You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: कोलकाता संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, बेंगळुरूविरुद्धची लढत लांबणीवर
कोलकाता संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा आज कोलकाता-बेंगळुरू सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
देशभरात दररोज आढळणारे कोरोनाचे लाखो रुग्ण आणि लॉकडाऊनसदृश परिस्थिती असतानाही इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू होती. मात्र आता आयपीएलमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आयपीएलच्या वेळापत्रकानुसार सोमवारी कोलकाता आणि बेंगळुरू यांच्यात अहमदाबाद इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुकाबला होणार होता. मात्र कोलकाताचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बेंगळुरूचा संघ सामना खेळण्यास अनुत्सुक असल्याने आयपीएल प्रशासनाने ही लढत रद्द केली आहे. आता हा सामना नंतर खेळवण्यात येईल.
कोलकाता संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.
गेल्या वर्षी देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेरावा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला होता. मात्र यंदाचा हंगाम भारतातच होत आहे. देशभरात लाखो कोरोना रुग्ण आढळत असताना आणि हजारो देशवासीयांना ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी वणवण करावी लागत असताना ही स्पर्धा सुरू असल्याने जोरदार टीकाही करण्यात आली होती.
यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघातील अक्षर पटेलला कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवसांपूर्वीच तीन निगेटिव्ह चाचण्यांनंतर तो मैदानात खेळायला उतरला. कोलकाता संघाच्या नितीश राणालाही कोरोना झाला होता. मात्र त्याने क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण केली.
निगेटिव्ह निकालानंतर तो सरावात सहभागी झाला. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये कार्यरत ग्राऊंडस्टाफपैकी दहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र तरीही मुंबईत दहा सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं.
स्पर्धेच्या आताच्या टप्प्यात राजधानी दिल्लीत आणि अहमदाबाद इथे सामने होत आहेत.
दरम्यान घरात आणि नात्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनने यंदाच्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, अडम झंपा आणि अँड्यू टाय यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफेल हेही परतणार होते मात्र ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा स्थगित असल्याने ते भारतातच आहेत. घरातील सदस्यांना कोरोना झाल्याने पंच नितीन मेमन स्वगृही परतले आहेत.
देशातल्या कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या आणि भयावह परिस्थिती यामुळे काही परदेशी खेळाडूंनी भीती व्यक्त केली होती. मात्र बायोबबल अत्यंत सुरक्षित आहे अशी हमी बीसीसीआयने दिली होती. स्पर्धा संपेपर्यंत आणि तुम्हाला सुखरुप घरी सोडण्याची जबाबदारी आमची असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं.
यंदाच्या हंगामात सर्वच सामने तटस्थ ठिकाणी होत आहेत. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई याठिकाणी होत आहेत. यंदाच्या हंगामात 60 सामने होणार आहेत. आतापर्यंत 29 सामने झाले होते. स्पर्धा निम्म्यावर आलेली असताना खेळाडूच पॉझिटिव्ह आढळल्याने उरलेले सामने होणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)