कोरोनानं त्रस्त रुग्ण, हताश नातेवाईक आणि भयाण शांतता - ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ऑक्सिजन नाही, रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाही, औषधं आणि व्हेंटिलेटरची कमतरता, लॉकडाऊनमुळे कामगारांची घरवापसी हे सगळं जिथे घडतंय तिथे जायचं मी ठरवलं आणि गाडीत बसलो.

मी अनेक रुग्णालयांना भेट दिली, एका बस स्टँडवर गेलो आणि एका रेल्वे स्टेशनवरही जाऊन गेलो.

रस्त्यांवर एखाद-दुसरी गाडी दिसली. माझ्या गाडीच्या बाजूने जोरदार सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स वेगाने निघून जात होत्या. त्यांच्या सायरनचा आवाज दूरपर्यंत माझ्या कानात गुंजत राहिला.

दोन कोटी लोकसंख्येचं दिल्ली देशाची राजधानी. शनिवार हा सुट्टीचा वार. मात्र कोरोनाने वातावरणात भेसूर शांतता भरून राहिली होती. दुकानं-मॉल्स बंद होते. ज्यांना अगदीच आवश्यक आहे अशी माणसंच बाहेर दिसत होती ज्यांच्याकडे पास आहे.

दिल्लीत मागच्या शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू करण्यात आला. सोमवारी हा लॉकडाऊन आठवडाभराने वाढवण्यात आला. रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत लागू असेल असं सूचित केलं.

रुग्णालयांची स्थिती

राजधानीतल्या असंख्य रुग्णालयाबाहेरचं हेच दृश्य होतं. रुग्णाच्या नातेवाईकांचा हाच प्रयत्न आहे की त्याचा श्वास सुरळीत सुरू राहावा. ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांची अविश्रांत धडपड सुरू आहे. त्यासाठी फोनाफोनी सुरू आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांपुढे गयावया करत आहेत.

मी एका रुग्णालयाच्या गेटवर पोहोचलो, तिथेच बॅरिकेडवर लिहिलं होतं की 'इथे बेड उपलब्ध नाही'.

आजारी माणसं आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर करुण भाव होते. त्यांची अस्वस्थता मी समजू शकत होतो. शेजारधर्म पाळणारे सख्खे शेजारी आणि खरीखुरी मैत्री निभावणारे अनेकजण होते.

मला तेव्हा असं वाटलं की या कठीण काळात सरकार जवळपास गायब आहे. त्यावेळेस लोकांमध्ये बंधुभाव दिसतो आहे. माणुसकी जिवंत आहे.

मुस्लीम काय, हिंदू काय, श्रीमंत काय, गरीब काय. सगळेजण एकमेकाला मदत करत आहेत.

रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी

मी एम्स रुग्णालयाच्या इथे पोहोचलो. देशातल्या अग्रगण्य रुग्णालयात याची नोंद होते. देशभरातून इथे रुग्ण येत असतात.

या रुग्णालयाचं प्रांगण एवढं मोठं आहे की तुम्हाला आतमध्ये नक्की कुठे जायचं हे माहिती नसेल तर तुम्ही हरवू शकता. श्रीमंत, गरीब अशा कोणत्याही वर्गाच्या माणसांवर इथे उपचार होतात.

कोव्हिड वॉर्डात जायची मला परवानगी होती आणि तशी माझी इच्छाही नव्हती. इथे कोरोनावर चांगले उपचार होतात हे मला माहिती होतं.

गेल्या वर्षी माझा भाऊ कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर याच रुग्णालयात बारा दिवस होता. जेव्हा भावाला भरती करण्यात आलं तेव्हा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, तुमचा माणूस वाचण्याची शक्यता पन्नास टक्केच आहे. पण तरीही भाऊ ठीक होऊन बाहेर पडला.

शनिवारी मी एम्समध्ये पोहोचलो तेव्हा कोव्हिड वॉर्डाच्या बाहेर खूप सारी माणसं होती. बहुतांश दिल्लीच्या बाहेरून आले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशी ही माणसं होती. अनेकांनी फुटपाथवरच पथारी मांडली होती. त्यापैकी काहीजण तिथेच जेवण बनवत होते.

