राहणं शक्य नसल्याने हेझवूडने माघार घेतली आहे. मिचेल मार्श दुखापतग्रस्त आहे. स्टेनने उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो खेळू शकणार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)