You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: 'जेवणाचा डबा दिल्यानंतर लोक हात जोडतात, तेव्हा डोळ्यात पाणी येतं'
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठी
''अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातून आले आहेत, तर काहींचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं आहे. त्यांच्या घरी डबे करायला कोणी नाही. डबे दिल्यानंतर अनेक जण हात जोडून आभार मानतात, तेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतोय याचं समाधान वाटतं.''
नाशिकच्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना तसंच घरी एकट्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत डबे पुरवणारे अक्षय मोरे सांगत होते.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
काही जणांचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होतंय, त्यामुळे गरजू रुग्णांना मोफत डबे पुरवण्याचे काम अक्षय आणि त्याच्यासारखे अनेक तरुण राज्यातील विविध भागांमध्ये करत आहेत.
अक्षय प्रमाणेच पुण्यात आकांक्षा सडेकर, तर मुंबईमध्ये भालचंद्र जाधव करत आहेत. हे तिघंही वेगवेगळ्या शहरांमध्ये हे काम करत असले तरी या तिघांची भावना एकच आहे ती म्हणजे अडचणीच्या काळात लोकांना मदत करायची.
नाशिकच्या एका फार्मा कंपनीच्या मार्केटिंग विभागात अक्षय काम करतात. नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांच्या जेवणाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शहरातूनच नाही, तर ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत होते. अशा रुग्णांच्या नातेवाईकांना डबे देणं शक्य होत नाही. अशा रुग्णांना मोफत डबे देण्याचं काम अक्षय आणि त्यांची पत्नी करत आहे.
दररोज 100 डबे हे दोघे पुरवतात. हा सर्व खर्च अक्षय स्वतःच्या खिशातून करतात. गेल्या लॉकडाऊनमध्ये देखील अक्षय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पायी घरी निघालेल्या मजुरांना अन्नदानाची मदत केली होती.
अक्षय म्हणतात, ''या महामारीत अनेक लोकांचे जेवणाचे हाल झाले, त्यामुळे त्यांना मदत करायला हवी असं वाटलं. पत्नीशी याबाबत चर्चा केली तिने देखील लगेच होकार दिला. मग आम्ही ही सेवा सुरु केली. हे काम सुरू करण्यामागे एकच भावना होती ती म्हणजे लोकांचे हाल व्हायला नको. उद्या माझ्यावर देखील अशी वेळ येऊ शकते त्यामुळे माझ्याकडून जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत हे मी करत राहील.''
अक्षय यांच्या कामाचं त्यांच्या नातेवाईकांकडून देखील कौतुक होतंय. लोक गावी त्यांच्या आई-वडिलांना फोन करुन तुमचा मुलगा चांगलं काम करतोय, असं सांगतात. त्यांचा आई-वडिलांना ते करत असलेल्या कामाचा अभिमान वाटतो.
इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि गेल्या पाच वर्षांपासून भारतात स्थायिक झालेल्या आकांक्षा देखील पुण्यात गरजू लोकांना डबा पुरवण्याचे काम करत आहेत.
सहा एप्रिलपासून त्यांनी त्यांच्या रौनिता या मैत्रिणीच्या मदतीने हे काम सुरू केले. आत्तापर्यंत त्यांनी 1250 गरजूंना डबे दिले आहेत.
आकांक्षा म्हणतात, ''लहानपणापासूनच मला इतरांना मदत करण्यास शिकवण्यात आले होते. यावेळीच्या कोरोनाच्या लाटेत अनेकांचे हाल होत असल्याने त्यांना मदत करायला हवी असं वाटलं. आम्ही ज्यांना डब्याची नितांत गरज आहे त्यांना डबे पुरवतो. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांना आम्ही मोफत डबे देतो. त्याचबरोबर बसस्टॉपवर राहणारे, रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर अशांना देखील आम्ही डबे देतो.
''यापलीकडे देखील अनेक लोक आम्हाला डब्याची विचारणा करतात. त्यामुळे ज्यांना डब्याची गरज आहे आणि जे पैसे देऊ शकतात अशांना आम्ही डबे पुरवणाऱ्या खानावळींचे नंबर देतो.''
मुंबईच्या परळ भागात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना मोफत डबा देण्याचं काम भालचंद्र जाधव करतात. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे.
परळ, शिवडी, वडाळा या भागात ते मोफत डबे पोहोचवत आहेत. गेल्या वर्षीच्या आणि आताच्या लॉकडाऊनमुळे व्यवसायात तोटा झालेला असताना त्यांनी हे काम हाती घेतलं आहे. इच्छा असेल तिथे मार्ग निघतो असं ते यावर म्हणतात.
होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना डबा देण्यासाठी लोक घाबरतात म्हणून मग भालचंद्र यांनी या लोकांना डबा देण्याचं ठरवलं. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवली.
त्यानंतर त्यांना डब्याची मागणी करणारे अनेक फोन येऊ लागले. सध्या ते सकाळ संध्याकाळ 35 ते 40 रुग्णांना दोन वेळचं जेवण पुरवत आहेत. होम डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या सोबत केटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या मुलांना सोबत घेतलं आहे.
"गरजूला मदत करता येत असल्याचं समाधान आहे. लोक डबा मिळाल्यानंतर हात जोडतात, ते पाहून डोळ्यात पाणी येतं. इतर लोकांनी सुद्धा आपल्यापरीने मदत करायला हवी," असं भालचंद्र सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)