रुग्णालयंही हताश

एम्सच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांशी बोलत होतो तेवढ्यात मला कळलं की जयपूर गोल्डन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अनियमित झाल्याने 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वीच सर गंगाराम रुग्णालयामध्ये याच कारणामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला होता.

मी एम्समधून जयपूर गोल्डन रुग्णालयाशी पोहोचलो. इथे अडीचशे अतिगंभीर स्थितीतील कोव्हिड रुग्ण भरती होते. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता.

रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सांगितलं की मध्यरात्रीनंतर ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली आणि सगळीकडे खळबळ उडाली.

मी ऋचाली अवस्था यांच्याशी बोललो. त्या आपल्या पतीसह तिथे आल्या होत्या. हॉस्पिटल अधिकाऱ्यांप्रति त्या नाराज दिसत होत्या.

त्यांनी सांगितलं की, जेठानी सीमा अवस्थी गेलेल्यांमध्ये होत्या. सीमा अवस्थी त्याच भागातल्या एका शाळेच्या मुख्याध्यापक होत्या. जेठानी यांच्या मुलांचं लग्न होणार होतं. आमच्या समाजाने चांगलं व्यक्तिमत्व गमावलं.

त्यांनी सांगितलं की, आदल्या रात्री सीमा यांच्याशी व्हॉट्सअपवरून त्यांचं बोलणं झालं. नंतर मी रुग्णालयातही आले. त्यांना कोव्हिड वॉर्डात जाण्याची परवानगी नव्हती. मात्र त्यांच्या व्हॉट्अपवरून हे समजत होतं की त्यांची स्थिती सुधारत होती.

सीमा यांच्या मृत्यूसाठी त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं. कारण रुग्णालय अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याचं सांगितलं नाही.

मी आणखी एका माणसाला भेटलो ज्यांचे दोन मोठे भाऊ जयपूर गोल्डन रुग्णालयामध्ये भरती होते. दोघांची स्थिती आता ठीक आहे. मित्रांच्या मदतीने ऑक्सिजनचा सिलिंडर त्यांनी गाडीत तयार ठेवला होता.

त्या सिलिंडरचा वापर त्यांच्या मित्राचे वडील घरी करत होते. त्यांनाही कोरोना झाला होता मात्र त्यांची स्थिती गंभीर नव्हती. त्यामुळे शनिवारी अकरा वाजता रुग्णालयामधून फोन आला की ऑक्सिजन संपत आला आहे. आपल्या भावांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करा असं सांगण्यात आल्यावर सिलिंडर घेऊन त्यांची धावपळ सुरू झाली.

माझ्याशी बोलता बोलता ते भावुक झाले. ज्याच्यावर वेळ ओढवते त्यालाच हाल काय होतात ते कळतं.

दोन्ही भावांना संकटातून बाहेर काढू शकलो यासाठी त्यांनी देवाला धन्यवाद दिले. त्यांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज पडली नाही कारण त्याचवेळी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा टँकर आला.

पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा टँकर आणण्यात आला. टँकरने रुग्णालय प्रांगणात प्रवेश केला आणि लोकांनी उत्स्फुर्तपणे जल्लोष केला. रुग्णांच्या नातेवाईकांसह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

एका रुग्णालयामध्ये दोन दिवसांसाठी संकट टळलं. मात्र अन्य रुग्णालयामध्ये हेच संकट उभं राहिलं.

गेल्या काही दिवसात दिल्लीतल्या बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. मात्र मोठ्या रुग्णालयांची अवस्था आणखी खराब आहे.

जयपूर गोल्डन रुग्णालयामध्ये मी होतो, तेव्हा बातमी आली की शालिमार बागमधील रुग्णालयातला ऑक्सिजनचा पुरवठा दोन तीन तासात संपेल असं कळलं.

मी तिकडे पोहोचलो. सुरक्षारक्षकांनी मला आत जाण्यास मनाई केली. मी फोनच्या माध्यमातून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. केंद्र सरकार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खाजगी रुग्णालयांवर ऑक्सिजनच्या व्यवस्थापनावरून आरोप करत आहेत. म्हणूनच रुग्णालय प्रशासन प्रसारमाध्यमांपासून दूर राहत आहे.

त्यांचं म्हणणं असं की नोएडात ऑक्सिजनची व्यवस्था झाली आहे आणि टँकर नोएडाहून निघाला आहे. मी एक तास तिथे होतो मात्र टँकर काही पोहोचला नाही. थोड्या वेळाने अधिकाऱ्यांनी टँकर पोहोचल्याचं सांगितलं.

डॉक्टरांची निष्ठा

सर गंगाराम रुग्णालय ते एम्स सगळीकडे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ऑक्सिजनची कमतरता आहे. बेड आणि व्हेंटिलेटरची टंचाई आहे. पण रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचारी यांचा निग्रह कमी झालेला नाही.

गंगाराम रुग्णालयाच्या समोरच छोटा बगीचा आहे. रुग्णालयाच्या प्रांगणातच आहे. रुग्णालयात काम करणारी मंडळी तिथे बोलत बसली होती.

पीपीई किट परिधान केलेल्या दोन महिला गवतावर डबा ठेवून खात होत्या. खाल्ल्यावर लगेच त्या वॉर्डात जाणार होत्या.

गेल्या दहा दिवसांपासून कोणताही ब्रेकविना काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही स्वत:हूनच हे करत आहोत असं त्या म्हणाल्या. रोज ठराविक तास अधिक काम त्या करत आहेत.

कोरोनाचा संसर्ग आणखी फैलावू शकतो त्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण लोकांना डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे.

जयपूर गोल्डन हॉस्पिटलच्या रिसेप्शनच्या समोर काही महिला बसल्या होत्या. त्यातली एक रडत होती. त्या खूपच अस्वस्थ वाटत होत्या. रिसेप्शनवर मी विचारलं की त्यांच्याकडे कोणी लक्ष का देत नाहीये? हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं मला सांगण्यात आलं.

त्यांना याबाबत सांगण्यात आलं आहे. आता कुठे जावं हे त्यांना कळत नाहीये त्यामुळे बेड रिकामा होईल या आशेने त्या तिथेच बसून आहेत.

स्थलांतरित कामगार घरी परतू लागले

दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर लॉकडाऊन लागू करण्यात आला. हाताला काम नसल्याने स्थलांतरित कामगारांनी पुन्हा गावाकडे मोर्चा वळवला. बहुतांश कामगार आनंद विहार बस टर्मिनल इथूनच गावी परतत आहेत.

तिथे जमलेल्या गर्दीचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आपल्या सामानासह तिथे आलेल्या कामगारांनी सांगितलं की, त्यांना दहा दिवसांची सुट्टी मिळाली आहे. म्हणून ते गावी जात आहेत.

ज्या इमारतीच्या उभारणीचं काम सुरू होतं ते थांबलं आहे.

आनंद विहार रेल्वे स्टेशनच्या बाहेरही भरपूर गर्दी होती. तिथे काही रेल्वे डब्यांचं रुपांतर कोव्हिड कोचमध्ये करण्यात आलं आहे. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे की आत जाण्यास मनाई आहे.

दिवसभर विविध रुग्णालयांच्या फेऱ्या केल्यानंतर मला जाणवलं की दिल्लीत विचित्र अशी शांतता आहे.

दुकानं बाजारात वर्दळ थंडावली आहे. रस्त्यावर गाड्या नाहीत, माणसं नाहीत. कर्फ्यूचं पालन होतंय पण लोक घाबरले आहेत. लोकांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव स्पष्टपणे दिसतात.

रस्ते, रुग्णालयं सगळीकडे पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे सैनिक तैनात आहेत. मात्र वातावरणात अदृश्य भीती आहे जिचं बंदूक काहीही करू शकत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)